विरार : विरारमध्ये मंगळवारी रात्री इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्या इमारतीतील रहिवाश्यांना खाली करण्याचे काम सुरु आहे. यात एका कुटुंबाला गणपती बाप्पाच्या मूर्ती सह बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला नारिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विरार पूर्वेच्या विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट इमारतींचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यात आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या ११ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील ९ जण जखमी आहेत तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरूच आहे.

ज्या रमाबाई अपार्टमेंटच्या इमारतीचा भाग कोसळला त्या इमारतीतील इतर इथून तातडीने बाहेर काढून इमारत खाली करण्यात येत आहे. ही अनधिकृत इमारत पाडली जाणार आहे. सध्या नागरिकांचे सामान बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात घडलेल्या दुर्घटनेमुळे नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली आहे.

गणपतीच्या मूर्तीसह बेघर होण्याची वेळ

या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या प्रथमेश यांच्या घरी आज गणपती बाप्पाची स्थापना होणार होती. त्याआधीच रात्री या इमारतीमध्ये दुर्घटना घडली. सध्या रहिवाश्यांना इथून हलविण्यात येत आहे. प्रथमेश यांनाही आपल्या सामनासह गणपतीची मूर्ती घेऊन घर सोडावे लागले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला या परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.