मागील भागात होम, उपपीठ व अधिष्ठानासाठी सूत्रे टाकली. होम उपपीठ व अधिष्ठान ह्या तीनही गोष्टी प्रासादाचा भूमीवरील पाया असतो. यातील होम हा अधिष्ठान व उपपीठाचा सर्वात खालचा भाग. त्यामुळे त्याच्या सुशोभिकरणाकडे फार लक्ष दिलले नाही, पण त्यावरील उपपीठ व अधिष्ठानाचे प्रकार त्यांचे सुशोभिकरण याची सविस्तर माहिती मिळते.  
अधिष्ठानाचा खालील भाग म्हणजे उपपीठ. उपपीठामुळे प्रासादाची उंची, प्रासादाची मजबुती यांजबरोबर प्रासादाची शोभा वाढण्यात मदत होते. अधिष्ठानापासून उपपीठाचा बाहेरचा भाग हा निर्गमन या नावाने ओळखला जाई. उपपीठाचे हे निर्गमन साधारणपणे अधिष्ठानाच्या पादुकेच्या निर्गमनाइतके असते. उपपीठाची उंची वेगवेगळी सांगितली आहे. ही उंची कधी अधिष्ठानाच्या उंचीइतकी किंवा त्याच्या तीन चतुर्थाश, निम्मी, तीन पंचमांश भाग, सव्वा किंवा दीडपट अथवा पावणेदोन असते. काही विशिष्ट ठिकाणी ती अधिष्ठानाच्या दुप्पट असते. उपपीठाचे उपान, पद्म, कंप, कंठ, गल, अब्ज, वाजन, कमळ, कपोत, आिलग, अंतरित असे वेगवेगळे भाग येतात. या भागांनुसार पंचांग, षडांग, अष्टांग, भद्र प्रतिभद्र, प्रतिसुंदर, कल्याणिका व सौभद्र असे उपपीठांचे वेगवेगळे प्रकार आहेत.
पंचांग उपपीठ
उपपीठाच्या एकूण उंचीचे नऊ भाग करून त्यातील मधला भाग कंठ होय. ‘ह्या कंठाची उंची पाच भाग, त्यातील सर्वात खालचा भाग उपान हा एक भाग, त्यावर कंप एक भाग, कंठाच्या वरील बाजूला पुन्हा एक भाग कंप व एक भाग वाजन अशा प्रकारे जेव्हा उपपीठाची विभागणी असते ते पंचांग उपपीठ.
षडांग उपपीठ
उपपीठाच्या एकूण उंचीचे दहा भाग करून त्यातील मधला भाग कंठ होय. ‘ह्या कंठाची उंची पंचांग उपपीठाप्रमाणेच पाच भाग, कंठाच्या खालील बाजूस उपान व कंप प्रत्येकी एक भाग व कंठाच्या वरील बाजूस पुन्हा कंप, वाजन व कंप प्रत्येकी एक भाग येतो अशा प्रकारच्या उपपीठाला षडांग उपपीठ म्हणतात.
अष्टांग उपपीठ
‘ह्यात उपपीठांच्या उंचीचे बारा उपभाग करून पाच भाग कंठ, प्रत्येकी एक भाग उपान, पद्म व कंप हे कंठाच्या खालील बाजूला व कंप, अब्ज, वाजन व पुन्हा कंप हे वरच्या बाजूला आलेले असताना ते अष्टांग उपपीठ या नावाने ओळखले जाते. या उपपीठाच्या विभागणीत अब्जाची भर पडल्याचे दिसते. केल्यास त्यातील एका भागाचे उपान, एक अंश भागात पद्म व एक अंश भागात कंप असते.    
भद्र उपपीठ
कंठ पाचच भाग असून उपान, कंप, कंप प्रत्येकी एक भाग खालच्या बाजूस व कंप, कंप, वाजन व पुन्हा एकदा कंप वरच्या बाजूस प्रत्येकी एक भाग असतो. येथे पद्माऐवजी कंप असेच नाव दिलेले असते.
प्रतिभद्रक उपपीठ
उपपीठाच्या एकूण उंचीचे सत्तावीस भाग करून पादुका व पंकजाची उंची प्रत्येकी दोन भाग, कंपाची उंची एक भाग, गल बारा भाग, गलावरील उत्तर व कमळ प्रत्येकी एक भाग, कपोत तीन भाग, आिलग एक भाग व प्रति आणि कंठ प्रत्येकी एक दोन भाग असताना ते प्रतिभद्रक उपपीठ होय.
यात उपपीठाच्या प्रमुख भागाला कंठ अशी संज्ञा न वापरता गल तर अगदी खालच्या भागाला उपानाऐवजी पादुका असे म्हटले आहे. पादुका व कंपाच्या मध्ये पंकजाचे स्थान येते. गलाच्या वरच्या भागात उत्तर, कमळ, कपोत, आिलग, कंठ व प्रति अशी सगळी वेगळी नावे येतात.   

प्रतिसुंदर उपपीठ
यात गल आठ भाग, पादुका दोन भाग, कमळ दोन भाग, अंतरित एकभाग, प्रति दोन भाग, वाजन एक भाग ही विभागणी खालच्या गलाच्या खालच्या बाजूला व कंप, कमळ प्रत्येकी एक भाग, कपोत तीन भाग, आिलग व अंतरित एक भाग, प्रति एक भाग व वाजन एक भागाचे असते.
प्रतिभद्रक उपपीठाप्रमाणे याचेही एकूण सत्तावीस उपविभागच होतात. पण त्यात गलाची उंची कमी करून वरच्या व खालच्याही बाजूला कमळ, अंतरित, प्रति, वाजन असे उपविभाग केले आहेत, तर वरच्या बाजूला या उपविभागांच्या जोडीला पुन्हा आिलगाला स्थान दिले आहे.
सौभद्र उपपीठ
उपपीठाच्या उंचीचे एकवीस विभाग करून उपान व अंबुज दोन भाग, कंठ, पद्म प्रत्येकी एक भाग, महापट्टी दोन भाग, पद्म व कंप प्रत्येकी एक भाग अशी रचना कंठाच्या खालच्या बाजूला व कंप, पद्म आणि पुन्हा कंप अशी रचना गलाच्या वरच्या बाजूला येते ते सौभद्र उपपीठ म्हटले जाते.
कल्याणिका उपपीठ
गल सात भाग करून खालच्या बाजूला उपान, कंधार, अब्ज, पट्टिका, वर्तुळ प्रत्येकी दोन भाग व गलाच्या वरच्या बाजूला कंप एक भाग, अंबुज दोन भाग, महापट्टी दोन भाग, अब्ज व कंप अनुक्रमे एक भाग अशी विभागणी कल्याणिका उपपीठात केली जाते. यात कमळाची जागा कंधराने घेतल्याचे दिसते.
कल्याणिका उपपीठ सर्व प्रकारच्या घरांना योग्य मानले आहे.  या उपपीठावरील मुख्य भागावर म्हणजे गल किंवा कंठावर वेगवेगळे प्राणी, वाघ, सिंह, मकर, विविध प्रकारची पाने यांनी सुशोभन करावे. प्रतिवर मकर, खूप कमळे किंवा बांधलेली मुखे कोरण्याची पद्धत होती. यातील कमळावर मात्र कोणतेही कोरीव काम नसावे, असा संकेत आहे.
अधिष्ठान
उपपीठावरील भागाला अधिष्ठान म्हणतात. त्यालाच धरातल, आधार, धरणी, भुवन, पृथिवी व भूमी, मसूरक, वस्त्वाधार, तल, कुट्टिम, आद्यंग, जगती हे समान अर्थाचे शब्द आहेत.
शिल्परत्न नावाच्या ग्रंथात अधिष्ठानाची व्याख्या करताना
प्रासादादि निजैरङ्गेरधितिष्ठति यत् सदा।
दृढं शिलादिघटितं तदाधिष्ठान संज्ञीतम्॥
अशी केली आहे. याचा अर्थ प्रासाद इत्यादी वास्तूचा एक भाग असलेला, दगड इत्यादींनी मजबूत असलेला, ज्याच्यावर ही वास्तू उभी आहे असा भाग म्हणजे अधिष्ठान होय.
देवालये, पूर्वमंडप, अभिषेक मंडप, विहार मंडप, वाहन मंडप, गर्भगृह, बलीपीठ, ध्वजस्तंभ, गोपुरद्वार, राजा धनिक यांचे प्रासाद, नृत्यशाला, नाटय़शाला, वैद्यशाळा, पाठशाळा व न्यायशाळांसाठी अत्यावश्यक मानले आहे. याचाच अर्थ सामान्यांच्या घरांना केवळ उपपीठ असे. त्यामुळे त्यांच्या घरांपेक्षा साहजिकच राजे व मंत्री व धनिकांचे प्रासाद अधिक उंच असत.
घराची उंची तीन किंवा चार हात असताना अधिष्ठानाची उंची सामान्यपणे एक हात, घराची उंची पाच हात असेल तर अधिष्ठान तीस किंवा बत्तीस अंगुले, घर सहा हात उंचीचे असल्यास अधिष्ठानाची उंची एकतीस किंवा बत्तीस अंगुले मानली आहे. घराची उंची अकरा हातापासून चौदा हातापर्यंत असल्यास अधिष्ठानाची उंची दर हाताला दोन अंगुलांनी वाढते. चौदा व पंधरा हात घराची उंची असेल तेव्हा अधिष्ठानाची अनुक्रमे अडतीस किंवा एकोणचाळीस अंगुले मानली आहे.  
उपपीठाप्रमाणेच अधिष्ठानाच्या एकूण उंचीचे वेगवेगळे भाग करून जगत्, पादबंध, प्रतिवक्त्र, अंभोजकेसर, पुष्पपुष्कल, श्रीबद्धान्त, मंचमंथ, श्रेणीबद्ध, अब्जबंध, वप्रबंध, प्रतिसुंदर, श्रीकण्ठान्त, करीरबंध, कलशबंध, श्रीकान्त, सुंदरअंबुज, नलिनकान्त, श्रीसौंदर्य, स्कन्दकान्त व अंबुजकान्त असे वेगवेगळे प्रकार होतात.
उपपीठ व अधिष्ठानाचे त्याच्या होमासह वर्णन वाचल्यावर रामायणात दशरथाच्या प्रासादाची हिमालयाशी केलेली तुलना सहज लक्षात येते.