|| अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

पैसे काढायचे एका कामासाठी, पण वापरायचे दुसऱ्याच कामाला असे सोसायटीचे पदाधिकारी करू शकतात का? – अनिरुद्ध गणेश बर्वे कल्याण – पश्चिम

तत्त्वत: एखाद्या कामासाठी काढलेले पैसे दुसऱ्याच कामासाठी वापरणे हे योग्य नाही आणि असे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना करता येत नाही. मात्र कुठल्या कामासाठी पैसे काढले होते आणि कुठल्या कामासाठी हे पैसे वापरले याबाबत संस्थेचा ठराव काय होता. ज्या दुसऱ्या कामासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे वापरले ते कारण किती महत्त्वाचे आहे या सर्व गोष्टी विचारात घेतल्यानंतरच याबाबतचे ठोस असे उत्तर देता येईल.

 

सरेलिटी प्रोजेक्ट, पवई या ठिकाणी एप्रिल २०१५ मध्ये बुकिंग रकमेच्या ३०% रक्कम बिल्डरकडे जमा केली होती. बिल्डरने सप्टेंबर २०१७ मध्ये सदर प्रकल्प रद्द केला. आता तर बिल्डर असे म्हणतो की, आपण दिलेली रक्कम मी दीड वर्षांने परत करीन अशा अर्थाचे तो पत्र देण्यासही तयार आहे. तर माझा प्रश्न असा आहे की, अशा प्रकारे बिल्डर एखादा प्रकल्प रद्द करू शकतो का? आणि आम्ही बिल्डरकडे जमा केलेली रक्कम कशी परत मिळवू शकतो   – निकीता मोरे पवई

खरे तर या प्रश्नांचे उत्तर देण्यापूर्वी आपण कोणत्या कागदपत्रांच्या आधारावर अथवा कोणत्या जाहिरातीवर अथवा कोणत्या माहितीपत्रकाच्या आधारावर या प्रकल्पात ३०% इतकी रक्कम गुंतवलीत हे पाहणे आवश्यक आहे. तसेच बिल्डरने कोणत्या परिस्थितीत सदर प्रकल्प रद्द केला आहे हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर सदर प्रकल्पाची जाहिरात, त्यातील देकार आदी सर्व गोष्टींवर अवलंबून आपण पैसे भरले असतील आणि प्रकल्प रद्द करण्याचे कारण बिल्डरच्या आवाक्याबाहेरील नसेल तर आपल्याला स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी दावा दाखल करता येईल, मात्र त्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेणे इष्ट ठरेल.

या सर्व गोष्टी शक्य नसतील तर आपण आपले पैसे परत घेणेच इष्ट ठरेल आपण बिल्डरकडे आपण पैसे जमा केलेल्या तारखेपासून व्याजासहित रकमेची मागणी करावी. याला जर बिल्डर तयार झाला नाही तर आपल्याला ग्राहक मंचाकडेदेखील दाद मागता येईल.

 

लहान वयातील मुलांना नॉमिनी करता येते का? माझी एक जागा मुंबईमध्ये आहे. दुसरी नवी मुंबईत सिडकोची आहे. दोन्ही ठिकाणी सोसायटी आहे. मला प्रॉपर्टी कार्ड बनवण्यासाठी काय करावे लागेल. – बाळकृष्ण पाटील, नवी मुंबई</strong>

लहान वयातील मुलांना नॉमिनी करता येते. मात्र नॉमिनेशन फॉर्ममध्ये त्यांचे वय नमूद करावे लागते. तसेच नामनिर्देशन केलेली व्यक्ती जर अज्ञान असेल तर नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्तीने अज्ञान नॉमिनीच्या वतीने काम करण्यासाठी पालक किंवा कायदेशीर प्रतिनिधी म्हणून कोणत्या तरी अन्य नॉमिनीचे नाव नॉमिनेशन फॉर्ममध्ये नमूद करावे लागते. आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नांमध्ये प्रॉपर्टी कार्ड बनवण्यासाठी काय करावे लागेल अशी विचारणा केली आहे. पंरतु आपल्याला कोणाचे प्रॉपर्टी कार्ड बनवायचे आहे हे आपण नमूद केलेले नाही. सोसायटीच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी जमिनीचे खरेदीखत अथवा जमिनीचा भाडेपट्टा करार होणे आवश्यक आहे. तसे झाले असेल तर सोसायटीचे नाव प्रॉपर्टी कार्डावर दाखल करता येईल अथवा वेगळे प्रॉपर्टी कार्ड बनवता येईल. आमच्या मते, सोसायटीतील सदस्यांच्या नावे वेगळे असे प्रॉपर्टी कार्ड बनत नाही.

ghaisas2009@gmail.com