वसई : वसईच्या नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. सतर्कतेच्या दृष्टीने वसईच्या नदीकाठच्या गावांना आपत्ती व्यवस्थापन संच वाटप करण्यात आले आहेत. तालुक्यात ३२ ठिकाणी असे संच देण्यात आले आहेत.

पालघर जिल्ह्यात तानसा वैतरणा व सुर्या या नद्यांबरोबर त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. या नद्यांवर तानसा , मोडकसागर सारखे विशाल जलाशयाची धरणे असून त्यातून मुंबई महानगराला पाणी पुरवठा करतात.मात्र दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा धरणे ओव्हरफ्लो झाली की त्या धरणाचे दरवाजे उघडले जातात.त्यावेळी त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाहित होते. याचा परिणाम नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये शेतीमध्ये पुराचे पाणी शिरते .हे लोंढ्याने आलेले पाणी इतक्या वेगाने पसरते की शेती काम करणारे शेतकरी , मजूर , जनावरे पाण्यात अडकून पडतात .याच बरोबर सखल भागात घर असणाऱ्या रहिवाशीयांच्या घरात पाणी शिरते व तेही घराच्या माळ्यावर किंवा छतावर अडकून पडतात. अशा वेळी पोलीस , आपत्ती व्यवस्थापन शीघ्र कृतीदल , अग्निशमन दल यांना पाचारण केले जाते. मात्र वसई तालुक्यातील दुर्गम क्षेत्रात त्यांना पोहचण्यासाठी थोडाफार उशीर होतो. यासाठी स्थानिक पातळीवर ही मदत उपलब्ध व्हावी या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने ‘ आपत्ती व्यवस्थापन संच’ उपलब्ध करून दिले आहेत.

वसई तालुक्यात तानसा नदी किनाऱ्यावरील खानिवडे , खार्डी , मेढे , सायवन , आडणे , भिनार , शिरवली , पारोळ , उसगाव , भाताणें , शिरवली या गावांत तसेच सागरी किनाऱ्यावरील अर्नाळा , अर्नाळा किल्ला , रानगाव , सत्पाळा , कळंब या ग्रामपंचयतीतील गाव व पड्या वस्त्यांना एकूण ३२ आपत्ती व्यवस्थापन संच वितरित करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापन संच उपलब्ध करून दिले होते. त्याचे वसईच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये वाटप केले आहे. प्रदीप डोलारे, प्रभारी गटविकास अधिकारी वसई

अशी आहे साधनसामग्री

आपत्ती व्यवस्थापन किटमध्ये प्रथमोपचार किट, तरंगणारे व घडी घालता येणारे स्ट्रेचर (मोठे व मध्यम आकार), लाईफ जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, गमबुट, हॅण्ड ग्लोज, सेफ्टी नेट, रेपलिंग रोप (३० मीटर) व किट ठेवण्यासाठी बॉक्स या साहित्याचा समावेश असून निवड केलेल्या ग्रामपंचायतीला प्रत्येकी एक बॉक्स देण्यात आलेला आहे. वसईत ३२ ठिकाणी ते वितरित केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

वसईच्या ग्रामीण भागातही पूरस्थिती जन्य परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी नागरिकांनी सतकर्ता बाळगण्याचे आवाहन नागरिकांना पंचायत समितीतर्फे करण्यात आले. ज्या दिवशी जास्त पाऊस कोसळत असेल अशा वेळी घराच्या बाहेर पडणे टाळावे अशा सूचना ग्रामीण भागातील नागरिकांना केल्या आहेत.