News Flash

वास्तुसंवाद : तेजाचे ऋण

तेजोमयी प्रकाश आपल्या वास्तूतही जर योग्य प्रमाणात असेल तर दैनंदिन जीवनात त्याचे अनेक उत्तम फायदे मिळतात.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा पुराणिक

‘‘आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने।

आयु: प्रज्ञा बलं वीर्यम् तेजस्तेषां च जायते’’।।

या दृढ भावनेने सूर्याची उपासना करणारी आपली संस्कृती आणि ‘भा’ म्हणजे ‘तेजा’ची सदैव आस धरणारा आपला भारत देश.

खरोखरच, या तेजोनिधी भास्कराच्या अस्तित्वाने अणुरेणू उजळून निघतात. इतकेच नाही तर सृष्टीतील अनेक उत्तमोत्तम बदलांचा आणि अखिल विश्वाचा कारक असा सूर्यप्रकाश प्रसंगी दाहक असला तरी सृजनशील आहे. वसंतऋतूत तर अनेक रंग-गंधांचे साज ल्यायलेली सृष्टी तेजाने न्हाऊन निघत असते आणि आरोग्यपूर्ण जीवन प्रदान करते.

असा तेजोमयी प्रकाश आपल्या वास्तूतही जर योग्य प्रमाणात असेल तर दैनंदिन जीवनात त्याचे अनेक उत्तम फायदे मिळतात. म्हणूनच अंतर्गत रचना करताना ऊर्जा कार्यक्षम अशी रचना करणे

(Energy Efficient Design) महत्त्वाचे. नैसर्गिक सूर्यप्रकाश अधिकाधिक मिळेल आणि वायुवीजन होईल अशा प्रकारे इमारतीची आणि दारे-खिडक्यांची रचना करणे खरे तर अत्यंत गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र या गोष्टी अंतर्गत रचनाकाराच्या कक्षेत येत नाहीत. तेव्हा खिडक्यांना पारदर्शक काचा बसविणे आणि नैसर्गिक सूर्यप्रकाश घरात येण्यास वाव देणे हे तर आपण नक्कीच करू शकतो. गडद रंगाच्या काचांमुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश घरात येण्यास अटकाव होतो आणि मग कृत्रिम प्रकाश स्रोतांची (Artificial Lighting) अधिकाधिक गरज भासते. नैसर्गिक सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात घरात येत असेल तर एक प्रकारे आपले वीज बिल कमी करण्यास आणि अर्थातच ऊर्जा वाचविण्यात मदत करतो.

नैसर्गिक सूर्यप्रकाश हा आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास आवश्यक असतो. सर्वसाधारणपणे आपण पाहतो की, ज्या खोलीत सूर्यप्रकाशाचा अभाव आहे तेथे नराश्यपूर्ण वातावरण जाणवते. याउलट ऑफिसमध्ये किंवा अभ्यासाच्या खोलीतही भरपूर नैसर्गिक प्रकाश असेल तर काम करायला किंवा अभ्यास करायला उत्साहपूर्ण वातावरण तयार होते. शास्त्रीयदृष्टय़ा बघितले तर नैसर्गिक प्रकाशात सेरोटोनिन आणि एन्डोरफीन या दोन्ही घटकांचे शरीरातील प्रमाण वाढते, जे घटक मानसिक रोग आणि नराश्य कमी करण्यास मदत करतात.

तसेच अंधाऱ्या आणि ओल्या जागेत जिवाणूंची पदास लवकर होते. सूर्यप्रकाशात जिवाणू नष्ट होऊन त्या जागेची स्वच्छता आणि आरोग्य राखले जाते. तसेच ultra-violet किरणे ही र्निजतुकीकरणाचे काम करतात. याव्यतिरिक्त सूर्यप्रकाशातून मिळणारे ‘डी’ जीवनसत्त्व लहान मुलांमधील मुडदूस (Rickets) आणि मोठय़ांमधील ऑस्ट्रोकोपोरोसिस या रोगांना अटकाव करते. अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश येणे अत्यंत आवश्यक आहे.

मुद्दाम उल्लेख करावा अशी एक गोष्ट येथे नमूद करत आहे. भारताच्या भौगोलिक रचनेचा विचार केला तर वास्तूच्या आग्नेय दिशेस सूर्यकिरण सकाळच्या वेळी प्रखरपणे पोचतात. या शास्त्राधारानुसार, जागेच्या आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावे असे भारतीय वास्तुशास्त्रात सांगितले जाते. परंतु काळानुसार बांधकामाच्या पद्धतीत बदल होतात, तंत्रज्ञान बदलते, शहरीकरणातून निर्माण झालेल्या बहुमजली इमारतींमध्ये बरेचदा प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट डिझाइन केलेले असतात. अशा वेळेस चारही फ्लॅट्सना चारही दिशांकडून मिळणारे नैसर्गिक फायदे मिळू शकत नाहीत. घरातील नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि वायुवीजन यावर मर्यादा येतात. उदाहरणादाखल जर एखाद्या फ्लॅटच्या उत्तर आणि पश्चिम या दिशा मोकळ्या असतील तर साहजिकच दक्षिण आणि पूर्व या दिशांना लागून दुसरे फ्लॅट्स असतात. अशा वेळेस वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला स्वयंपाकघर केले तर तेथे नैसर्गिक सूर्यप्रकाश अजिबातच येणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. याचाच अर्थ इथे वास्तुशास्त्र बाजूला ठेवून व्यावहारिक विचार (Practical Approach) करणे गरजेचे असते. आणि म्हणूनच कोणते शास्त्र कोठे वापरायचे याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

अंतर्गत रचना करताना जेव्हा आराखडा तयार होतो, त्याआधीच त्या घरात नैसर्गिक सूर्यप्रकाशाचे स्रोत कोणते आहेत म्हणजे दरवाजे आणि खिडक्यांचे स्थान (Location) त्यांचे मोजमाप (Size) त्याचप्रमाणे उगवती आणि मावळती दिशा कशी आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्या घरातील व्यक्तींच्या सवयी, गरजा, छंद, दैनंदिन वेळापत्रक कसे असते हे पाहून त्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा लाभ कसा घेता येईल हे पाहणे अत्यंत आवश्यक असते.

घरातील मंडळींच्या कामांच्या प्रकारानुसार त्या त्या खोलीतील सूर्यप्रकाशाची गरज वेगवेगळी असते. अभ्यासाच्या खोलीत आणि स्वयंपाकघर येथील प्रकाशाची गरज ही झोपण्याच्या खोलीतील  प्रकाशाच्या गरजेपेक्षा जास्त असते. त्याचप्रमाणे, प्रकाश किती उंचीवरून कोणत्या कोनातून येतो आहे, घरातील वस्तूंवरून आणि भिंतीवरून, जमिनीवरून परावर्तित झाल्यावरही त्याची तीव्रता बदलते, हेही लक्षात घेतले पाहिजे.

खोली लहान असेल, परंतु नैसर्गिक सूर्यप्रकाश पुरेसा असेल तर तेथे उत्साहवर्धक वातावरण निर्माण करता येते. अशा वेळेस खिडक्यांच्या पुढय़ात लगेच लागून फर्निचरची मांडणी करणे शक्यतो टाळावे. तसेच खिडक्यांच्या काचा स्वच्छ ठेवल्या, सील लेवलवरील नको असलेल्या वस्तू काढून टाकून खिडकीची चौकट पूर्णपणे मोकळी ठेवावी. शक्यतोवर गडद रंगांच्या जाड कापडाच्या पडद्यांपेक्षा फिक्कट रंगाचे, हलक्या आणि सुती कापडाचे पडदे ( सिंगल लेअरमध्ये ) लावल्यास उत्तम.

बरेचदा नैसर्गिक प्रकाशाचे परावर्तीत होऊन प्रकाशाची तीव्रता वाढविण्यासाठी गुळगुळीत

(Glossy) फर्निचर, मेटॅलिक फिनिशेस किंवा आरसे यांचा अतिरेकी वापर केला जातो. त्यामुळे दृश्यात्मक सुलभता (Visual Comforts) नाहीशी होते. आणि खोलीचा एकूणच नैसर्गिक शांतपणा, प्रसन्नता हरवून जाते. आपण निसर्गाच्या सान्निध्यात कसे शांत असतो तसे आपल्या घरात राहू शकलो तर? त्यासाठीच नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि त्या अनुषंगाने इतर रंगसंगती याचा सारासार विचार करून अंतर्गत रचना आणि सजावट करणे हे नेहमीच महत्त्वाचे ठरते. अर्थातच अंतर्गत रचना ही उपभोक्त्याला वापरण्यास अनुकूल (User Friendly Design) अशीच असली पाहिजे. जेव्हा आपण सूर्यप्रकाशाचा आणि त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा सुयोग्य प्रकारे वापर करू तेव्हाच सूर्यप्रकाशाचे हे देणे आणि निसर्गाचे ऋण सार्थकी लागेल हेच खरे.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:20 am

Web Title: vastusanwand article by seema puranik
Next Stories
1 वस्तू आणि वास्तू : सगळीकडे स्टिकर्सच स्टिकर्स!
2 निवारा : नैसर्गिक आपत्ती आणि पारंपरिक घरे
3 गणेश दर्शन ते गणेश रचना ६० वर्षांचा प्रवास