वाळकेश्वर येथील बाणगंगा मंदिर १८व्या शतकात उभारले गेले असले तरी त्याची आख्यायिका राम आणि परशुराम या अवतारी पुरषांशी निगडीत आहे. या मंदिराचे बांधकाम चालू असताना तेथील जमिनीत जे शिवलिंग सापडले  त्याचीच प्रतिष्ठापना या मंदिरात करण्यात आली.

अवाढव्य पसरलेल्या मुंबई महानगरीत ज्या वास्तूंना ऐतिहासिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी लाभली आहे त्यात धार्मिक अधिष्ठान असलेल्या वास्तूंची संख्याही खूप मोठी आहे. पश्चिमेकडे मुंबईची हद्द जेथून सुरू होते त्या दहिसरपासून कुलाब्यापर्यंत तर पूर्वेस कुलाबा ते मुलुंडपर्यंत सर्व धर्मीयांच्या मंदिर-प्रार्थना स्थळांची संख्या भरपूर आहे. आज आधुनिकतेचा चेहरा लाभलेल्या मुंबईतील महालक्ष्मी, बालाजी, मुंबादेवी, जरीमरी माता, शितलादेवी, सिद्धिविनायक मंदिर, भुलेश्वर मंदिर या वास्तू आपलं पुरातन नावलौकिक सांभाळून आहेत. त्यात वाळकेश्वर-बाणगंगा मंदिर म्हणजे पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांना नेहमीच खुणावत असतात. विशेष म्हणजे गतिमान जीवनशैलीच्या आधुनिकतेच्या धबडग्यात असे एक पुरातन मंदिर म्हणजे वाळकेश्वर-बाणगंगा मंदिर आहे त्याचा प्रत्यय तेथे प्रत्यक्ष भेट दिल्यावरच येतो.
मलबार हिलच्या एका छोटेखानी टेकडीवर सागराची साथ लाभलेले वाळकेश्वर मंदिर वसलेले आहे. या प्राचीन मंदिरातील देवता वालुकेश्वर म्हणजेच वाळूचाच देव म्हणून त्याला ओळख आहे. पाषाणाच्या मंदिरावर घुमट असून त्या दर्शनी शिरोभागी फडकत असलेला ध्वज आपले लक्ष वेधून घेतो. या मंदिराची दोन भागांत विभागणी झालेली आढळते. त्यातील एक भाग गर्भगृहांनी व्यापलेला आहे. त्याचे आकारमान २४’ ७ २८ फूट तर सभामंडपाचे आकारमान ५०’ ७ २५’ असे आहे. येथील महादेवाची पिंडी स्वयंभू असून त्या पिंडीजवळच श्रीगणेशाची संगमरवरी, चित्ताकर्षक मूर्ती आहे. या व्यतिरिक्त पार्वतीची चतुर्भुज मूर्तीही आपले लक्ष वेधून घेते.
पोर्तुगीजांच्या आक्रमणात या मंदिरासह स्वयंभू शिविलगाचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी जवळच्या सागरात ते विसर्जित करण्यात आले. आता हे मंदिर मलबार हिलच्या परिसरात उभे आहे. या मंदिराच्या पाश्र्वभूमीवर एक पाण्याचा तलाव असून, तलावाच्या आत उतरण्यासाठी दगडी पायऱ्याही आहेत. ‘बाणगंगा’ नावांनी सर्वश्रुत असलेल्या या स्थानाला पौराणिक पाश्र्वभूमी आहे. सीतेच्या शोधासाठी निघालेल्या प्रभू रामचंद्रांना शिवलिंगाची पूजा करायला सुचवले तेव्हा आसपास शंभो महादेवाचे मंदिर नव्हते, म्हणून पूजेसाठी रामांनी वाळूचे शिवलिंग तयार केले, हेच ते ‘वालुकेश्वर’ महादेवाचे मंदिर.
ws02
शिवलिंगाच्या पूजेसाठी पाणी नव्हते तेव्हा रामांनी याच भूमीवर बाण मारला तेव्हा गंगाच अवतीर्ण झाली म्हणून या तलावक्षेत्रात ‘बाणगंगा तलाव’ अशी ओळख आहेच. यातील सुमारे ५० फूट खोल कुंड एका झऱ्यामुळे भरले जाते. दुर्मीळ शांतता व प्रसन्नता येथे भाविकांना अनुभवायला मिळते आणि जो काही आवाज येतो तो या तलावात विहार करणाऱ्या बदकांचा असतो. तलाव परिसरात आजूबाजूला असलेल्या मंदिरामुळे चातुर्मासात भाविकांना अन्य देवदेवतांच्या दर्शनासह पूजेचा लाभ घेणे शक्य आहे. आता हा संपूर्ण परिसर वारसावास्तूत समाविष्ट करण्यात आला आहे.
मुंबई शहरातील पुरातन मंदिरांपैकी हे मंदिर पर्यटकांच्या स्थळदर्शनात आहे. १८व्या शतकात हे मंदिर उभारले गेले असले तरी त्याची आख्यायिका राम आणि परशुराम या दोन अवतारी पुरुषांशी निगडित आहे. रामजी कामत नावाच्या धनिक भाविकांनी १८व्या शतकात आज अस्तित्वात असलेले मंदिर उभारले आहे. या मंदिराचे बांधकाम चालू असताना तेथील जमिनीत शिवलिंग सापडले. त्याचीच या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पूर्वी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असे, तेव्हा मुंबई परिसरातील लोक बैलगाडीने येत असत. बाणगंगेच्या परिक्षेत्रात आणखीन एक जुने महादेवाचे मंदिर आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर म्हणून ते ओळखले जाते. गोलघुमटधारी या मंदिराचा गाभारा १० फूट लांब व ८ फूट रुंद आहे. येथेही शिवलिंग आहे. येथे एक भलामोठा वटवृक्ष होता. मात्र आधुनिकतेच्या प्रवासात हा वटवृक्ष नामशेष झाला. जेव्हा हा वटवृक्ष आपले अस्तित्व राखून होता तेव्हा वटपौर्णिमेस महिलावर्ग त्याची पूजा करण्यासाठी येत असे.
श्रीरामाच्या बाणामुळे तसेच भूपृष्ठावरच्या जलस्रोतामुळे हा जलाशय ‘पाताळगंगा’ म्हणूनही ओळखला जातो. ध्वनिप्रदूषणांनी ग्रासलेल्या मुंबई शहरात दुर्मीळ असलेली शांतता येथे अनुभवता येते.
अरूण मळेकर