‘वास्तुरंग’मधील ‘निळे आणि पांढरे बूच हा’ मोहन गद्रे यांचा लेख वाचला. हा लेख वाचून मी एकदम त्या काळातच गेलो. मला लगेच ती आम्ही वापरत असू ती रेग्झिनची पिशवी, ते अ‍ॅल्युमिनियमचे कार्ड, सगळे आठवले. तसेच आमच्या येथील एक जोशीबाई व त्या दूध वाटप करणाऱ्या बाई यांची रोजची वादावादी, भांडणे आठवली, आरोप-प्रत्यारोप सगळेच आठवले. तसेच त्या बाटलीच्या बुचांचा एक उपयोग माझी आजी करायची. ती बुचे जमवून धुवायची आणि देवळांत गेल्यावर त्यावर फुलवात लावायची. एकंदरीत लेख छानच जमला आहे.

भालचंद्र लागू

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Ramdas Tadas
पेट्रोलपंप, शेती अन् फार्महाऊस… रामदास तडस यांची संपत्ती किती? जाणून घ्या…
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

सुंदर लेख

‘वास्तुरंग’मधील ‘निळे आणि पांढरे बूच हा’ मोहन गद्रे यांचा लेख वाचला. लेख खूपच छान लिहिला आहे. या लेखामुळे जुन्या स्मृती जाग्या केल्याबद्दल लेखकाचे आभार.

सतीश कुलकर्णी, माहीम.

अंगण माणसांअभावी उजाड

‘वास्तुरंग’मधील माधुरी साठे यांचा ‘अंगण माहात्म्य’ हा लेख वाचला. लेख खूप छान लेख आहे. ज्यांनी अंगणाचा अनुभव घेतला आहे त्यांना फक्त आता त्या आठवणींवरच जगता येईल. आताच्या जमान्यात मुंबईत तर सोडूनच द्या, कोकणातसुद्धा आजही मोठी घरे आणि मोठे वाडे माणसांअभावी उजाड दिसत आहेत. एकेकाळी जिथे रोज २५-३० माणसे त्यात बसत तिथे एकटा-दुकटा माणूस कसेबसे जेवून घेतो आहे. जुनी माणसे आठवणींचे वाडे जपून ठेवून तिथेच राहात आहेत. पण त्या घराची निगराणी करणेही त्यांना आता जमत नाही. आणि एवढं करूनही शेवटी येतं कोण? गरज काय? हे प्रश्न त्यांना पडताहेत. त्यामुळे खर्च करायची ऐपत असूनसुद्धा ते गप्प आहेत. अंगण असूनही आता कितीशी मुलं तिथे जमणाार?

अनुराधा हरचेकर, गोरेगाव.

‘दूध सेंटर’ नव्हे, तर सामाजिक अभिसरण

‘वास्तुरंग’मधील मोहन गद्रे लिखित ‘निळे आणि पांढरे बूच’ तसेच सुचित्रा साठे लिखित ‘घराच्या माळ्यामंदी’ हे दोन्ही लेख केवळ ‘वस्तुस्मृती’च नव्हे, तर एकंदरीतच मागील पिढीच्या समाजजीवनाच्या आठवणींना उजाळा देणारे लिखाण होते. सकाळचे किंबहुना पहाटेचे ‘दूध सेंटर’ म्हणजे त्या त्या वसाहतीमधील एक चावडीच असे. डोळे चोळत अर्धवट झोपेत आलेले सर्वच जण एकमेकाशी खुशाली-निरोपानिरोपी तसेच काहीसे ‘गॉसिप’ करतच दुधाच्या बाटल्या घेऊन आपापल्या घरी जात. या लाकडी दूध सेंटरची रचनाही मजेशीर असे. एका बाजूस मोठ्ठा दरवाजा, तर निम्म्या बाजूस दोन अर्धवट उघडणाऱ्या खिडक्या असत. एका खिडकीत ग्राहक आपले पत्र्याचे दूध कार्ड दाखवून पैसे देत व शेजारच्याच खिडकीतून दुधाची बाटली मिळवत असे. पैसे घेणारी व्यक्ती त्या काळोख्या अंधारात मेणबत्ती किंवा मिणमिणत्या उजेडात खाकी-पिवळ्या जुन्या कागदी पुस्तकांवर ग्राहकाची नोंद करी, तर दुसऱ्या खिडकीतून त्यांचा साहाय्यक आवश्यक तशा दुधाच्या बाटल्या ग्राहकासमोर आपटत. हा सर्व व्यवहार जरी खेळीमेळीत होत असला तरी घरपोच दूध पोहोचविणारी मंडळी मात्र थोडीफार गडबड करत. मग काहीसे खटके-वादविवाद होत, पण  ही भांडणे चहाच्या कपातच विरघळून जात. दुधाच्या बाटलीची ‘बुचे’ ही एक कुतूहलाचीच बाब असे. होल-का-टोण्ड, असा प्रश्न त्या काळी परवलीचा शब्द असे. आमच्या शाळेतील एक मास्तरीणबाई या दूध सेंटरवर अर्धवेळ काम करीत. दुधाच्या बाटलीची बुचे बदलून त्या बाटल्या विकणे हा त्यांचा जोडव्यवसाय होता. त्यामुळे आमच्या शाळेत या बाईंना ‘होलका टोण्ड-टोण्डका होल’ या नावानेच ओळखले जाई. या दूध सेंटरच्या दुपारच्या वेळची मजा तर काही औरच असे. या दुधाच्या लाइनमध्येच अनेक प्रेमवीर आपापली ‘मन की बात’ सहजपणे उरकून घेत. ही दूध सेंटर्स म्हणजे त्या त्या वसाहतीचा ‘अड्डा’च असे. जाडजूड दुधाच्या बाटल्यांचे आवाज, क्रेटची आदळाआपट आणि दूध केंद्रावरील रांगेतील ‘गमतीजमती’ काही औरच होत्या.

– शरद वर्तक