दिवाळी सजावटीचा आनंदसोहळा

दिवाळीच्या तयारीची सुरुवात मात्र होते घराच्या रंगरंगोटी पासून, यात घरातील स्त्री-पुरुष, लहानमोठे सारेच सहभाग नोंदवतात. कोणाला कुठला रंग आवडतो, मग त्याचा पोत काय असावा सगळे ठरले आणि पार पडले की घरातील पुरुष वर्ग आणि चिल्लीपिल्ली हळूच आपले अंग काढून घेतात आणि पुढची सूत्रे आपसूकच स्त्री-वर्गाच्या हातात येतात. मग सुरू होतो गृहसजवटीचा नाजूक प्रवास.

|| गौरी प्रधान

दिवाळीच्या तयारीची सुरुवात मात्र होते घराच्या रंगरंगोटी पासून, यात घरातील स्त्री-पुरुष, लहानमोठे सारेच सहभाग नोंदवतात. कोणाला कुठला रंग आवडतो, मग त्याचा पोत काय असावा सगळे ठरले आणि पार पडले की घरातील पुरुष वर्ग आणि चिल्लीपिल्ली हळूच आपले अंग काढून घेतात आणि पुढची सूत्रे आपसूकच स्त्री-वर्गाच्या हातात येतात. मग सुरू होतो गृहसजवटीचा नाजूक प्रवास.       

आपलं घर नेटानं सजवण्यात बहुतांश स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो. त्यात सण असेल तर काही विचारूच नका! आपलं लाडकं  घर सजवण्यासाठी त्या नाना क्लृप्त्या वापरतात. अगदी ऑफिसच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून स्वत:वर जास्तीचा ताण घेऊन त्या घर सजावटीच्या विश्वात हरखून जातात. त्यामुळे यंदाचा लेख हा नेहमीप्रमाणे इंटिरियर डिझाइनर म्हणून न देता घर सजावट स्त्रियांच्या नजरेतून कशी करता येईल याचाच विचार के लाय. विचारांना सुरुवात झाली. स्त्रीच्या नजरेतून… मग तांत्रिक विचार करणाऱ्या इंटिरियर डिझाइनरला झोपवलं आणि सजावटकाराला काढलं बाहेर.

मुळात आपल्या सगळ्याच प्रथा परंपरा, सण समारंभ हे बहुतेक करून स्त्रीकेंद्री आहेत. आता पाहा ना, दिवाळीची सुरुवातच स्त्रियांच्या स्नानापासून होते. दिवाळीच्या पहाटे डोक्यावरून स्नान करून नवे वस्त्र लेवून, कपाळी घाई घाईत पिंजराचे बोट टेकवलेली स्त्री दारात रांगोळी रेखताना पहिली की दिवाळी सुरू झाल्याची खात्री होते.

दिवाळीच्या तयारीची सुरुवात मात्र होते घराच्या रंगरंगोटी पासून, यात घरातील स्त्री-पुरुष, लहानमोठे सारेच सहभाग नोंदवतात. कोणाला कुठला रंग आवडतो, मग त्याचा पोत काय असावा सगळे ठरले आणि पार पडले की घरातील पुरुष वर्ग आणि चिल्लीपिल्ली हळूच आपले अंग काढून घेतात आणि पुढची सूत्रे आपसूकच स्त्री-वर्गाच्या हातात येतात. मग सुरू होतो गृहसजवटीचा नाजूक प्रवास.

एरवीचे आपले घर छान असते नीटनेटके असते, पण त्यात भरजरीपणा मात्र नसतो. म्हणूनच दिवाळीसाठी घर सजवताना थोडे सोनेरी, चंदेरी त्याचसोबत थोडे भडक रंग वापरण्यावर भर दिल्यास घरात आपोआप उत्सवी वातावरण तयार होईल. त्यातही घरात अनेक गोष्टी अशा असतात, ज्या आपण केवळ आज सण आला, उद्या उत्सव आला म्हणून नाही बदलू शकत. उदाहरणार्थ पडदे, मग या नेहमीच्याच पडद्यांना नवे स्वरूप देण्यासाठी सोनेरी चंदेरी जाळीचे, टिकल्यांचे अतिशय स्वस्त असे कापड मिळते (झिरमिळ्या वगैरे मिळतात त्याच दुकानात मिळते हे) ते पडद्यावरून सोडून किंवा त्याचे वेलांस करून कमी खर्चात खिडकी मस्त दिसू शकेल. खिडकीत जर झाडे असतील तर दिवाळीच्या महिनाभर आधीपासून त्यांची विशेष काळजी घ्यावी की जेणेकरून सणाच्या दिवशी ती छान बहरलेली दिसतील, अथवा सणाच्या काही दिवस आधी बाजारातून मस्त फुलांनी बहरलेली रोपे आणून खिडकीत ठेवली तरी चालू शकतात. त्याचप्रमाणे काही इनडोअर प्लांटस, पण आपण आपल्या आवडीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरात तसेच दारात ठेवू शकतो.  बैठकीच्या खोलीतील सोफेही फार महत्त्वाचे, त्यातही जर सोफ्याची अपहोल्स्ट्री जर कापडाची असेल तर आठवडाभर आधीच त्याचे शापुइंग वैगेरे सोपस्कार आटोपून घ्यावेत. रेक्सिन किंवा लेदर असल्यास ओल्या कपड्याने योग्य प्रकारे स्वच्छ करून घ्यावेत. सोफ्यावर वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या लहानमोठ्या थ्रो कुशन्स ठेवल्या की सोफा दिवाळीसाठी तयार. सेंटर टेबलच्या खाली एखादा ठेवणीतला गालिचा अंथरून बैठकीला मस्त लुक देणे अगदी सोपे असते.

मग वळायचे डायनिंग टेबलकडे. डायनिंग टेबलवर शक्यतो टेबल क्लॉथ घालू नये आणि प्लास्टिक मॅट तर मुळीच ठेवू नयेत. त्याने ते अतिशय चिप दिसते. त्याऐवजी खास दिवाळीसाठी ब्रोकेडचे टेबल रनर टेबलवर टाकावे आणि त्यावर मधोमध छानसे कँडल स्टँड किंवा एखादी फुलांची रचना करावी, इकेबाना वगैरे येत असल्यास उत्तमच.

दिवाळीत सगळ्यात महत्त्वाचे काय तर दारात रांगोळी आणी आकाशकंदील, तेवढेच महत्त्वाचे तोरण. दिवाळी सणच प्रकाशाचा असल्याने विजेचे तोरण तर हवेच हवे, पण त्याचसोबत जर खऱ्या फुलांची देखील सजावट करून घेतली तर? जरबेरा, ऑर्किड, कार्नेशन, अशी काही फुले जी चार-पाच दिवस टिकू शकतात. ती दार सजवताना वापरता येतील, पण तत्पूर्वी दाराला दोन्ही बाजूनी खिळे, स्क्रू लावलेले आहेत ना याची खात्री करून घ्यावी. आकाशकंदिलासाठी अडकवायला हुक आणि बल्ब लावण्यासाठी विजेचे कनेक्शन या काही गोष्टी आधीपासूनच तपासून घ्याव्यात. दिवाळी हा फार मोठा आनंदाचा सण, पण हा साजरा करताना सुरक्षेचाही विचार केला पाहिजे व त्यासाठी थोडी आधुनिकतेची कासदेखील धरली पाहिजे. दिवाळीत विजेच्या माळा तसेच तेलाच्या पणत्या वापरल्या जातात- ज्या कदाचित योग्य खबरदारी न घेतल्याने अपघातास कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच त्याला पर्याय म्हणून हल्लीच बाजारात पाहिलेल्या बॅटरीवरच्या माळा विजेच्या माळांना छान पर्याय ठरतील. या माळा आपण बिनधास्त खिडक्यांच्या लोखंडी गजांवरूनदेखील फिरवू शकतो. तीच गोष्ट तेलाच्या पणत्यांची, प्रथा म्हणून दोन तेलाच्या पणत्या लावून इतर सेलवर चालणाऱ्या पणत्या लावल्यास दिवाळी झगमगीत तर होईलच त्याच सोबत सुरक्षितदेखील होईल.

pradhaninteriorsllp@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali decorations house decorating akp

ताज्या बातम्या