परवडणाऱ्या घरांची व्याख्या खरं तर विकासक आपापल्या सोयीने ठरवताना दिसत आहेत. खरीखुरी परवडणारी घरे व सध्या ट्रेंडमध्ये असणारी लक्झुरी परवडणारी घरे याचा अर्थ ग्राहकांना उमजत नाही. परवडणाऱ्या घरांना पायाभूत सुविधांचा दर्जा दिल्यानंतर विकासकांनी परवडणारी घरे निर्माण करण्यावर भर दिला. सर्वसामान्यांचा कल हा अजूनही परवडणाऱ्या घरांकडेच आहे. मात्र ४० ते ५० लाखांचं परवडणारं घर घेणं आजही सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. मुंबईत किमान ५० ते ६० लाखांपर्यंत १ बीएचके अशी परवडणारी घरे विकासकांनी उभी केली आहेत. तर दुसरीकडे, मुंबईपासून बाहेर म्हणजेच कल्याण, ठाणे या ठिकाणी ४० ते ५० लाखांपर्यंत १ बीएचके घरे विकली जात आहेत. नोटबंदी व रेरानंतर रिअल इस्टेट क्षेत्रावर मोठा परिणाम होईल, असं भाकीत सर्वच स्तरातून केलं जात होतं. परवडणारी घरे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी विकासकांनी किमती चढय़ाच का ठेवल्या आहेत याची कारणे अनेक आहेत. एमएमआर परिसरात परवडणारी घरे बांधण्याचा संकल्प मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत केला गेला. मात्र यानंतर कित्येक हजार कोटी गुंतवणुकीनंतरही किती घरे व घरांच्या किमती याबाबत मात्र सुस्पष्टता नाही. अशात ग्राहकांना केवळ परवडणारी घरे देण्याचे गाजर दाखवण्यासारखेच आहे.
काही विकासक हे परवडणाऱ्या किमतीत घरबांधणीचे काम करत आहेत. मात्र ही घरे एमएमआर परिसरात नाहीत. ठाण्यापलीकडे किंवा कल्याण डोंबिवली याला मागील काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली. मात्र आता अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत या ठिकाणांना देखील ग्राहकांची पसंती मिळत आहे. मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे म्हटले जाते, मात्र आता मुंबईपासून थोडं लांब, पण हक्काचं घर असावं अशी मानसिकता ग्राहकांची झाली आहे. अनेक बडेबडे विकासक या बाजूला वळताना दिसत आहेत.
मॅग्नेटिक महाराष्ट्रादरम्यान झालेल्या गुंतवणुकीनुसार, एमएमआर परिसरात १४.४ लाख परवडणारी घरे बांधण्यासाठी विकासक सरसावले आहेत. मात्र या घरांच्या किमती माहिती नसल्याने या घरांबाबत ग्राहकांमध्ये अद्याप साशंकता आहे. कल्याण व डोंबिवलीमध्ये सध्या १ बीएचके घराची किंमत किमान ४० लाख ते ५० लाखांपर्यंत आहे. तर त्यापलीकडे म्हणजेच अंबरनाथ, बदलापूर इथे किमती कमी आहेत. नेरळसारख्या ठिकाणी १४ लाखांत सर्व एमेनिटीजसह प्रशस्त घरे उपलब्ध आहेत.
अलीकडेच पार पडलेल्या रेरा समिटमध्ये अनेक विकासक व रेरा प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी रेरा लागू झाल्यानंतर काय बदल झाले व काय अपेक्षित आहेत यावर चर्चा करण्यात आली. एमएमआर परिसरातील घरांची विक्री ही मंदावली असल्याचे चित्र यावेळी विकासकांकडून स्पष्ट करण्यात आले. तर ठाण्यापलीकडे ग्राहक हे घर घेण्याला अधिक पसंती देत असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात एकूण ५२ टक्के परवडणाऱ्या घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. यात एमएमआर परिसराचा वाटा कमी आहे. रेरा लागू झाल्यानंतर काळा पैसा हाताशी घेऊन घरबांधणी करणाऱ्या अनेक स्थानिक विकासकांना चांगलाच चाप बसला. मात्र काही लहान विकासकांनी रेरा नोंदणी करत अनेक बडय़ा विकासकांसोबत स्पर्धा करण्यास सुरुवात केली आहे. हे चित्र सहसा ठाण्याच्या पुढे आपल्याला पाहायला मिळते. कल्याण व डोंबिवली पुढे घर घेताना सर्वात प्रथम रेल्वे स्टेशन आणि घर यांच्यातील अंतराचा अंदाज घेणे गरजेचे आहे. अनेक विकासक कमी अंतर सांगून यात दिशाभूल करण्याचा प्रयत्नही करतात. अंबरनाथ, बदलापूर या भागातही हीच समस्या आहे.
मुंबईत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी असलेले विकासक आता ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांकडे वळताना दिसत आहेत. तेव्हा याचा ग्राहकांना फायदा होणार आहेच. शिवाय इथे असलेली सध्याची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारल्यास ग्राहकांकडून मागणीही वाढू शकते.
मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या वेळी गृहप्रकल्पांमध्ये ३ लाख ६० हजार कोटी एवढी गुंतवणूक परवडणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये झाली आहे. शिवाय सर्वासाठी घरे या योजनेसाठी सर्वच विकासकांनी हातभार लावल्यास परवडणाऱ्या घरांना आणखी वाव मिळू शकतो.