वसई: अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असताना घरोघरी विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. तर दुसरीकडे बाजारात विक्रीस ठेवलेल्या करंज्या, चकली, अनारसे, शंकरपाळे यांसारख्या विविध प्रकारच्या तयार फराळाही यंदा मागणी वाढली आहे. खासकरून महिला व्यावसायिकांनी तयार केलेले फराळाचे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
दिवाळी म्हटलं की घरोघरी महिला वर्गाकडून फराळाची लगबग सुरू होते. मात्र अलीकडच्या धकाधकीच्या काळात नोकरदार महिलांना पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे आणि तयार फराळ सहज उपलब्ध होत असल्यामुळे तयार फराळाची मागणी वाढली आहे. दिवाळीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी महिला बचत गट तसेच महिला संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर फराळाचे पदार्थ तयार केले जातात. तर बाजारपेठेमध्ये लागणाऱ्या स्टॉलच्या माध्यमातून या फराळाची विक्री केली जाते.
वसई विरार शहरातही मोठ्या प्रमाणावर महिला व्यवसायिकांकडून फराळ तयार केला जातो. मुंबई, दादर, माटुंगा, अंधेरी, मिरारोडसह अगदी परदेशातही या फराळाची विक्री केली जाते. यामध्ये लाडू, चकल्या , करंज्या , शंकरपाळे , चिरोटे, चिवडा अशा विविध प्रकारच्या फराळाचा समावेश आहे.
महिला बचत गटांव्यतिरिक्त बाजारात विविध ठिकाणी तयार फराळाचे पदार्थ उपलब्ध आहेत. मात्र या दुकानदारांच्या तुलनेने आकारण्यात येणारे कमी दर, घरगुती चव, स्वच्छता आणि खास करून महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून यंदाही आम्ही तयार केलेल्या फराळाला मोठी मागणी असल्याचे श्रमिक महिला विकास संघाच्या जयश्री सामंत यांनी सांगितले.
फराळ व्यवसायातून महिलांना रोजगार
अलीकडच्या काळात फराळाचे पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात. मात्र, दिवाळीच्या दरम्यान या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी आहे. त्यामुळे आम्ही अतिरिक्त महिला कामगारांना रुजू करून घेतले आहे. त्यामुळे महिला बचत गटाच्या महिलांसह रोजगाराच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठीही फराळाचे पदार्थ अर्थार्जनाचे साधन ठरत असल्याची प्रतिक्रिया श्रमसमृद्धी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रुचिता विश्वासराव यांनी दिली आहे.
फराळाचे दर
- शंकरपाळे – ३६० किलो
- करंज्या – ४५० किलो
- चिवडा – ३६० किलो
- चकली – ४५०किलो
- चिरोटे – ४२० किलो
- शेव – ३६० किलो
- बेसन लाडू – १६ रुपये नग
- रवा लाडू – १६ रुपये नग