विरार : प्रवाशांचे सोन्याचे ६ लाखांचे दागिने असलेली बॅग घेऊन पसार झालेल्या रॅपिडो चालकास नायगाव पोलिसांनी ४ तासात अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा सर्व मुद्देमाल परत जप्त केला आहे. नालासोपारा येथे राहणाऱ्या उपासना चव्हाण या आपले पती, आई आणि वाहिनीसह कल्याण येथील आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी रॅपिडो ॲप वरून चारचाकी वाहन ( एमएच ०१ ईएन ५७१९) बुक केले होते. प्रवासा दरम्यान नायगावच्या कामण येथे एका मिठाई खरेदी करण्यासाठी उपासना यांच्या पतीने रॅपिडो चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले.
फिर्यादी उपासना चव्हाण यांचे कुटुंबिय प्रसाधनगृहात जाण्यासाठी खाली उतरल्या होत्या. गाडीत कुणी नसल्याचा फायदा घेत रॅपिडो चालकाने बॅगेत असणारे ६ लाख २९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून पळ काढला होता. याप्रकऱणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (क) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी केली ४ तासात आरोपीला अटक
याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरातील सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषण करून आरोपी चालक संदेश संजय टोपरे (३६) याला मुंबईच्या कांदिवली येथून अटक करण्यात आली. त्याने चोरलेले सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आदी ६ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवघ्या ४ तासात पोलिसांनी ही कामगिरी केली. चालक टोपरे यांच्यावर कर्ज होते. आपल्या गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या बॅगेत मौल्यवान ऐवज असेल त्यातून कर्ज फेडू शकेल असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने त्यांची बॅग घेऊन पोबारा केला, असे पोलीस निरिक्षक (गुन्हे) अभिजित मडके यांनी सांगितले. ही कारवाई नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरक्षक ज्ञानेश्वर आसबे आदींच्या पथकाने केली.