|| डॉ. मिलिंद पराडकर

भारतातील मध्ययुगीन कालखंड हा निरनिराळ्या विख्यात राजघराण्यांसाठी प्रसिद्ध आहे. गुप्तवर्धन पालांपासून ते चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, चोल, पांडय़, चेर, पल्लव अन् गंग  या साऱ्याच घराण्यांच्या शासनकाळामध्ये मध्ययुगात दुर्गाची विपुल रचना झाली. त्यातही गिरिदुर्गाच्या रचनेवर अधिक भर दिला गेला. दुर्ग उंचीवर असल्यामुळे येणारा शत्रू लांबवरून अगदी सहजच दिसत असे. त्यामुळे दुर्गावरील शिबंदीस सज्ज होण्यास वेळही मिळत असे. कारण येणारा शत्रू मार्गातील नद्यानाले ओलांडत, घनदाट अरण्यामधून मार्ग काढत येणार. वेढा घालणार अन् मग त्यातून श्वास सावरला की मग तो त्या दुर्गाच्या चढावर पाय घालणार. या साऱ्याच गोष्टी एवढय़ा कालापव्यय करणाऱ्या होत्या की, दुर्गावरील फौज स्वसंरक्षण अन् प्रतिआक्रमण या दोन्ही दृष्टींनी आक्रमकांपेक्षा निश्चितच वरचढ ठरे.

सह्य़ाद्रीतले सारेच दुर्ग उत्तुंग अशा पर्वतशिखरांवर बांधलेले आहेत. बहुधा हे सारेच मध्ययुगीन दुर्ग समुद्रसपाटीहून सरासरी तीन हजार फुटांच्या उंचीवर रचलेले आहेत. दुर्गस्थळ निवडताना भौगोलिक परिस्थिती पूर्णतया विचारात घेतली जात असे. या भौगोलिक घटकांचा उपयोग करून दुर्ग जास्तीत जास्त दुर्गम करण्यात येत असे. तेही पुरेसे भासले नाही तर त्यांच्या जोडीला कृत्रिमरीत्या म्हणजेच तटबंदी, वेगळी द्वाररचना यांच्या मदतीने दुर्ग जास्तीत जास्त दुष्कर करण्यावर भर दिला जात असे. जेणेकरून संभाव्य आक्रमणास जास्तीत जास्त परिणामकारकरीत्या तोंड देता यावे.

‘कामंदकीय नीतिसार’ या गुप्तकाळात लिहिलेल्या प्राचीन ग्रंथात याबद्दलचा अतिशय सुबोध उल्लेख आहे :

पृथुसीम महाखातमुच्चप्राकारगोपुरम् ।

समावसेत् पुरं शैलं सरिन्मरूवनाश्रयम् ॥

– ‘राजाने खोल खंदक असलेल्या, उंच तटबंदीने वेढलेल्या व भक्कम द्वारांनी युक्त अशा अन् नद्यांनी, अरण्यांनी वा वाळवंटाने वेढलेल्या प्रदेशातील दगडी दुर्गामध्ये निवास करावा.’

जलवद् धान्यधनवद् दरुग कालसहं महत।

दुर्गहीनो नरपतिर्वाताभ्रावयवै: सम: ॥

– ‘कालप्रवाहाला तोंड देणारा हा दुर्ग जलाने, धनधान्याने परिपूर्ण असावा. दुर्ग नसलेला राजा हा सोसाटय़ाच्या वाऱ्यासमोरील ढगांच्या पुंजक्यासारखा असतो.’

औदकं पार्वतं वाक्र्षमरिणं धान्वनं तथा।

शस्तं प्रशस्तमतिमिदरुग दुर्गोपचिन्तकै॥

– ‘जलदुर्ग, गिरिदुर्ग, अरण्यदुर्ग व मरूदुर्ग हे दुर्गप्रकार अभेद्य आहेत, असे शास्त्रांच्या अभ्यासकांचे व दुर्ग रचणारया तज्ज्ञांचे मत आहे.’

जलान्नायुधयन्त्राढयं वीरयौधरधिश्रितम्।

गुप्तिप्रधानमाचार्या दरुग समनुमेनिरे॥

– आचार्याच्या मते, जल, अन्न, आयुधे, यंत्रे, वीर-योद्धे अशांनी युक्त अन् संरक्षणास सज्ज हा दुर्ग सर्वोत्तम म्हणावा.

सापसारणि दुर्गाणि भुव: सानूपजान्गला:।

निवासाय प्रशसन्ते भूभुजां भूतिमिच्छताम् ॥

– ‘जो देश, भूमार्ग व जलमार्ग या दोहोंनी जोडलेला आहे, जो संकटप्रसंगी राजास आपल्या प्रदेशातील दुर्गामध्ये सामावून घेतो, आश्रय देतो- तो देश विजिगीषू राजासाठी उत्तम मानावा!’

नेमकी काहीशी अशीच भावना सतराव्या शतकात कवी परमानंदांनी ‘शिवभारत’ या शिवचरित्रग्रंथात अतिशय अचूक शब्दात मांडली आहे. कवी परमानंद म्हणतात :

‘न दरुग दुर्गमित्येव दुर्गमं मन्यते जन:। तस्य दुर्गमता सव यत्प्रभुस्तस्य दुर्गम:॥

प्रभुणा दुर्गमं दरुग प्र्भुदुग्रेण दुर्गम:। अदुर्गमत्वादुभयोर्विद्वषन्नेव दुर्गम:॥

संति ते यानि दुर्गाणि तानि सर्वाणि सर्वथा। यथा सुदुर्गमाणि स्युस्तथा सद्यो विधीयताम्॥’

– ‘दुर्गाला केवळ दुर्ग म्हणूनच लोक दुर्गम मानत नाहीत, तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची खरी दुर्गमता. प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू दुर्गम होतो. दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो. म्हणूनच तुमचे जे दुर्ग आहेत ते ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबडतोब करा.’

हा उपदेश वयोवृद्ध सोनोपंत डबीरांनी सतरा-अठरा वष्रे वयाच्या शिवछत्रपतींना केलेला आहे. वडिलधाऱ्यांची ती आज्ञा शिवछत्रपतींनी किती निष्ठेने अमलात आणली हे पुढे घडलेल्या इतिहासाने अचूकपणे दाखवून दिले आहे.

मदानी प्रदेशातील मध्ययुगीन दुर्ग बहुधा नद्यांच्या व जलस्रोतांच्या काठी बांधले गेले, यामागे विचार असा की, त्या दुर्गास निदान एका बाजूने तरी नसíगक खंदक लाभेल. उस्मानाबादजवळचा नळदुर्ग, पिरडा ही या प्रकारच्या दुर्गाची उत्तम उदाहरणे आहेत. ते जलस्रोत सापडले नाही तर देवगिरीचा दुर्ग जसा रचला आहे त्या प्रकारे एखादी छोटीशी टेकडी मधोमध घेऊन त्याभोवताली शहरे अन् त्यांना वेढून तटबंदी अशा अतिशय वेगळ्या पद्धतीने मध्ययुगात भूदुर्ग रचले गेले. गिरिदुर्ग रचण्याचे वेगळे शास्त्रच निर्माण झाले. मलोन् मल धावणारी वेगवेगळ्या पातळीवरली दुहेरी वा तिहेरी तटबंदी, मारगिरीसाठी योजलेले, तटबंदीतल्या जंग्यांचे वेगवेगळे प्रकार, महाद्वारावरले अणकुचीदार खिळे, हे सारेच मध्ययुगीन दुर्गाचे विशेष ठरले! या पद्धतीचे दुहेरी वा तिहेरी तटबंदीचे बांधकाम गोवळकोंडा, बीदर, देवगिरी, वेल्लोर, जिंजी या दुर्गामध्ये पाहायला मिळते. पकी गोवळकोंडा, बीदर व वेल्लोर हे भूदुर्ग आहेत. सपाटीवर रचलेले दुर्ग आहेत. तर जिंजी व देवगिरी हे गिरिदुर्ग आहेत.

प्रचंड उंचीचे अन् रुंदीचे तट, त्यांना मजबुती देणारे ठरावीक अंतरावरचे बुरूज, महाद्वारांची दुहेरी बांधणी, त्यांचे सर्पाकार प्रवेशमार्ग, तटबंदीच्या माथ्यावरचे कमलदलाच्या आकाराचे अलंकरण असलेले परकोट, द्वारांवरचे नक्षीदार शिल्पपट्ट, बाकदार कमानी, दाराखिडक्यांच्या नक्षीदार व अलंकृत चौकटी – ही सारीच मध्ययुगीन दुर्गाची वैशिष्टय़े ठरली. अन् ही वैशिष्टय़े केवळ मध्ययुगातच नव्हे, तर अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत उपयोगात आणली गेली. पुण्याचा शनिवारवाडा अन् गोवळकोंडय़ांच्या एका भागाचे पुनर्निर्माण हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

या प्रकारचे बांधकाम पश्चिमी देशांत जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वी थांबले होते. बदललेली युद्धसाधने हे याचे कारण होते. लांब पल्ल्याच्या अवजड तोफा अन् बंदुकांच्या प्रसारामुळे लष्करी बांधकामाच्या प्राथमिक कल्पनाच मुळी बदलल्या होत्या. हे वारे या देशी वाहायला वेळ लागला. नाही म्हणायला देवगिरी व बीदर येथील तोफांचे दमदमे ही काहीशी अपवादात्मक उदाहरणे म्हणावी लागतील.

दुर्गाकडे जाणारा मार्ग कठीण असण्यावर भर दिला गेला. तो जर कठीण नसला तर तो कृत्रिमरीत्या तसा केला गेला. गिरिदुर्गाच्या बाबतीत कडे तासून ते कठीण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. सह्य़ाद्रीच्या विक्राळ कडय़ांचा अन् दऱ्यांचा पुरेपूर उपयोग मध्ययुगीन दुर्ग रचताना केला गेला आहे. हा वारसा नि:संशयपणे सातवाहनांकडून चालत आला आहे. जीवधन, रतनगड, ब्रह्मगिरी वा त्र्यंबकदुर्ग यांसारख्या दुर्गाची खडकातून कातून काढलेली रचना पाहिली तर अक्षरश: तोंडात बोटे जातात! ही कला अन् कल्पना मुळात सातवाहन राजांची. त्यांनी प्रथम ती अमलात आणली अन् मध्ययुगीन कालखंडात तिचा विकास झाला.

खंदकावरील ओढून घेता येणारे पूल हेही मध्ययुगीन दुर्गाचे एक वैशिष्टय़. एकापाठोपाठ एक, दोन, तीन किंवा चार दारे बांधायची पद्धत या काळात रूढ झाली. ही महाद्वारे बाहेरच्या बाजूने दिसू नयेत म्हणून ती झाकण्यासाठी चिलखती भिंतींची योजना करण्यात आली. कधी अशी एक भिंत तर कधी दोन भिंती उभ्या करण्यात आल्या. बीदर, देवगिरी, गोवळकोंडा ही या प्रकारच्या बांधकामाची अतिशय उत्तम अशी उदाहरणे आहेत. पन्हाळ्याचे तीन व चार दरवाजे हीसुद्धा सुयोग्य अशी उदाहरणे आहेत. या महाद्वारांच्या माथ्यावर असलेले व रुंदीच्या थोडे बाहेर असलेले छज्जे हासुद्धा संरक्षणात्मक आक्रमणाचा एक उत्तम प्रकार होता. गोवळकोंडा व बीदर येथील महाद्वारे याच पद्धतीने बांधलेली आहेत. बीदरच्या मांडू दरवाजात जाण्यासाठी एका भुयारातून रस्ता आहे. नाशिकजवळच्या अजिंठा-सातमाळा रांगेतील रवळ्या-जवळ्या, इंद्राई, तर कर्जतजवळच्या कोथळीगड या चालुक्यकालीन दुर्गावर डोंगराच्या पोटातून माथ्यावर जाण्यासाठी उभे भुयार कोरून त्यात चक्राकार जिने ठेवलेले आहेत. मात्र पश्चिमी देशांमध्ये सर्रास आढळणाऱ्या, कप्प्यांच्या साहाय्याने वरून खाली सोडता येणाऱ्या दरवाजांचा (पोर्टकलिस) पूर्णत: अभाव आहे.

दुर्गाची मुख्य गरज म्हणजे पाणी. हे लक्षात घेऊन साऱ्याच मध्ययुगीन दुर्गामध्ये पाण्याची मुबलक सोय केलेली आढळते. इथे नसíगक स्रोतांचा उपयोग तर केला आहेच, पण कृत्रिम तऱ्हेने पाणी साठवून, पाण्याचे दुíभक्ष जाणवणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. पाण्याची मुबलकता आणि उत्तम जलव्यवस्थापन हे प्राचीन आणि मध्ययुगीन दुर्गाचे वैशिष्टय़ मानले जाते. अगदी हीच काळजी मध्ययुगाच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या दुर्गामधील धान्याची वा तत्सम साठवणुकीची कोठारे निर्माण करण्यातही घेण्यात आलेली आहे. शिलाहारांच्या पन्हाळ्यावरली धान्यकोठारे तर प्रसिद्ध आहेत. यासाठी कधी कधी दुर्गावर असलेल्या लेण्यांचाही उपयोग या कामासाठी केला गेलेला दिसतो. उदाहरणच द्यायचे झाले तर नाणेघाटाजवळील जीवधनच्या वा लोणावळ्याजवळील लोहगडाच्या प्रचंड लेण्याचे द्यावे लागेल.

चालुक्यांची राजधानी म्हणून ओळखला जाणारा बदामीचा दुर्ग दख्खनची राजधानी म्हणून सहाव्या शतकाच्या मध्यापासून ते नवव्या शतकापर्यंत अशी जवळजवळ तीनेकशे वष्रे विख्यात होता. या दुर्गाच्या कडय़ात खोदलेली जैन लेणी हेच सांगतात की, हा दुर्ग बहुधा सहाव्या शतकाच्या मध्यास सत्याश्रय पुलकेशीच्या काळात रचला गेला. मात्र हा दुर्ग त्याहीपेक्षा प्राचीन असावा यात शंका नाही. टॉलेमीच्या लिखाणात याचा उल्लेख ‘बदियामाची’ असा आढळतो. चालुक्यांनी ताब्यात घेण्यापूर्वी तो पल्लवांच्या ताब्यात होता, वातापिदुर्ग या नावाने!

हा दुर्ग दोन डोंगरांवर वसलेला आहे. जैन लेणी ही दक्षिणेकडील दुर्गाच्या कडय़ाच्या पोटात आहेत. ‘रणमंडल’ हे या दक्षिण दुर्गाचे नाव तर ‘बावनबंदे कोट’ हे उत्तरेकडल्या दुर्गाचे नाव. दोन्ही दुर्गामध्ये साधारणत: हजारभर फुटांचे अंतर तर जमिनीपासूनची उंची अदमासे तीनशे फूट. दोन्ही दुर्गाना तळातून वेढणारा तट व त्याला एक दरवाजा. ही सारी तटबंदी दगड व मातीची. दरवाजाची बांधणी अतिशय मजबूत. काही ठिकाणची तटबंदी प्रचंड आकाराच्या दगडांनी बनवलेली आहे. तटबंदीत नेमक्या माऱ्याच्या जागी बुरूज रचलेले आहेत. तीरांचा वर्षांव करण्यासाठी जंग्या आहेत. शहरातून दुर्गावर जाणाऱ्या मार्गावर दगडी पायऱ्या आहेत. काही एक-दोन दगडी खोल्या अन् कोठार वगळता दुर्गमाथा उजाड आहे. पाण्याच्या सोयीसाठी खडकात कोरलेली चारदोन टाकी आहेत. ही झाली बावनबंदे कोटाची कथा. तर रणमंडल हा दुर्ग थोडा अधिक दुर्गम, विकराळ व तितकाच उजाडसुद्धा आहे. काही ठिकाणी दुहेरी तटबंदीचेही अवशेष आढळतात. इमारतींचे पुरावे आढळत नाहीत. पाण्याची एकदोन टाकीच आज अस्तित्वात आहेत.

चालुक्यांनंतर राष्ट्रकूट, यादव, विजयनगर, मग बहमनी सुलतान, सावनूर नबाब, पेशवे, हैदर, मग पुन्हा पेशवे अन् सरतेशेवटी इ.स. १८१८ मध्ये ब्रिटिश सेनानी जनरल मुन्रोच्या ताब्यात, असा या दुर्गाचा धावता इतिहास.

शेवटचा चालुक्य राजा कीíतवर्मा याचा पाडाव करून दंतिदुर्गाने मान्यखेट (जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक) इथे राष्ट्रकूट राजवटीचा प्रारंभ केला. ही सर्वस्वी मदानी राजधानी होती अन् ती महाराष्ट्रातही नव्हती. मात्र काहींच्या म्हणण्यानुसार राष्ट्रकुटांची पहिली राजधानी सह्य़ाद्रीच्या अजिंठा-सातमाळा डोंगररांगेतील ‘मरकडा’ या दुर्गावर होती. मात्र या विधानाची प्रमाणे दुर्मीळ आहेत. या दुर्गाचे दुसरे नाव ‘मयूरखंडी’ असेही नोंदलेले आढळते (मात्र राष्ट्रकुटांचे मयूरखंडी हे कर्नाटकात आहे). समुद्रसपाटीपासून सुमारे ४३०० फूट उंचीवर असलेला मरकडा हा दुर्ग दुर्गम असला तरी अगदीच लहानसा आहे. अध्र्या तासात फिरून होण्याजोगा आहे. सप्तशृंगी ते चांदवड या दुर्गाच्या मालिकेतला एक लहानसा दुर्ग यापलीकडे त्याचे फारसे महत्त्व असेल असे वाटत नाही. नाशिक जिल्ह्यच्या उत्तरेकडील अहिवंत दुर्गापासून ते चांदवडपर्यंत पसरलेल्या अजिंठा-सातमाळा रांगेतले बहुतेक दुर्ग चालुक्य, राष्ट्रकूट राज्यकर्त्यांच्या काळात, उत्तरेतून होणारी आक्रमणे थोपवण्यासाठी निर्मिले गेले. या आठ-नऊ दुर्गाच्या साखळीतली दुर्ग मरकडा ही एक कडी आहे. या दुर्गाची भौगोलिक स्थिती अन् साखळीतील इतर दुर्गाचे साहचर्य पाहिले तर राष्ट्रकुटांसारख्या सामथ्र्यशाली राजवटीची राजधानी या दृष्टीने या दुर्गाचे स्थान निरतिशय विवादास्पद आहे- किंबहुना अशक्य वाटण्याजोगे आहे.

इथे दुसरे मत विचारात घेण्याची आवश्यकता भासते. इ.स. ७९४च्या सुमारास राष्ट्रकुटांचा तिसरा गोविंद हा राज्यावर आला. हा इ.स. ८१४च्या सुमारास निधन पावला. याच्या राजवटीच्या काळात इ.स. ८०५ ते ८१३ या कालावधीतले नऊ ताम्रपट सापडले आहेत. या सर्व ताम्रपटांमध्ये राजाच्या वास्तव्याचे ठिकाण मयूरखंडी असे नमूद करण्यात आले आहे. मात्र हे ठिकाण मरकडा हा दुर्ग नसून मयूरखंडी- मोरखंडी- जि. बीदर, हे कर्नाटकातील स्थान आहे. गंग, चोल, पांडय़, पल्लव व चेर नरेशांनी राष्ट्रकुटांविरुद्ध उठाव केल्यामुळे तिसरा गोविंद त्याच्या आयुष्याची शेवटची दहा वष्रे दक्षिणेतच मुक्कामाला होता अन् तो या मयूरखंडीमध्ये होता. तत्पूर्वी त्यांची राजधानी वेरुळ ही होती. वेरुळचे कैलास लेण्यासारखे अद्वितीय शिल्पकृत्य हे बहुधा या राजधानीच्या साहचर्यामुळे रचणे शक्य झाले असावे. जवळजवळ इ.स. ८०० पर्यंत वेरुळ हीच राष्ट्रकुटांची राजधानी होती.

राष्ट्रकुटांचे राज्य दुबळे होण्यास सुरुवात झाली त्या सुमारास किंवा त्याच्याही काहीसे अगोदर त्यांचे सामंत असलेल्या शिलाहार आणि नंतरच्या काळात यादवांनी स्वत:च्या राज्यस्थापनेच्या हालचाली करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र अन् कर्नाटकाच्या संलग्न प्रदेशात शिलाहार वंशाच्या ज्या अनेक शाखा होत्या त्यांच्यापकी पश्चिम किनारपट्टीवर शासन करणाऱ्या तीन प्रमुख शाखा होत्या- पहिली शाखा उत्तर कोकणातील शिलाहारांची असून त्यांच्या राज्यात आजच्या मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यंचा समावेश होता. यांची राजधानी श्रीस्थानक अथवा आजचे ठाणे ही होती. पुरी वा घारापुरी ही उत्तर कोकणच्या शिलाहारांची प्रारंभीच्या काळातील राजधानी होती. मात्र चालुक्य सत्याश्रय पुलकेशीच्या आक्रमणाच्या वेळी तो दुर्ग पाडाव झाला. अपराजिताने ती राजधानी इ.स. ९७५ ते १०१०च्या दरम्यान ठाण्यास हलवली. त्यानंतर उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीच्या अखेपर्यंत ती त्यांची राजधानी राहिली.

दुसरी शाखा दक्षिण कोकणच्या शिलाहारांची असून, त्यांच्या राज्यात दक्षिणेकडील रत्नागिरी, सिंधुदुर्ग अन् गोव्याचा समावेश होता. यांची राजधानी बलिपट्टण, बलियट्टण, बालेयपट्टण किंवा आजचे खारेपाटण ही होती. याचे उल्लेख ग्रीक लेखक टॉलेमीने त्याच्या लिखाणात अन् वराहमिहीराने बृहत्संहितेत केले आहेत. म्हणजेच हे नगर पूर्वीपासून अस्तित्वात होते, मात्र या नगरास तटबंदी बांधून दुर्गरूप देऊन धम्मियार शिलाहाराने ते राजधानी म्हणून निवडले.

तिसरी शाखा कोल्हापूरच्या शिलाहारांची. त्यांच्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर व कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यंचा समावेश होता. कोल्हापूरचे शिलाहार तगरपूर हे आपले मूलस्थान मानतात. तगर ही प्राचीन ऐतिहासिक नगरी. आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यतील तेर म्हणजेच तगर. शिलाहार राजे स्वत:स ‘तगरपुराधीश्वर’ असे बिरुद लावतात. त्यावरून कदाचित तगर ही त्यांची सुरुवातीच्या काळातील राजधानी असावी. या शाखेच्या तीन राजधान्या असल्याचे उल्लेख त्यांच्या कोरीव लेखांत आढळतात. यांपकी पहिली राजधानी पर्णालदुर्ग, प्रणालक वा पद्मनाल – पन्हाळगड, दुसरी राजधानी क्षुल्लकपूर म्हणजे सध्याचे कोल्हापूर तर तिसरी वलिवाड किंवा वलयवाड – कोल्हापूरच्या पूर्वेस १० कि.मी.वर असलेले वळिवडे ही होय. या घराण्यातील जतिग शिलाहाराचा उल्लेख ‘पन्नाल-दुर्गाद्रि-सिंह’ असा करण्यात आलेला आहे. या शाखेतील अखेरचा राजा, दुसरा भोज (इ.स. ११७५  ते १२१२). आपल्या कारकीर्दीच्या आरंभी तो चालुक्यांचा सामंत होता. तो स्वत:ला महामंडलेश्वर म्हणवत असे. त्याच्या काळात चालुक्य घराण्याची सत्ता मावळत होती अन् त्यांची जागा देवगिरीचे यादव घेऊ पाहत होते. या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेत भोजराजाने जागोजागी प्रचंड दुर्ग उभारले. स्वत:चे सामथ्र्य वाढवत त्याने राजाधिराज व पश्चिमतटचक्रवर्ती ही बिरुदे धारण केली. केंजळगड, चंदन, वंदन, रांगणा, भूधरगड, खेळणा, गगनबावडा, कल्याणगड, वसंतगड, वैराटगड, पन्हाळा, अजिंक्यतारा, पांडवगड, पावनगड, सामानगड हे पंधरासोळा किल्ले रचण्याचे श्रेय भोज राजाकडे जाते. पर्णालदुर्ग, पन्नगालय, प्रणालक अशा नावांनी उल्लेख असलेला विख्यात पन्हाळा ही भोजाची राजधानी होती.

माथ्यावर भले विस्तीर्ण पठार असलेला, साडेचार मल घेराचा पन्हाळा हा दुर्ग साधारण तीनशे-चारशे फूट उंचीच्या उभ्या कडय़ाने वेढलेला आहे. बुरुजांची ठिकठिकाणी मजबुती लाभलेला तट बऱ्याच ठिकाणी पंधरा ते तीस फूट रुंदीचा आहे. चार दरवाजा अन् तीन दरवाजा या नावाचे दोन भक्कम दरवाजे या दुर्गाला लाभले आहेत. वाघदरवाजा या नावाचा अजूनही एक दरवाजा उत्तरेकडे आहे. राजिदडी नावाची चोरवाटसुद्धा आहे. गंगा, यमुना अन् सरस्वती या नावांची तीन भली प्रचंड कोठारे बालेकिल्ल्यात आहेत. या पद्धतीचे बांधकाम महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही दुर्गावर नाही. अंधारबाव नावाची पायऱ्यांची दुमजली विहीर हे या दुर्गावरील आणिक एक वैशिष्टय़.

मात्र अतिशय कमी उंची, हे या दुर्गाचे मोठे वैगुण्य म्हणता येईल. पायथ्यापासून फक्त तीनशे-चारशे फूट. आजूबाजूला, मसाईचे पठार सोडले, तर मलोगणती दुसरा डोंगर नाही. भोवताली नदीचा वेढा नाही. उंच कडे नाहीत की पाताळावेरी पोचलेल्या दऱ्या नाहीत. उत्तरकाळात शिवछत्रपतींनी जे युद्धशास्त्र अंगीकारले त्या दृष्टीने पाहिले तर अगदी कुचकामी दुर्ग म्हणायचा हा. मात्र केवळ स्वराज्याची दक्षिण सीमा राखणारा दुर्ग, हीच काय ती याची मोठी जमेची बाजू. मग बहुधा याच कारणासाठी यास ताब्यात ठेवायची धडपड मराठय़ांस कायमच करावी लागली!

या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावी लागेल की, एरवी शिलालेख वा ताम्रपटात दुर्गाचे उल्लेख सापडत नाहीत. मात्र यालाही अपवाद आहेतच :

शिलाहार गंडरादित्याच्या कोल्हापूर ताम्रपटातील दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत म्हटलंय:

जयति जयति रूढो राजलक्ष्मीनिवास: प्रविजितरिपुवग्र्गस्वीकृतोत्कृष्ट्दुग्र्गस्सकळसुकृतवासो..

म्हणजे, जो राजलक्ष्मीचे निवासस्थान आहे, ज्याने शत्रूला जिंकले आहे, ज्याने उत्कृष्ट दुर्ग ताब्यात आणिले आहेत, ज्याच्या ठिकाणी सर्व सुकृतांचा निवास आहे..

तर स्वये शिवछत्रपतींनी कोरवून घेतलेला रायगडाचा तो प्रसिद्ध शिलालेख म्हणतो :

..श्रीमद्रायगिरौगिरामविषयाहिराजिनानिर्मित:

म्हणजे, गिरेचा – वाणीचा – विषय असलेला हा रायगड हिराजीने निर्मिला!

discover.horizon@gmail.com