वसई: वसई विरार शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाकडून बससेवा पुरवली जाते. या बसेसमधून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. पण शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही बससेवा अपुरी असल्याने नागरिकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे परिवहन सेवेच्या बसेस बेफिकीरपणे चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन बसची वाहतूक करणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे समोर येते. तर परिवहन सेवेच्या हलगर्जीपणाची अशीच एक चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या चित्रफितीत परिवहन सेवेची एक बस वसई-विरारच्या रस्त्यावर भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. प्रवाशांची गर्दी इतकी प्रचंड आहे की, बस क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्यामुळे एका बाजूला झुकलेली दिसत आहे.
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनची एका खांद्यावर जोर देऊन, पाय घसटत चालण्याची विशिष्ट शैली प्रसिद्ध झाली होती. या व्हायरल चित्रफितीतील बस एका बाजूला झुकल्यामुळे नेटकऱ्यांनी या बसला ‘ही तर पुष्पा स्टाईल बस’ म्हणत, चालकाच्या आणि परिवहन विभागाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे.
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडे सद्यस्थितीत ९४ डिझेल बस आणि ४० ई-बस अशा एकूण १३४ बसेस आहेत. या बसेसद्वारे शहरातील ३६ मार्गांवर सेवा पुरवली जाते, मात्र वाढत्या प्रवासी संख्येसमोर ही सेवा अपुरी ठरत आहे. या बसेसपैकी काही बसेस अत्यंत जुन्या झाल्या आहेत. अशा जुन्या बसेस काही चालक बेफिकीरपणे चालवत असल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
यावेळी नेटकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खांबे यांनीही या व्हायरल चित्रफितीवर टीका करताना म्हटले आहे कि,प्रवाशांनी खच्चून भरलेल्या या बसने रस्त्यावर केलेली धोकादायक ‘एन्ट्री’ अत्यंत गंभीर असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जीर्ण बसेसचा वापर परिवहन विभागाने थांबवला पाहिजे. तसेच, अशा धोकादायक वाहतुकीकडे वाहतूक विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरूच
वसई विरार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच बसने प्रवास करणारे प्रवासी वाढू लागले आहेत. काही मार्गावर फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे बस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून ही वाहतूक सुरू आहे. अनेकदा बस ही एकाच बाजूला झुकलेली असते अशा वेळी जर बस कलंडली तर मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः विरार, नालासोपारा, वसई फाटा, भोयदापाडा ते नायगाव पूर्व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या बसेस मध्ये अधिक प्रमाणात गर्दी होत असते. यासाठी बसेसची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे..
खड्डेमय रस्त्यामुळे अधिकच धोका
वसई विरार शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस प्रवास करतात. त्यामुळे बसेस अधिक खिळखिळ्या बनल्या आहेत. अशा बस खड्ड्यात अडकून एकाबाजुला कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चांगल्या बसेस यासह रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
