वसई:– विरार मारंबळपाडा जेट्टी ते जलसार सफाळे रोरो सेवेच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने समुद्रात अडली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.बोटीच्या रॅम्पचा हायड्रॉलिक पाईप तुटल्याने सेवा ठप्प झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मागील दीड ते दोन तासापासून प्रवासी त्यात अडकून राहिल्याने त्यांचे हाल झाले आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून विरार मारंबळपाडा जेट्टी ते जलसार दरम्यान रोरो सेवा चालवली जाते. या बोटींमधून दररोज अनेक नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी प्रवास करतात. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता जलसार जेट्टीवरून बोट विरार मारंबळपाडा जेट्टीच्या दिशेने निघाली होती. जेट्टीच्या अगदी जवळ पोहचताच बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने बोट समुद्राताच अडकून पडली आहे. त्यातून प्रवाशांना बाहेर पडता येत नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. नेमका काय प्रकार घडला आहे याची माहिती घेऊन उपाययोजना करण्यास सांगितले जाईल असे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हायड्रॉलिक रॅम्पमध्ये बिघाड…
रो-रो बोटीच्या हाय ड्रॉलिक रॅम्पमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती मारंबळपाडा येथील जेट्टीपर्यँत पोहचू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांना त्यातून बाहेर पडता आले नाही. याशिवाय अनेकांची वाहने ही बोटीतच अडकून पडली. जवळपास दीड ते दोन तासांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा आरोप…
बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व वाहने घेऊन प्रवास केला जात असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.दररोज या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले जातात. आज देखील बोटीत गर्दी होती.या बोटीत ३५ कार व रिक्षा, ३० बाईक व प्रवासी होते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी यावेळी केला आहे. फेरीबोट सुस्थितीत आहे किंवा नाही यांची तपासणी करणे आवश्यक आहे असे काही प्रवाशांनी सांगितले आहे..