सुचित्रा साठे

घर, मग तिथे तुम्ही नेहमी राहत असलात किंवा नसलात तरी एक काम तुमची वाट बघत असतं. त्याला कायम पहिला क्रमांक द्यावा लागतो. ते म्हणजे केर काढणं. सामान असेल, घर बंद असेल, तुम्ही राहत नसाल, अधूनमधून दोन-चार महिन्यांनी तिथे जात असाल, तर सगळा केर धुळीच्या स्वरूपात असतो. जिथे तुम्ही कायम राहात असता, तुमच्या घरातील माणसांचा वावर असतो, तिथे या नैसर्गिक धुळीबरोबर तुम्ही निर्माण केलेला म्हणजे रोजचे दैनंदिन व्यवहार करताना झालेला कचराही असतो. पंचमहाभूतांपैकी एक असलेला वारा हा त्याच्या चंचल स्वभावामुळे सतत धावत असतो. धरणीवर शांतपणे विसावलेल्या धुळीला काही कारण नसताना धसमुसळेपणाने उडवतो आणि आपल्याबरोबर सगळीकडे नाचवतो. वाऱ्याबरोबर आलेल्या धुळीमुळे केर निर्माण होत असल्यामुळे कदाचित केर काढण्याच्या प्रक्रियेला ‘केरवारे’ म्हणण्याची प्रथा पडली असावी.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

भूतकाळात डोकावलं तर असं दिसून येईल की, सकाळी उठल्यानंतर पारोशाने करायचं हे पहिलं काम असे. अंथरुणांचा पसारा, जागेवर न गेलेले किंवा धुवायला न टाकलेले मुलाबाळांचे कपडय़ांचे जोड, खेळण्यांचा मुक्त संचार, अभ्यास करताना अर्धवट उघडी टाकलेली पुस्तके, वह्या.. असा हलवाहलवीचा पसारा आवरून केर काढणे हे दिवसातले अत्यंत महत्त्वाचे काम असे. पूर्ण लक्ष देऊन ते काम करावं लागे. ‘अगं, माझं पेन कुठे गेलं?’, ‘तो ड्रेस घालणार होते मी, धुवायला कशाला टाकलास’, ‘पुस्तकात खुणेसाठी कागद ठेवला होता, त्यावर मित्राचा नंबर होता, कुठे आहे तो?’, ‘अशा अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे केर काढल्यावर तयार ठेवावी लागत. घरातील सगळय़ा खोल्यांचे केरवारे झाले की घराचा चेहरामोहरा बदलत असे. त्यानंतरच त्या खोलीतले सगळे व्यवहार चालू व्हायचे. दुपारी चहापाणी झाल्यावर पुन्हा एकदा केरसुणी फिरवली जात असे. दिवेलागणीच्या वेळेला लक्ष्मी घरात येत असल्यामुळे मात्र केरवारे केले जात नसत.

शेणाने सारवलेली जमीन असण्याच्या काळात शिंद्याची बुटकी केरसुणी केर काढण्यासाठी वापरत असत. साधारण दीड फूट लांबीची, गवताच्या पात्यांचा गठ्ठा असावा तशी ही केरसुणी. तिच्यापुढे मान चांगलीच तुकवावी लागे, तेव्हा ही कामाला राजी होत असे. जरा जमिनीला घासूनच केर काढावा लागे. परसदारापासून अंगणापर्यंत केलेले ‘केरवारे’ चांगलंच हुश्श करायला लावत असत. या शेणाच्या जमिनींचं अस्तित्व लवकर हरवलं आणि फरशा किंवा लाद्या घरभर पसरल्या.

या बदलामुळे केरसुणीचं रूप बदललं. बुटक्या, शिंद्याच्या केरसुणीची जागा साधारण तीन-साडेतीन फूट लांबीच्या शेलाटी केरसुणीने घेतली. तिचा पोतही बदलला. देवघरातील देवांसाठी खास चिमुकली केरसुणी आली. झाडू गवत या वनस्पतीने ही किमया केली. या वनस्पतीचे साधारण एकाच रंगाचे लांबीचे फुललेले तुरे एकत्र केले गेले. सुतळ किंवा प्लॅस्टिकच्या बोटाएवढय़ा जाडीच्या रिबिनीने त्या तुऱ्यांच्या खालच्या देठांना विणकाम करून घट्ट बांधून टाकले. कधी कधी केरसुणी खिळय़ाला अडकवण्यासाठी छोटेसे हूकही केले जाई. निमुळती टोकं वाकडी होऊ नयेत म्हणून हुकाला अडकवून दाराच्या मागे कोपऱ्यात ठेवण्याचा नियम पाळला जाई. तो हूक नाजूक असल्यामुळे तो फार कमी दिवस टिकत असे. त्यामुळे कोपऱ्यात निमुळती टोकं वरती करून उभं राहण्याचीच वेळ तिच्यावर जास्त करून येत असे. केरसुणीची पुढची निमुळती टोकं सांदीकोपऱ्यात शिरायला तत्पर असत. केरसुणी लांब असल्यामुळे खाली वाकण्याचे परिश्रम थोडे कमी झाले. मात्र घरातील ज्येष्ठ स्त्री ‘जरा केरसुणी आडवी धरून केर काढावा,’ असं हळूच सुनावत असे. झाडू गवताच्या फुलोऱ्यांपासूनही तयार केलेली असल्यामुळे हिने गृहप्रवेश केला की नव्याची नवलाई ओसरण्याआधी फुलांचा साज ती उतरवून ठेवत असे. साहजिकच नवीनच केर जमा होत असे. आधी आपला, मग दुसऱ्यांचा असा तिचा नियम असावा. ही पुष्पवृष्टी थांबली की मग ती प्रामाणिकपणे कामावर रुजू होत असे. कोणतीही कुरकुर नाही. घर अगदी स्वच्छ. तिच्याकडून करून घ्यायचं काम तुमचं. तिच्या कामाचा दर्जा अतुलनीय आणि अत्यंत महत्त्वाचा. म्हणून तिला पाय लागू नये म्हणून जपलं जातं आणि चुकून पाय लागला तर नमस्कार केला जातो. तिच्यामधील सुप्त चैतन्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. रोजच्या केरवाऱ्याबरोबरच अधूनमधून जळमटं काढणं, पंखे, टय़ूबलाइट, माळे यांना अलगद स्पर्श करत सगळी साफसफाई करण्याचा तिचा उरक दांडगा आहे. मात्र अंगकाठी तशी नाजूक असल्यामुळे तुरे, काडय़ा लवकर बाहेर पडून तिला खिळखिळी करतात.

घरातला केरकचरा हे घर नांदतं असल्याचं लक्षण, त्यामुळे तो कायम असतोच. पावसाळय़ात मात्र पावसाच्या पाण्याबरोबर धूळ वाहून जाते, त्यामुळे केरसुणीवरचा कामाचा भार थोडा हलका होतो. एरवी तिच्या कामाला कधी सुट्टी नाही. धुळवडीच्या सुमारास तर तिला वाढीव काम करावं लागतं, कारण निसर्गाने ब्युटीपार्लर घडून धरित्रीचे मृत्तिकालेपनचे फेशियल चालू केलेले असते. सतत नावीन्याचा शोध घेणाऱ्या मानवी प्रवृत्तीने केरसुणीच्या नाजूक आरोग्याचा विचार केला. झाडू गवताऐवजी प्लॅस्टिक वापरून तिची प्रतिकृती तयार करण्यात आली. प्लॅस्टिकच्याच बोगद्याने तिला घट्ट धरून ठेवली. त्याला असलेल्या भोकाने ती भिंतीला अडकून राहिली आणि बघता बघता तिचं अस्तित्व चिरंजीवच झालं. खिशाचा भार कमी झाल्यामुळे घराचा चेहरा उजळला.

यांत्रिकीकरणाने केरवाऱ्याच्या कामाला नवा पर्याय दिला; पण रोजच्या यंत्राच्या मागे लागणं सर्वाना सोईस्कर वाटत नव्हतं. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न होता; परंतु प्लॅस्टिकच्या केरसुणीचं स्थान अबाधित राहिलं. लाद्या नको इतक्या गुळगुळीत झाल्या आणि मळकेपणाचं प्रदर्शन होऊ लागलं. त्यामुळे त्या रोजच्या रोज पुसण्याचं काम वाढलं. ‘कचरा-लादी’ असा जोडशब्द तयार झाला. अर्थात ते काम घरातील गृहिणीच्या हातातून हळूच निसटलं आणि कामवाल्या बाईला चिकटलं. त्यामुळे ते काम कामवाल्या बाईच्या सवडीने कोणत्याही वेळेला होऊ लागलं.

नुकत्याच उमललेल्या पिढीला पापड हे तयारच मिळतात, हेच माहीत असतं. ते आपण घरात करू शकतो किंवा करत होतो याची त्यांना कल्पना नसते. त्याचप्रमाणे ‘केरवारे’ हे पारोशाने करायचे काम असते. घरातील गृहिणी ते करत असे, ही संकल्पनाच काळाच्या पडद्याआड गेली आहे, केरवारे आणि पारोसं या शब्दांसकट. कालाय तस्मै नम: दुसरं काय!