झाडांच्या निवडीपासून ते त्यांची योग्य निगा अशा अनेक बाबींविषयी माहिती देणारं सदर..

मानवी जीवनाचा प्रवास हा सतत होणारे बदल आणि प्रगती यांनी भरलेला आहे. आपला देश जरी खेडय़ापाडय़ांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी बऱ्याच खेडय़ांचे आता शहरीकरण होऊ लागले आहे आणि जी लहान शहरे आहेत ती मोठय़ा शहरांचे रूप घेऊ लागली आहेत. अशा शहरांमध्ये खेडय़ांपेक्षा घरांचे आकार खूप लहान झालेले आहेत. असं जरी असलं तरी आपली झाडांची आवड काही कमी झालेली नाही. घरात थोडीशी मोकळी जागा मिळाली की आपण तिथे एखादं छानसं रोपटं किंवा झुडूप ठेवतो. किंबहुना अनेक वेळा आपण रोपांच्या/ झाडांच्या कुंडय़ा ठेवायला जागा मोकळी करतो. अशा प्रकारे कुंडीत ठेवलेली झाडे घराची शोभा वृद्धिंगत करतात. वनस्पतींप्रति जणू काही आपल्याला एक नैसर्गिक ओढ जाणवते. त्यांच्या सहवासात आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते. सभोवतालचे वातावरण प्रसन्न आणि उल्हसित ठेवण्याचा जणू वनस्पतींमध्ये निसर्गदत्त गुणच आहे. बाहेरून आल्यावर यांचा टवटवीतपणा बघून सगळा शीण नाहीसा होतो. यांच्या दृश्य परिणामांबरोबरच फार महत्त्वाचा न दिसणारा परिणाम म्हणजे हवा शुद्ध ठेवणे. हा परिणाम आपल्याला मनाच्या प्रसन्नतेतून अनुभवता येतो.

आपणा सर्वाना माहीत आहेच की घरातील वातावरण हे बाहेरच्या मोकळ्या वातावरणापेक्षा वेगळं असतं. त्यामुळे घरातील वातावरणात ठरावीक प्रकारची झाडंच योग्यरीत्या वाढू शकतात. घरातील कमी प्रकाश आणि मोकळ्या हवेच्या कमतरतेत वाढणाऱ्या या झाडांच्या गरजादेखील बाहेरच्या वातावरणात वाढणाऱ्या झाडांपेक्षा वेगळ्या आहेत. घरात किंवा घराजवळच्या परिसरात झाडं ठेवताना या गरजा आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. नाहीतर या झाडांची वाढ खुंटायला वेळ लागणार नाही.

अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला झाडं ठेवता येतात. पण अनेक वेळा असं दिसून येतं की या झाडांची वाढ समाधानकारक होत नाही. घरातील झाडांच्या योग्य वाढीसाठी त्यांची निगा फार महत्त्वाची आहे. झाडांची निगा हा बऱ्याच मुद्दय़ांना सामावणारा विषय आहे. जसं की झाडांची उन्हाची व पाण्याची गरज, खतांची व अन्नघटकांची गरज, छाटणीची गरज, औषध फवारणीची गरज इत्यादी. झाडांच्या निवडीपासून ते त्यांची योग्य निगा अशा अनेक पैलूंविषयी आपण या सदरातून माहिती घेणार आहोत. तर तुम्ही आता तुमच्या घरात झाडं ठेवण्यासाठीची योग्य जागा निवडून ठेवा म्हणजे पुढील लेखांमधील माहितीतून तुम्ही अशी झाडं वाढवून आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न ठेवू शकाल.

झाडं खालील ठिकाणी ठेवता येऊ शकतात.

*      खोलीच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवलेलं झाड पूर्ण खोलीची शोभा वाढवतं.

*      खिडक्यांजवळ ठेवलेली झाडं आपल्याला बागेसारख्या वातावरणाचा अनुभव देतात. या झाडांवर दिवसातून काही वेळ पडणारी सूर्याची किरणं त्यांना अधिक जिवंतपणा देतात.

*      जर हॉल किंवा खोली मोठी असेल तर त्यातील एका भागाला दुसऱ्या भागापासून वेगळं ठेवण्यासाठीही झाडांचा वापर करता येतो. अशा ठिकाणी काही कुंडय़ा ओळीत रचून त्याचा हिरवा पडदा तयार करता येतो.

*      स्वयंपाकघरातही योग्य ठिकाणी झाडं ठेवता येतात.

*      जर आपल्या घराला गॅलरी असेल तर तिथेही काही झाडं ठेवता येतात.

*      काही घरांना गच्ची असते. गच्चीवर तर अनेक प्रकारची झाडं वाढवता येतात. त्याबद्दल सविस्तर माहिती नंतरच्या लेखांतून आपल्याला मिळेल.

*      जर आपल्या घराच्या आजूबाजूला थोडीशी जागा उपलब्ध असेल तर तिथेही झाडं ठेवता येतात.

जिल्पा निजसुरे  jilpa@krishivarada.in