इमारतीचे पावसाळी आजार

पावसाळ्यात इमारतींना होणाऱ्या आजारांविषयी.. आपल्याला पावसाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळा आला की, त्यापाठोपाठ अनेक साथीचे रोग येतात आणि मग अमुक रोगाने इतके जण दगावले, अशा बातम्या आपल्याला वाचायला मिळतात.

पावसाळ्यात इमारतींना होणाऱ्या आजारांविषयी..
आपल्याला पावसाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळा आला की, त्यापाठोपाठ अनेक साथीचे रोग येतात आणि मग अमुक रोगाने इतके जण दगावले, अशा बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. या बातम्यांबरोबरच बऱ्याचदा इमारती किंवा त्यांचा काही भाग कोसळल्याच्या बातम्याही आपण वाचतो. अलीकडेच मुंबईत माहीम भागात इमारत कोसळल्याची बातमी आली आणि पुन्हा एकदा याबाबतच्या चर्चाना प्रसारमाध्यमांमधून सुरुवात झाली. यामध्ये इमारतीत काही फेरबदल केल्याचीही चर्चा आहे. यापकी कोणतेही कारण असले, तरी एक गोष्ट मात्र खरी की पावसाळ्यात इमारती पडायच्या घटना या इतर ऋतूंपेक्षा अधिक असतात. यामागे माणसांच्या आजारासारखा इमारतींना पावसाळ्यात कोसळण्याचा आजार जडतो की इमारती कोसळायची साथच पसरते, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो. मात्र, हे कोसळणं म्हणजे काही क्षणांची जरी घटना असली, तरी त्यामागे बऱ्याच कालावधीपासून चालू असलेली जीर्णतेची प्रक्रिया असते. आधीच भाराने वाकलेला ऊंट ज्याप्रमाणे पाठीवर पडलेल्या शेवटच्या काडीने जसा खाली बसतो, त्याप्रमाणे पावसाचं पाणी हे केवळ इमारत खाली बसायला निमित्त ठरतं. इमारती कोसळण्यामागे असलेल्या अनेक तांत्रिक कारणांपकी अतिवृष्टीत इमारतीमध्ये मुरलेलं पावसाचं पाणी हे एक महत्त्वाचं कारण असतं.
जुन्या इमारतींची वजन पेलण्याची क्षमता कमी होत जाते. या इमारतींच्या कॉलम-बीम, स्लॅब, बाल्कनीचे सज्जे किंवा िभती यामध्ये जर काही कारणांनी भेगा पडल्या असतील, आणि या भेगा जरी अगदी बारीक असतील, तरी या भेगांमधून दर पावसाळ्यात पाणी मुरत जातं आणि शेवटी काँक्रीटच्या भागांमधल्या सळ्या गंजायला सुरुवात होते. बऱ्याच काळानं या सळ्या पूर्णपणे गंजल्या की, त्यांची वजन पेलण्याची क्षमता खूपच कमी होते आणि अतिवृष्टीत इमारतीत मुरलेलं पाणी या सळ्यांच्या गंजाचं पावडरीत रूपांतर करतं. पायांमधली हाडं किंवा पाठीच्या मणक्यात जर ते ठिसूळ झाल्यामुळे वजन पेलायची ताकदच उरली नाही, तर आपण ज्याप्रमाणे उभे राहू शकणार नाही, त्याप्रमाणेच इमारतीच्या बीम-कॉलमची ताकद पेलण्याची क्षमता नाहीशी झाली की इमारत कोसळते. त्यामुळे इमारतीच्या कोणत्याही भागात निर्माण होणाऱ्या भेगा या इमारतीला संभवणाऱ्या धोक्यांपकी एक महत्त्वाचा धोका असतो. त्यामुळे या भेगा निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणं आवश्यक असतं. इमारतीच्या वाढत्या वयाबरोबर भेगाही वाढत जात असल्या तरी काही प्रमाणात योग्य ती काळजी घेतली तर या भेगा आपण नियंत्रणात ठेवून इमारतीचं आयुष्य कमी होण्यापासून रोखू शकतो. इमारतीच्या विविध भागांमध्ये केल्या जाणाऱ्या नूतनीकरणाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तोडफडीमुळे इमारतीला हादरे बसतात. इमारतीचं वय जास्त असेल किंवा इमारतीचं मूळ बांधकाम मजबूत नसेल, तर अशा हादऱ्यांमुळे बीम-कॉलम, स्लॅब किंवा सज्जामध्ये बारीक भेगा निर्माण होऊ शकतात. पक्षी जेव्हा बाहेरच्या बाजूने इमारतीवर बसतात, तेव्हा त्यांच्या पायांना चिकटून आलेल्या किंवा अन्य कारणांनी आलेल्या रोपांच्या बिया किंवा मुळं ही जर या भेगांमध्ये गेली, तर ती रुजून या भेगांमधून रोपं वर येऊन वाढू लागतात. त्यांची मुळं पुन्हा वाढून या भेगांमध्ये खोलवर जातात आणि या भेगा किंवा तडे अधिकच रुंदावतात. त्यातून मग याआधी सांगितलेली पाण्याची गळती किंवा पाझर इमारतीसाठी धोकादायक ठरू शकतो.
पाण्यामुळे इमारतींना होणारा दुसरा आजार म्हणजे िभतीवर येणारी बुरशी. सतत ओल असेल, अशा ठिकाणी ही बुरशी येते. िभतीमधून येणारी ओल ही केवळ बाहेरच्याच किंवा पावसाच्या पाण्यानेच येते असं नाही, तर टॉयलेट, स्वयंपाकघराचं सिंक किंवा बेसिन यांतून होणारी पाण्याची गळतीही त्याला कारणीभूत असते. याव्यतिरिक्त पाण्याचे साठे किंवा पाणथळ असलेल्या जागी जर मातीचा भराव टाकून हे साठे बुजवून त्यावर इमारत बांधली गेली असेल, तर अनेकदा जमिनीतून तळमजल्याच्या िभतीमध्ये ओल शिरते.
त्यामुळे पाण्याच्या गळतीचं किंवा पाझरण्याचं कारण काहीही असलं, तरी ती ताबडतोब थांबवली पाहिजे. कारण अखेरीस हा रोग एखाद्या कँसरप्रमाणे पसरत जाऊन इमारतीच्या आयुष्याला धोका निर्माण करतो. भेगा आणि गळतीच्या या तक्रारीसंदर्भात पुढील उपाययोजना करता येतील-
  बीम-कॉलम इत्यादी भागांमध्ये मुळात पाण्याचा पाझर किंवा गळती होऊच नये याची काळजी इमारतीच्या बांधकामापासूनच घेतली गेली पाहिजे. त्यामुळे नवीन घर घेताना जर लगेचच त्यात राहायला जायची घाई नसेल, तर शक्यतो बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर घ्यावं. कारण प्लॅस्टर लावून दोष झाकले जाण्याआधी विटांच्या किंवा काँक्रीटच्या बांधकामाचा दर्जा तपासून घेता येतो. विटा चांगल्या भाजलेल्या आहेत की भुसभुशीत किंवा सच्छिद्र आहेत, बीम-कॉलमचं काँक्रीट मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे जाळीदार नाही ना, ते तपासून घ्यावं. कारण अशा भुसभुशीत विटांमधून किंवा सच्छिद्र कॉंक्रीटमधूनच पाण्याची गळती सुरू होते आणि मग कितीही चांगली, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची वॉटरप्रूिफग रसायनं वापरलीत तरी, त्यांचा गळती किंवा पाझर थांबवण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. तयार इमारतीत बांधकामातले हे दोष प्लॅस्टर आणि आकर्षक रंगसंगतीच्या आड लपवले जातात. म्हणून घर घेण्याआधी शक्य असेल, तर एखाद्या स्थापत्य अभियंत्याला दाखवून इमारतीच्या दर्जाची खात्री करून घर घ्यावं.
आपण राहात असलेल्या इमारतीत आपल्या घरातले पाण्याचे किंवा सांडपाण्याचे पाइप किंवा नळ यातून गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषत: िभतीआड असलेल्या कन्सिल्ड पाईपसंबंधी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
एअरकंडिशनरच्या आऊटलेट पाईपमधून येणारं पाणी इमारतीच्या सज्जावर किंवा इतर भागांवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी व हा पाइप एखाद्या बादलीत सोडावा. म्हणजे इमारतीच्या भागांवर हे सातत्याने पडणारं पाणी आधी ओल व मग पाझर निर्माण करणार नाही.
इमारतीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी घराचं नूतनीकरण करताना एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी व शक्यतो तोडफोड टाळावी. विशेषत: कसलंही तांत्रिक ज्ञान नसलेल्या अगर स्थापत्य अभियंता किंवा वास्तुविशारद नसलेल्या कोणाही तथाकथित वास्तू-सल्लागराच्या नादी लागून हे असले बदल करणं टाळावं. कारण या धोकादायक बदलांमुळे तुमचं आयुष्य सुखकर होण्याऐवजी तुम्ही तुमच्याबरोबरच इतरांचीही आयुष्य धोक्यात घालता.
फ्लोअिरगच्या जुन्या लाद्या उखडून त्याजागी नव्या लाद्या बसवण्याआधी इमारतीचं वय, तिची स्ट्रक्चरल परिस्थिती आणि ताकद लक्षात घ्यावी.
इमारतीच्या कोणत्याही भागात रोपं अगर झाडं वाढू देऊ नयेत. तशी ती आढळलीत, तर लगेचच मुळासकट उपटून टाकावीत आणि त्या भेगा विशेष प्रकारच्या सिमेंट-मॉर्टरनं भरून घ्याव्यात. अ‍ॅसिड घालू नये. कारण हे अ‍ॅसिड भेगांमधून आत शिरून लोखंडी सळ्यांवर हल्ला करू शकतं.
गच्चीवरून होणारी गळती थांबवण्यासाठी भेगांमध्ये डांबर घालू नये. कारण उन्हाळ्यात दिवसभर गच्चीबरोबरच हे डांबरही तापतं, प्रसरण पावतं व भेगा रुंदावतात आणि रात्री तापमानात घट झाली की, डांबर आकुंचन पावतं; पण भेगा तशाच राहतात. याच रुंदावलेल्या भेगांमधून मग पावसाळ्यात अधिकच गळती सुरू होते.
भिंतीवर येणारी बुरशी काढून टाकण्यासाठी बुरशीविरोधी रसायनं वापरावीत.
कुठेही ओल दिसली, तर त्या पाण्याचा उगम शोधून काढून उगमापासूनच ते पाणी थांबवावं, पाणी दिसेल त्या ठिकाणी केवळ स्थानिक उपाय करू नयेत.
वरीलप्रकारे जर काळजी घेतली तर आपली घरं ही खरोखरच पावसाळ्यातही आपल्याला निवारा देऊन पावसाळे सुसह्य होतील आणि इमारती पडल्याच्या बातम्या येणार नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Building precautions before and during monsoon

ताज्या बातम्या