संस्थेच्या वार्षिक तसेच मासिक सभेत असा ठराव संमत झाला, की संस्थेच्या सामाईक जागेत (उदा. जिना, दरवाजाच्या बाहेरची जागा) कचरा डबा, चप्पल इ. गोष्टी ठेवू नयेत. परंतु याकडे संस्थेच्या दोघा सदस्यांनी हे नियम पाळले नाहीत. यावर काही कायदेशीर उपाय आहे का? त्यांना स्मरणपत्र पाठवूनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
– राजन रानडे
* संस्थेच्या सार्वजनिक जागेबद्दल नियम करण्याचा अधिकार संस्थेच्या सर्वसाधारण सभेलाच असतो. त्यामुळे त्यांनी केलेले नियम हे सभासदांनी पाळणे जरूरीचे असते. परंतु काही सदस्य हे नियम पाळत नसतील तर त्यांना दंड करण्यासंबंधीचा ठराव हा सर्वसाधारण सभेकडून मंजूर करून घ्यावा व त्या सदस्यांना दंड लावावा. त्यांनी न दिल्यास तो त्यांच्या बिलामध्ये दाखवावा. त्यावर सरळ व्याजाने व्याज आकारणी करावी. ही रक्कम फारच मोठी झाल्यास त्या सभासदाविरुद्ध कलम १०१ अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करावी.
* नॉमिनेशन फॉर्ममध्ये ज्याचा उल्लेख ‘नॉमिनी’ म्हणून असतो त्याला नक्की काय अधिकार असतात?
– राजन रानडे
* जर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात नॉमिनीला सदस्याची मालमत्ता आपल्या नावे (नॉमिनी म्हणून) करून घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यासाठी त्याला उपविधीमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
* नॉमिनेशन केलेली व्यक्ती जर त्या सदस्याच्या पश्चात संबंधित सदनिकेची मालक होत नसेल तर नॉमिनेशन का करायचे? यासंदर्भात कायदा काय, याबद्दल मार्गदर्शन करावे.
– राजन रानडे
* या ठिकाणी एक गोष्ट तमाम वाचकांसाठी स्पष्ट करू शकतो ती म्हणजे नॉमिनी म्हणजे अशी व्यक्ती की जिच्याशी गृहनिर्माण संस्था एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर त्वरित संपर्क साधू शकते. मृत सदस्याला किती वारस आहेत हे गृहनिर्माण संस्थेला माहीत असणे अभिप्रेत नाही. म्हणून त्या सदस्याला मृत्यूनंतर दैनंदिन कारभारात अडथळा येऊ नये म्हणून तसेच कोणतीही कायदेशीर बाब दैनंदिन व्यवस्थेच्या आड येऊ नये यासाठी नॉमिनेशनची तरतूद केलेली आहे.
म्हणून प्रत्येक सदस्याने नॉमिनेशन करणे उत्तम होय. नॉमिनी व्यक्ती मृत सदस्याची वारस असू शकते, परंतु ती वारसच असली पाहिजे असा काही नियम नाही.
* आमच्या संस्थेच्या अध्यक्षांनी त्यांच्या वडिलांच्या सोबत सदनिका खरेदी केली आहे. करारनाम्यामध्ये अध्यक्षांच्या वडिलांचे नाव प्रथम तर अध्यक्षांचे नाव दुसरे आहे तर ते संस्थेचे अध्यक्ष राहू शकतात का?
– महेंद्र मोने, ठाणे.
* आपल्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे आहे. मात्र त्यांच्या वडिलांनी सभेला हजर राहून मतदान करता कामा नये. प्रथम नाव असणाऱ्या सदस्याच्या अनुपस्थितीत दुसरे नाव असणाऱ्या व्यक्तीला सदस्य म्हणून सर्व अधिकार प्राप्त होतात. या ठिकाणी आपण आपल्या अध्यक्षांकडून त्यांच्या मुलाला म्हणजे आपल्या अध्यक्षाला सहयोगी सदस्य करून घ्यावे हे उत्तम. त्यामुळे पुढील सर्व गुंतागुंत टळेल.
* अनधिकृत सदनिकाधारक हा संस्थेचा सभासद बनू शकतो का? (मालमत्ता कराच्या देयकांमध्ये सदर सदनिका अनधिकृत म्हणून दाखवलेली आहे.)
– महेंद्र मोने, ठाणे.
* एकदा का एखाद्या इमारतीमधील रहिवाशांची संस्था नोंद झाली व त्या सदनिकाधारकाचे नाव गृहनिर्माण संस्था नोंद करताना दाखल केले गेल्यावर तो संस्थेचा सभासद बनतो. सभासद होण्यासाठी संस्थेच्या बांधकामाच्या अधिकृत/अनधिकृत बांधकामाशी तो विषय संलग्न राहत नाही. एकदा का एखाद्याला सदस्य होता आले की तो आपोआपच संस्थेतील कोणतेही पद धारण करू शकतो.
* आमचे एक नातेवाईक विनाअपत्य वारले,मात्र त्यांनी त्यांची शेतजमीन त्यांना मूलबाळ नसल्याने आपल्या पुतण्यांच्या नावे मृत्युपत्राद्वारे केली आहे. या अनुषंगाने मला विचारायचे आहे की, मृत्युपत्राने आपली जमीन पुतण्याच्या नावे करता येते का?
– विनायक आठवले, अलिबाग, रायगड
* एखाद्या व्यक्तीला आपली जमीन मृत्युपत्राने हस्तांतरित करता येते. मात्र ती जमीन त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता आसली पाहिजे. किंवात्यांची त्या जमिनीची मालकी निर्धोक असणे  गरजेचे आहे. वडिलोपार्जित मालमत्तेची मालकी त्यांचा हिस्सा वगळून मृत्युपत्राने हस्तांतरित करता येत नाही.
* सदर मृत्युपत्रावर प्रोबेट घ्यायला लागेल का?
– विनायक आठवले
* खरे तर मृत्युपत्रावर प्रोबेट देणे चांगलेच असते. मंबईसारख्या ठिकाणी तर प्रोबेट घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र अन्य ठिकाणी जर वारसांमध्ये आणि लाभार्थीमध्ये वाद नसेल तर विनाप्रोबेटदेखील मालमत्तेचे हस्तांतरण करता येते.