धनराज खरटमल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बक्षीसपत्रासंबंधी लोकांच्या अजूनही खूप शंका असल्याचे बक्षीसपत्राची लेख वाचून आलेल्या ईमेलद्वारे मला जाणवले. त्यामुळेच लोकांच्या शंकाकुशंकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न लेखांच्या माध्यमातून करणार आहे. यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण महाराष्ट्र मुद्रांक कायदा-१९५८ मधील तरतुदीनुसार रक्ताच्या नात्यातील वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये झालेल्या बक्षीसपत्राला किती मुद्रांक शुल्क लागेल, याची माहिती विस्तृतपणे घेतलेली आहे. आता आपण बक्षीसपत्रासंबंधात कायदेशीर बाबींची म्हणजेच बक्षीसपत्राचा दस्त नोंदताना नोंदणी कायदा-१९०८ मध्ये काय काय तरतुदी आहेत, तसेच बक्षीसपत्राच्या दस्तात काय असावे व काय नसावे, याचीच प्रामुख्याने चर्चा करणार आहोत.

कुठल्याही हस्तांतरणासाठी मोबदला नसला तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो. परंतु बक्षीसपत्र याला अपवाद आहे. किंबहुना बक्षीसपत्रात अटी नसाव्यात, अशीच कायद्याची अपेक्षा आहे. यापूर्वीच्या लेखामध्ये मी म्हटले होते की, आपली बाजू सुरक्षित (Safer Side) असावी म्हणून आई-वडील मुलांना देत असलेल्या बक्षीसपत्राच्या दस्तात भविष्यात ही मिळकत त्यांच्या संमतीशिवाय मुलांनी विकू नये, असे एक वाक्य बक्षीसपत्रात टाकून घेण्यास सुचविले होते. अशी अट टाकल्याने बक्षीसपत्र करून घेऊन आपल्या आई-वडिलांना घरातून हुसकावून लावण्याचे किंवा ती मिळकत विकून टाकण्याचे प्रकार तरी निदान होऊ नयेत. या सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने मी तशी सूचना केलेली होती.

तसेच ही सूचना करण्यामागे हेतू असा होता की, अशी मिळकत विकत घेताना ती मिळकत घेणारी व्यक्ती साखळी दस्तऐवजातील (Chain of Document) बक्षीसपत्राचा तो दस्त वाचल्यानंतर विकत देणाऱ्या व्यक्तीच्या आई-वडिलांची संमती जरूर मागेल, त्यायोगे बक्षीस दिलेली मिळकत विकली जात आहे, हे तरी किमान निदर्शनास येईल. परंतु या ठिकाणी हेही लक्षात घेणे गरजेचे आहे की, काही प्रकरणांत न्यायालयाने असा हक्क राखून ठेवणे बेकायदेशीर असल्याचे ठरविलेले आहे. त्यामुळे आपले आपल्या मुलांशी किंवा ज्याला बक्षीस देणार आहोत त्याच्याशी संबंध कसे आहेत यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

बक्षीसपत्रावर दोन साक्षीदारांच्या सह्य़ा असणे कायद्याने बंधकारक आहे का? होय, जर बक्षीसपत्रावर दोन साक्षीदारांच्या सह्य़ा नसल्या व त्याबाबत भविष्यात काही वाद उद्भवल्यास ते बक्षीसपत्र कायद्याने अवैध ठरू शकते. म्हणून बक्षीसपत्रावर नेहमी दोन साक्षीदारांच्या सह्य़ा असणे अत्यंत गरजेचे असते.

बऱ्याच लोकांची अशी शंका असते की बक्षीसपत्राची नोंदणी केलीच पाहिजे का?  याचे उत्तर असे आहे की जर असे बक्षीसपत्र स्थावर मिळकतीचे असेल आणि त्याची किंमत शंभर रुपयांच्या वर असेल तर नोंदणी कायदा-१९०८ चे कलम-१७ अन्वये त्याची नोंदणी सक्तीची केलेली असल्याने अशा स्थावर मालमत्तेच्या बक्षीसपत्राची नोंदणी करणे कायद्यानेच बंधनकारक करण्यात आलेले आहे.

जर बक्षीसपत्र हे जंगम मिळकतीचे असेल उदा. ‘अ’ या व्यक्तीने ‘ब’ या व्यक्तीला रोख रक्कम एक लाख रुपये बक्षीस दिले तर?  याची नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे का? या प्रकरणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, रोख रक्कम ही जंगम मालमत्ता असल्याने नोंदणी कायदा-१९०८ चे कलम-१८ अन्वये असे बक्षीसपत्र नोंदणे कायद्याने बंधनकारक नाही. जर एखाद्याला अशा जंगम मिळकतीच्या बक्षीसपत्राची नोंदणी करण्याची इच्छा असल्यास नोंदणी करता येते. परंतु त्यावर तीन टक्के अधिक त्या त्या शहरात अथवा जिल्ह्य़ात लागू असलेले अतिरिक्त मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असेल. (काही शहरांत किंवा जिल्ह्य़ांत हे अतिरिक्त मुद्रांक शुल्क हे अर्धा टक्का ते अडीच टक्केपर्यंत असते याची वाचकांनी आवर्जून नोंद घ्यावी.)

बक्षीसपत्राचा दस्तावेज नोंदणी करून देताना देणारा व घेणारा उपस्थित राहणे गरजेचे आहे का? नुसता बक्षीसपत्राचाच नव्हे तर कुठलाही मिळकत हस्तांतरणाचा दस्तावेज नोंदणी कायद्याप्रमाणे ज्याची नोंदणी करावयाची असेल त्या दस्तऐवजावर नोंदणी कायदा-१९०८ चे कलम-३२ (अ) प्रमाणे लिहून देणार व घेणार यांनी दस्तऐवजावर सही करून फोटो व बोटांचे ठसे लावून नोंदणीसाठी सह दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे.

एकतर्फी केलेले बक्षीसपत्र वैध असेल का? अशा प्रकारे एकतर्फी केलेले बक्षीसपत्र कधीही वैध ठरत नाही. कारण बक्षीसपत्रासंबंधीची अटच अशी आहे की, ‘देणाऱ्याने दिले पाहिजे व घेणाऱ्याने ते घेतले पाहिजे’

निवृत्त सहदुय्यम निबंधक, मुंबई शहर.

dhanrajkharatmal@yahoo.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Care to be taken while awarding
First published on: 27-04-2019 at 01:20 IST