भाईंदर: मिरा भाईंदर शहरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीला आटोक्यात ठेवण्यासाठी नैसर्गिक नाले व खाड्यांच्या प्रवेशद्वारावर यांत्रिक झडपे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र शासनाकडून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नसल्यामुळे हे काम रखडून गेले आहे.

मिरा भाईंदर हे खाडी किनारी वसलेले शहर आहे. त्यामुळे या शहरावर समुद्राच्या पाण्याचा मोठा प्रभाव आहे. शहरातून निघणारे नैसर्गिक नाले याच खाड्यांना जाऊन मिळत असतात. परिणामी समुद्रातील भरती -अहोटीच्या वेळेनुसार या पाण्याचा विसर्ग होत असतो.

मात्र पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास यात मोठा व्यत्यय निर्माण होतो.आणि नाले हे ओसंडून वाहू लागल्याने शहरात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या योजनाच्या धर्तीवर मिरा भाईंदरमध्ये ही नैसर्गिक नाले आणि खाड्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर यांत्रिक झडपे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रामुख्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे काम शासन निधीतून करण्याचे ठरले आहे. याबाबत निधी मंजुर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.परंतु यावर शासनाकडून प्रतिसाद देण्यात आलेला नाही. परिणामी हे काम रखडले असून येत्या पावसात पूरस्थितीचा धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“झडपे उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव शासनपुढे सादर करण्यात आला आहे.तसेच याबाबतची निविदा प्रक्रिया राबावण्यात आली आहे.यास मंजुरी आल्यानंतर काम सुरु होईल.” – नितीन मुकणे, कार्यकारी अभियंता ( सार्वजनिक बांधकाम विभाग )

१८ ठिकाणी झडपे

याबाबत महापालिकेने विशेष सर्वेक्षण करून १८ ठिकाणी हे झडपे बसवण्याचे निश्चित केले आहे. तर पहिल्या टप्प्यात मुर्धा व घोडबंदर खाडी किनारी हे झडपे बसवण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.