आपल्या देशाचा व पर्यायाने आपल्या राज्याचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो. लोकशाही राज्यात कायदेशीर व सनदशीर रीतीने स्थापन झालेल्या व नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या सहकारी संस्थांच्या कामकाजात सर्वसाधारण सभेचा निर्णय ग्राह्य़ धरला जातो. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेला संस्थेच्या स्वीकृत व मंजूर उपविधीत बदल / दुरुस्त्या करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. मात्र संस्थेच्या उपविधीत असा बदल / दुरुस्त्या करण्यासाठी माननीय उप-निबंधक, सहकारी संस्था यांची लेखी मंजुरी घेणे आवश्यक आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न व प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या स्वरूपाचा अभ्यास करून तक्रारीचे निवारण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सहकार खात्यातर्फे सन २००१ – २००२ मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी आदर्श उपविधी तयार करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा याबाबत सहकार आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर अभ्यास करण्यात येऊन आदर्श उपविधीमध्ये सुधारणा करण्यात येऊन सन २००९ – २०१० मध्ये नवीन आदर्श उपविधी प्रसिद्ध करण्यात आले. या नवीन आदर्श उपविधींमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व नियम व कार्यपद्धतीचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था (दुरुस्ती) २०१३ अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार प्रचलित उपविधींच्याऐवजी उपरोक्त घटना दुरुस्तीमुळे नवीन नियम, तरतुदी व सुधारणा यांचा समावेश करून सहकार आयुक्तांनी नव्याने तयार केलेले आदर्श उपविधी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी वापरात आणण्यापूर्वी माननीय उप-निबंधक, सहकारी संस्था, यांची रीतसर मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अजूनही
बऱ्याच सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी या नवीन आदर्श उपविधींच्या स्वीकृती व मंजुरी प्रक्रियेबाबत अनभिज्ञ
आहेत. अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माहितीसाठी नवीन आदर्श उपविधींची स्वीकृती व मंजुरीची संपूर्ण कार्यपद्धती पुढीलप्रमाणे:-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन आदर्श उपविधींची स्वीकृती व मंजुरी
१)    प्रथम जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महासंघाच्या कार्यालयातून नवीन आदर्श उपविधीच्या स्वीकृती व मंजुरीसाठी लागणारे विहित नमुन्यातील अर्ज, ठराव, परिशिष्ट व पुरवणी क्रमांक १ ते ५ अशा कागदपत्रांचे दोन संच खरेदी करणे.
२)     संस्थेच्या कार्यकारी समितीच्या सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष, सचिव व एक समिती सभासद यांची नावे नमूद करून त्यांना संस्थेच्या वतीने नवीन आदर्श उपविधी स्वीकृती व मंजुरीची रीतसर प्रक्रिया पूर्ण करण्याचे व आवश्यक तेथे सह्य़ा व संस्थेचा शिक्का मारण्याचे अधिकार बहाल करण्याबाबतचा ठराव मंजूर करून घेणे.
३)    माननीय सहकार आयुक्त यांनी तयार केलेले नवीन आदर्श उपविधी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात स्वीकृतीसाठी व माननीय उप-निबंधक, सहकारी संस्था, यांच्या मंजुरीस पाठविण्यासाठी संस्थेच्या अधिमंडळाच्या विशेष बठकीचे आयोजन करणे, तसेच त्याबाबतची सूचना सर्व सभासदांना देणे व संस्थेच्या सूचना फलकावर लावणे.
४)    त्याचबरोबर सूचनेची तारीख व बठकीच्या तारखेच्या कालावधीत संस्थेच्या प्रचलित उपविधीची व प्रस्तावित सुधारणासह नवीन आदर्श उपविधीची सुधारित प्रत संस्थेच्या कार्यालयात सभासदांच्या निरीक्षण व माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ठेवणे व त्याबाबतची सूचना संस्थेच्या सर्व सभासदांना देणे व संस्थेच्या सूचना फलकावर लावणे.
५)    नवीन आदर्श उपविधीमधील प्रस्तावित सुधारणांसह स्वीकृती व मंजुरीसाठी आयोजित केलेल्या संस्थेच्या अधिमंडळाच्या विशेष बठकीनंतर दोन महिन्यांच्या आत माननीय उप-निबंधक, सहकारी संस्था, यांच्या कार्यालयात रीतसर मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करणे व सोबत खालील नमूद केलेली कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे :-
    अ)    नवीन आदर्श उपविधीतील प्रस्तावित सुधारणांसह स्वीकृती व मंजुरीसाठी आयोजित केलेल्या संस्थेच्या अधिमंडळाच्या विशेष बठकीच्या सूचनेची छायांकित प्रत, संस्थेच्या अधिमंडळाच्या विशेष बठकीत नवीन आदर्श उपविधीतील प्रस्तावित सुधारणांसह स्वीकृती व माननीय उप-निबंधक, सहकारी संस्था यांच्या मंजुरीसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे अधिकार संस्थेच्या कार्यकारी समितीला बहाल करणाऱ्या ठरावाची छायांकित प्रत. बठकीस उपस्थित सभासदांची नावे व सह्यांची छायांकित प्रत.
    ब)    संस्थेच्या पदाधिकायांनी विहित नमुन्यातील परिशिष्ट ‘अ’ व पुरवणी १ ते ५ संपूर्ण तपशील व सही / शिक्क्यासहित भरून देणे. मात्र पुरवणी क्रमांक ४ च्या दोन प्रती देणे.
    क)    प्रचलित (जुन्या) उपविधीची मूळ मंजूर प्रत.
    ड)    नवीन आदर्श उपविधीच्या दोन प्रती. यामध्ये संस्थेबाबतची संपूर्ण माहिती भरून व पदाधिकाऱ्यांच्या सह्या व संस्थेचा शिक्का असणे आवश्यक. तसेच सर्व सभासदांची नावे व सह्या आवश्यक.
    इ) मागील सहकारी वर्षांचा वैधानिक लेखापरीक्षकाकडून प्राप्त झालेला जमा-खर्च यांची पत्रके व ताळेबंद दर्शविणारे हिशोब-पत्रकाची छायांकित प्रत.
    ई)    रक्कम रुपये ५०/- चा कोर्ट फी स्टॅम्प.
    ख)    संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
विश्वासराव सकपाळ

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Co operative society annual meeting rules
First published on: 18-04-2015 at 01:55 IST