वसई: वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून आगीच्या दुर्घटना समोर येत आहेत. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास विरार पूर्वेच्या शिरसाड – वज्रेश्वरी मार्गावर चालत्या हायवा ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
विरार पूर्वेच्या भागातून शीरसाड- वज्रेश्वरी रस्ता गेला आहे. याच रस्त्यावरून हायवा ट्रक पारोळ येथून वज्रेश्वरीच्या दिशेने जात होता. याच दरम्यान शिरवली पुनिकपाडा येथे पोहचताच चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला. वाहनचालकाला घटना कळताच त्याने प्रसंगावधान राखत ट्रक थांबविला.
मात्र तेवढ्यात आगीने अधिकच पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. स्थानिकांनी तातडीने याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
विरार पूर्वेच्या शिरसाड – वज्रेश्वरी मार्गावर चालत्या हायवा ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. pic.twitter.com/1giRZ2JdDI
— chaitanya sudame (@ChaitanyaSudame) October 24, 2025
सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ट्रक जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शॉट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचे अग्निशमन विभागाककडून सांगण्यात आले आहे. या घडलेल्या घटनेमुळे या राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
