मालमत्ता खरेदी हा एक खर्चीक आणि महत्त्वाचा निर्णय असल्याने, सगळय़ा दृष्टिकोनातून साधक-बाधक विचारानंतरच हा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. बहुतांश मालमत्ता खरेदी व्यवहारांत कर वाचवण्याकरता, योजनेचा फायदा घेण्याकरता, कर्जाकरता किंवा भावनिक नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त खरेदी करण्यात येते. अशा करारांत वैवाहिक जोडीदार, आई-वडील, भाऊ-बहीण अशा जवळच्या लोकांना सह-खरेदीदार म्हणून करारात सामील करण्यात येते.

करारातील सामील सर्व व्यक्ती आर्थिक योगदान देत असतील तर त्यांना सह-खरेदीदार म्हणून सामील करणे अगत्याचेच आहे. काही वेळेस मात्र आर्थिक योगदान नसतानासुद्धा असे सह-खरेदीदार करारांत सामील केले जातात. असे सह-खरेदीदार सामील करण्यास कायद्याने कोणतीही अडचण नाही, मात्र असे करताना त्याच्या दूरगामी संभाव्य परिणामांचा विचार होणे आवश्यक आहे.

सह-खरेदीदार हयात असेपर्यंत आणि त्याच्याशी नातेसंबंध सुरळीत असेपर्यंत अशा संयुक्त खरेदीच्या व्यवहारांस काही धोका नसतो. मात्र दुर्दैवाने सह-खरेदीदाराचा मृत्यू झाल्यास किंवा त्याच्याशी नातेसंबंधात समस्या निर्माण झाल्यास, असे संयुक्त खरेदी व्यवहार अडचणीत सापडू शकतात. म्हणून निधन आणि संबंधात समस्या झाल्यास संभावणाऱ्या परिणामांची माहिती असल्याशिवाय असे करार करणे धोक्याचे ठरू शकते.

पहिली शक्यता, सह-खरेदीदाराचे कोणतेही मृत्युपत्र न करता किंवा सह-खरेदीदार व्यतिरिक्त इतरांना लाभार्थी करणारे मृत्युपत्र करून निधन झाले तर काय होऊ शकते हे माहिती असणे आवश्यक आहे. समजा सह-खरेदीदाराचे मृत्युपत्र न करता निधन झाले, तर मृत व्यक्तीच्या वर्ग – १ च्या सर्व वारसांना मृत सह-खरेदीदाराच्या मालमत्तेत समान हक्क व हिस्सा प्राप्त होतो आणि त्यांच्या सहमती/ संमतीशिवाय उरलेल्या सह-खरेदीदारांस त्या मालमत्तेची विक्री किंवा तत्सम गोष्टी करता येत नाहीत. साधारण हीच परिस्थिती मृत व्यक्तीच्या मृत्युपत्रातील लाभार्थ्यांबाबत सत्य आहे.

दुसरी शक्यता, समजा सह-खरेदीदारांमधील नातेसंबंधात समस्या निर्माण झाली तर त्यानेसुद्धा त्या मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात अनेकानेक समस्या निर्माण होऊ शकतात. बांधकाम सुरू असताना खरेदी केलेल्या घराचा ताबा घेण्याकरता सर्वसाधारणत: सर्व खरेदीदार हजर असणे किंवा त्यांची लेखी संमती असणे बांधकाम व्यावसायिकांकडून आवश्यक केले जात असते. एखादा सह-हिस्सेदार या बाबतीत सहकार्य करत नसल्यास तयार घराचा ताबा मिळणेसुद्धा दुष्कर होण्याची आणि त्याकरता न्यायालयीन कारवाई करायला लागायची वेळ येऊ शकते. नातेसंबंधात समस्या ताबा मिळाल्यानंतर उद्भवल्यास त्या मालमत्तेचे व्यवहार करण्यास असहकार केल्यास असे व्यवहार करणे जवळपास अशक्य होऊन बसते.

या सगळय़ाचा एकसमयावच्छेदाने विचार केल्यास, कोणतेही आर्थिक योगदान नसलेल्या व्यक्तीस मालमत्ता खरेदीत सह-हिस्सेदार केल्यास आणि दुर्दैवाने त्याचे निधन झाल्यास किंवा त्याच्याशी नातेसंबध बिघडल्यास काय काय समस्या उद्भवू शकतात याचा थोडक्यात अंदाज आपल्याला येतो. आर्थिक योगदान नसलेल्या व्यक्तीस मालमत्ता खरेदीत सह-हिस्सेदार / सह-खरेदीदार करण्यापूर्वी या सगळय़ा बाबींचा आणि शक्यतांचा साधक-बाधक विचार केल्याशिवाय घेतलेला निर्णय भविष्यात अडचणीत आणू शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. समस्या निर्माण झाल्यावर त्या सोडवत बसण्यापेक्षा, समस्या टाळणे हे केव्हाही श्रेयस्कर असल्याने या आणि अशा सगळय़ा संभावनांचा साधक-बाधक विचार करून मगच सह-खरेदीदार सामील करण्याचा अथवा न करण्याचा निर्णय घेणे दीर्घकालीन फायद्याकरता महत्त्वाचे आहे.