वसई: वसई विरारमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना. विरार येथील एका गृहसंकुलातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेत पाणी भरण्यावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. पण, काहीवेळात हा वाद इतका विकोपाला पोहोचला कि इमारतीतील महिलेने रागाच्याभरात आपल्या शेजाऱ्याची हत्या केली.

विरार पश्चिम येथे जेपी नगर परिसर आहे. या परिसरातील १५ क्रमांकाच्या इमारतीत उमेश पवार (५३ ) आणि कुंदा तुपेकर (४७) यांची कुटुंब वास्तव्यास आहेत. या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी भरण्यावरून वाद सुरू होता. अशातच मंगळवारी रात्री उमेश पवार (५३) आणि कुंदा तुपेकर (४७) यांच्यात पुन्हा पाणी भरण्यावरून वाद सुरु झाला. बघता बघता शुल्लक कारणावरून सुरु झालेला हा वाद अगदी विकोपाला जाऊन पोहोचला.

यावेळी संतापलेल्या कुंदा तुपेकर यांनी घरातून डास मारण्याचा स्प्रे आणला आणि तो स्प्रे थेट उमेश पवार यांच्या तोंडावर मारला. स्प्रेच्या तीव्र वासामुळे उमेश पवार हे बेशुद्ध होऊन जागीच कोसळले. तर अचानक बेशुद्ध पडल्यामुळे उमेश पवार यांना कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. “आम्ही याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिला कुंदा तुपेकर (४६) हिला अटक केली आहे. तसेच याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.”, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

पाणी भरण्यासारख्या एका अतिशय क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने जेपी नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाणी प्रश्नामुळे वाद विकोपाला

वसई विरार शहरातील वाढती लोकसंख्या आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी नळाला कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे किंवा फार कमी वेळेसाठी पाणी येत असल्यामुळे सार्वजनिक नळावर किंवा सोसायटीच्या टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांमध्ये अक्षरशः झटापट सुरू असते. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमते. रांगेतील जागा, पाणी भरण्याच्या वेळेचा भंग किंवा जास्त भांडी भरण्यावरून दररोज नळावर वादावादी होते. हे वाद कधीकधी इतके विकोपाला जातात की, शेजारी एकमेकांच्या अंगावर धावून जातात. ज्यामुळे शुल्लक वादातून गंभीर घटना घडतात.