वसई : एसटीच्या वसई दर्शन मोहिमेच्या दुसऱ्या फेरीलाही शून्य प्रतिसाद मिळाला. मात्र पुढील रविवारसाठी १८ प्रवाशांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, पर्यटन स्थळांमध्ये एसटीने बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

वसईच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी एसटीने वसई दर्शन ही बससेवा सुरू केली होती. दर रविवारी आठवडय़ातून एकदा ही सेवा दिली जाणार आहे. १९ जून रोजी या सेवेचा शुभारंभ झाला. मात्र पहिल्याच दिवशी एकही प्रवासी नसल्याने सेवा रद्द करावी लागली. २६ जून रोजी दुसऱ्या फेरीतदेखील एकही प्रवासी न आल्याने दुसरी फेरीदेखील रद्द करावी लागली. मात्र पुढील रविवार २ जुलैच्या वसई दर्शनसाठी १८ प्रवाशांनी नोंदणी केल्याचे एसटीने सांगितले. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत वसई किल्ला, गिरीज चर्च, निर्मळ येथील बौद्ध स्तूप, अर्नाळा बीच, जीवदानी आणि तुंगारेश्वर मंदिर अशा सात ठिकाणी वसई दर्शन घडविले जाणार आहे. त्यासाठी प्रति व्यक्ती १४० रुपये दर आकारला जाणार आहे.

स्थळांमध्ये बदल करण्याची मागणी

एसटीची वसई दर्शन ही सेवा चांगली असली तरी एकाच दिवशी एवढी स्थळे दमछाक करणारी आहेत. त्यामुळे तुंगारेश्वर आणि जीवदानी आदी स्थळे वगळावीत, वसई दर्शन बसमध्ये ‘टूर गाईड’ ठेवावा अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख शंकर बने यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या ही सेवा प्रायोगिक तत्वावर आहे. स्थळांबाबत पर्यटकांचा प्रतिसाद पाहून निर्णय घेण्यात येईल. पहिल्या दोन फेऱ्यांना प्रतिसाद नसला तरी पुढील फेरींसाठी प्रवाशांची नोंदणी झाली आहे  – राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ (पालघर)