वसई: वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या ग्रामीण भागाला पाणी टंचाई झळा बसत आहेत. अखेर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने टँकर सोबतच प्रायोगिक तत्वावर स्टँड पोस्ट नळाद्वारेपाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. असे जरी असले तरी खेड्यापाड्यात पाण्याची भीषणता कायम असून खड्ड्यातून पाणी मिळविण्यासाठी वणवण सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वसई विरार भागात सूर्या प्रकल्प, पेल्हार, उसगाव धरणाच्या पाणीपुरवठा होत असला तरी वसई पूर्वेकडील बाजूच्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. विशेषतः कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा, सातीवली, गिदराईपाडा या परिसरात पाण्याची भीषण समस्या आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्रामीण भागात पालिकेच्या जलवाहिन्या पोहचलेल्या नसल्याने या अडचणी येत आहेत. याबाबत नुकताच पाणी मिळत नसल्याने पालिकेच्या मुख्यालय यासह प्रभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आंदोलन केले होते. त्यानंतर आता पालिकेने ग्रामीण भागातही पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

दैनंदिन २१ फेऱ्या टँकर द्वारे दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे नवीन बोअरवेल मारणे, विहिरी स्वच्छता करणे यासह स्टँड पोस्ट द्वारे प्रायोगिक तत्वावर पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. असे जरी असले तरीही ग्रामीण भागातील खेड्या पाड्यातील राहणाऱ्या नागरी वस्त्यांना अजूनही पाण्याचे नियोजन नसल्याने अद्यापही येथील नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत. आहे.आखलेल्या पाणी योजना कागदावर आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. नागरिकांना विहिरी, बोरवेल यासारख्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तर दुसरीकडे आता खेड्यापाड्यातील नागरिक जमिनीत खड्डे मारून त्यात जमा होणारे पाणी गोळा करून आपली तहान भागवत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. जमिनीत खड्डे मारल्या नंतर काही वेळानंतर त्यात पाणी जमा होते. ते पाणी हंड्यात भरून वापरासाठी वापरले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्याचा दावा

पालिकेकडून टँकर द्वारे पाणी पुरविले जाते आहे. याशिवाय बोअरवेल मारणे याचे काम सुरू आहे. तर जलवाहिन्या अंथरणे अशी कामे सुरू आहेत कामण भागात पालिका स्थापन झाल्यापासून नळाचे पाणी पोहचले नव्हते मात्र यंदा नागरिकांचा जनआक्रोश लक्षात घेत स्टँड पोस्ट नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरू केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत चार ठिकाणी स्टँड पोस्ट नळ बसवून दिले आहेत अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अनेक वर्षांनंतर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही पालिकेने त्याचे योग्य नियोजन करून व्यवस्थित पाणी पुरवठा कसा होईल यावर लक्ष द्यावे असे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.