सागर नरेकर
मुंबई, उपनगरे त्यातही पश्चिमेतील शहरांमध्ये राहणे आता सर्वसामान्य चाकरमान्यांना परवडण्यासारखे नाही. त्यात मध्य रेल्वे मार्गावरील शहरेही महागडी झाली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत चाकरमान्यांनी आपला मोर्चा कल्याणच्या पुढील परिसराकडे वळविला आहे. अंबरनाथ तालुका आणि बदलापूर शहराचा त्यात मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत येथे उपलब्ध झालेल्या सुविधा, प्राथमिक सुविधांसह पाणी, रस्ते, नवनवीन प्रकल्प यांमुळे बदलापूर शहर येथे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांच्या पसंतीस उतरत आहे. बदलापूर शहराचे भौगोलिक स्थानही वैशिष्टय़पूर्ण आहे. शहराच्या पश्चिमेला सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा तर दुसरीकडे उल्हासनदी. एका बाजूला मुंबईची उपनगरे तर दुसरीकडे निसर्गसंपन्न माथेरानचा डोंगर. यामुळे शहरात राहण्याचा एक वेगळाच अनुभव येतो.
कल्याणपुढील शहरे म्हटली की मध्य मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या अंगावर काटा येतो. एक तासाचा प्रवास, ट्रेनची गर्दी असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतात. मात्र या थोडक्या त्रासानंतर एक वेगळ्या प्रकारचे समाधान येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस अनुभवास येतो. बदलापूर शहराची लोकसंख्या २००५ सालानंतर झपाटय़ाने वाढते आहे. ऐन पुराच्या काळातही शहर अवघ्या एका दिवसांत उभे राहिले. त्यामुळे या शहराची सुरक्षिततेची भावना सर्वदूर पोहोचली. आज बदलापूर शहराची सर्वात मोठी ओळख म्हणजे इथला निसर्ग- जो पूर्वीपेक्षा अधिक बहरला आहे. नुकत्याच वन विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, बदलापूर शहराच्या आसपास आणि बारवीच्या जंगलातील प्राणीसंपदा वाढलेली आहे. याचाच अर्थ बदलापूरच्या आसपासचे जंगल बहरते आहे. त्यामुळेच येथे वनातील प्राणीसंपदा आणि निसर्गचक्र सुधारले आहे. गेल्या काही वर्षांत शहरात झालेले वृक्षारोपण, आसपास वाढलेले जंगल यामुळे शहराचे वातावरण थंड राहण्यास मदत होते आहे. तसेच शहराच्या सौंदर्यातही भर पडते आहे. मोठय़ा शहरांमध्ये पाहायला न मिळणाऱ्या चिमण्या या बदलापुरात सर्रास पाहायला मिळतात. शुद्ध हवेचे हे द्योतक असल्याचे मानले जाते. त्यातच शहरातील उद्यानांची आणि तलावांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे शहरात आणि शहराच्या आसपासही अनेक प्रेक्षणीय स्थळे काही तासांच्या आणि दिवसांच्या पर्यटनासाठी चांगला पर्याय आहेत.
बदलापूर शहरातील रस्ते हे गेल्या काही वर्षांतील चर्चेचा विषय ठरले आहेत. शहरातील ३४ हून अधिक महत्त्वाचे रस्ते, एक महामार्ग, प्रभागातील रस्ते असे सर्वच काँक्रीटचे बनवले जात आहेत. राज्यात सर्वाधिक काँक्रीटचे रस्ते असलेले शहर म्हणून येत्या काळात बदलापूर शहर नावारूपाला येईल. इतकेच नव्हे, तर शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्तेही येथे काँक्रीटचे होत आहेत. त्यामुळे दळणवळण सुकर झाले आहे. यात स्थानिक पालिकेसह एमएमआरडीएच्या निधीचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत एमएमआरडीएच्या क्षेत्रात बदलापूरचा समावेश झाल्याने याकडे या प्राधिकरणाने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे रस्तेरुंदीकरण आणि काँक्रीटीकरण सोपे झाले आहे.
शहराच्या विकासात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे पाणी. बदलापूर शहर पाण्याच्या बाबत स्वयंपूर्ण आहे. शेजारील जिल्ह्य़ातील आंदर धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून बदलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. उल्हासनदीवरील बॅरेज येथे यावर प्रक्रिया करून ते पाणी शहराला देण्यात येते. तसेच शहराच्या वेशीवर असलेले भोज धरणही शहराला पाणीपुरवठय़ासाठी सज्ज आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत शहर संपन्न आहे.
राज्यातील आणि विशेषत: मुंबई उपनगरातील सांस्कृतिक शहरांमध्ये डोंबिवलीनंतर बदलापूर शहर समोर येते आहे. नववर्ष स्वागत यात्रा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिकांची शहरातील रेलचेल, ग्रंथसखा वाचनालयाच्या माध्यमातून होणारे साहित्य मंथन, चित्रपट आणि मालिकांमधील शहरातील कलाकारांचा सहभाग आणि इतर कलाकारांची शहरातील भेटी यामुळे शहर यादृष्टीने एका वेगळ्या उंचीवर गेले आहे. येत्या काही वर्षांत बदलापुरात नाटय़गृह साकारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. जागेचा निर्णय होऊन येत्या दोन वर्षांत शहरवासीयांना नाटय़गृह मिळणार याबाबत शंका नाही.
अंबरनाथ : टुमदार शहर..
प्रतिनिधी : मुंबई महानगर प्रदेशातील एक टुमदार शहर अशी अंबरनाथची पूर्वापार ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक औद्योगिकनगरी असलेले अंबरनाथ आता राज्यातील स्वच्छ शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. ठाणे जिल्ह्य़ातील इतर शहरांच्या तुलनेत अंबरनाथ सुबक आणि सुटसुटीत शहर आहे. शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर, पश्चिमेकडच्या वेशीवरील केंद्र शासनाचा आयुध निर्माणी कारखाना, पूर्वेकडची सूर्योदय गृहनिर्माण सोसायटी, सामूहिक शेतकी सोसायटी, श्रीमलंग गडाच्या दिशेला असलेला विस्तीर्ण काकोळे तलाव, चिखलोली धरण, शहराच्या चारही बाजूला असलेली हिरवाई यामुळे अंबरनाथमधील वास्तव्य सुखावून जाते. मूळ अंबरनाथकरांना त्यामुळेच अन्य ठिकाणी फारसे करमत नाही. याशिवाय नव्याने राहायला आलेलेही अल्पावधीतच या शहराच्या प्रेमात पडतात.
मुंबई-ठाण्याच्या तुलनेत अंबरनाथमधील घरांच्या किमती किफायतशीर आहेत. मुंबईला जाण्यासाठी मध्य रेल्वेची उपनगरी सेवा सरासरी दर १५ मिनिटांनी उपलब्ध आहे. नुकतीच मेट्रो सेवा बदलापूपर्यंत विस्तारण्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात या मेट्रोला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अंबरनाथ मुंबईतील सर्व उपनगरांशी मेट्रोने जोडले जाणार आहे. बारवी धरणाचे विस्तारीकरण मार्गी लागल्याने ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना जवळपास दुप्पट पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यात अंबरनाथसाठी अतिरिक्त पाणीसाठा राखून ठेवण्यात आला आहे. अंबरनाथ शहरात नवे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेतील दोष दूर होतील. शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प पालिकेच्या वतीने राबविला जात आहे. नव्याने उभारल्या जात असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान नव्या चिखलोली स्थानकास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. दोन्ही शहरांतील विस्तारित वसाहतींना त्याचा फायदा होणार आहे. नियोजित चिखलोली स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागांत मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभारली जात आहेत. त्यांना ये-जा करणे या नव्या स्थानकामुळे शक्य होणार आहे.
पश्चिमेकडे सर्कस मैदानावर अलीकडेच नाटय़गृहास मंजुरी देण्यात आली. त्याची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. नवे नाटय़गृह येत्या दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळीला त्यामुळे एक उत्तम व्यासपीठ मिळेल. विम्को नाक्यावरील मुळातील वंदना थिएटरच्या जागी चार पडदा मल्टिप्लेक्स असल्याने सिनेमा पाहण्याची उत्तम सोय शहरात आहे. चिखलोली इथे डी-मार्ट मॉल असल्याने नागरिकांना सवलतीच्या दरात किराणा तसेच इतर जीवनावश्यक वस्तू मिळू लागल्या आहेत. शहरातील बहुतेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू आहे. त्यामुळे शहरातील दळणवळण सुरळीत होऊ शकेल. शहराचा विस्तार जास्तीत जास्त सरासरी तीन ते साडेतीन किलोमीटर इतका आहे. सर्व विभागांत शेअर रिक्षांची सोय आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्वेकडे असलेली आनंदनगर औद्योगिक वसाहत राज्यातील मोठय़ा औद्योगिक वसाहतींपैकी एक आहे. या वसाहतीत एकूण ८०० कंपन्या आहेत. त्यात गोदरेज, महिंद्रा, सीएट आदी देशी तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. त्यात सुमारे ५० हजार कामगार, कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला आहे. आनंदनगरमध्ये आणखीही काही कंपन्या येऊ घातल्या आहेत. पश्चिमेकडे बंद पडलेल्या मोठय़ा कंपन्यांच्या जागेवर निवासी तसेच औद्योगिक वसाहती उभारल्या जात आहेत. त्यात माहिती आणि तंत्रज्ञान केंद्राचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यात नवी मुंबईप्रमाणे अंबरनाथ हे ठाणे जिल्ह्य़ातील रोजगाराचे एक प्रमुख केंद्र होणार आहे. आता देशातील बहुतेक शहरांना स्मार्ट होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र अंबरनाथविषयी म्हणाल तर हे शहर मुळातच स्मार्ट, सुबक आणि सुटसुटीत आहे.
अंबरनाथ येथे औद्योगिक कंपन्या, उत्तम दर्जाच्या शिक्षण संस्था आहेत. येथे अनेक शहरांना जोडणारे रस्ते, सोयिसुविधा उपलब्ध आहेत. अकराव्या शतकातील ऐतिहासिक मंदिरे असून, शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हल सारखा मोठा सांस्कृतिक उत्सव येथे आयोजित केला जातो. मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडय़ांची संख्या जास्त असल्याने नोकरीसाठी आणि व्यापारासाठी मुंबई गाठणे सहज शक्य होते. नवी मुंबईतील प्रस्तावित एअरपोर्टकडे जाणारा रस्ता हाही अंबरनाथकरांसाठी फायदेशी ठरणार आहे.
– गिरीश देढिया,
डायरेक्टर निसर्ग निर्माण ग्रुप
मध्य उपनगरांमध्ये दळणवळणाची साधने आणि सोयीसुविधा यांत मोठय़ा प्रमाणात सुधारणा होत आहेत. सुनियोजित शहर योजनांची आखणी केली जात आहे, परिणामी इथले राहणीमान उंचावत आहे. भविष्यात मेट्रो, फ्री वे, मोनोरेल याप्रकारच्या सुविधा योजिल्या जात आहेत. त्यामुळे येथे घर खरेदी करणे लोकांसाठी उत्तम संधी ठरणार आहे.
-महेश अगरवाल, सीएमडी, रिजन्सी ग्रुप