मानसार या वास्तुग्रंथानुसार ब्रह्मदेवाने सर्वप्रथम वैराज, कैलास, पुष्पक, माणिक व त्रिविष्टप या नावाची सोन्याची रत्नजडित विमाने अनुक्रमे स्वत: शंकर, कुबेर, वरुण व विष्णूसाठी तयार केली. त्यानंतर सूर्यादी देवतांसाठीही विमाने केली. पण सर्वप्रथम केलेल्या विमानांप्रमाणे पुढे त्याच नावाचे प्रासाद तयार केले. यातील विराज चौकोनी, कैलास गोल, पुष्पक आयताकृती, माणिक दीर्घवर्तुळाकार, तर त्रिविष्टप हा अष्टकोनी अशा आकाराचे प्रासाद तयार झाले. थोडक्यात, या पुराणकथेतून प्रासादनिर्माण ही देवनिर्मित कला होती, असे दाखवण्याचा जसा प्रयत्न आहे, त्याचप्रमाणे अतिप्राचीन काळापासून ही कला अस्तित्वात होती व त्याचा कर्ता निश्चित कोण हे माहीत नसल्याने ते कार्य ब्रह्मदेवाला दिले गेले आहे.
सदन, हम्र्य, धाम, निकेतन, मंदिर, भवन, वास, गेह, दिव्यविमान, आश्रय, आस्पद, आधार प्रतिधिष्ण्य असे प्रासादाचे विविध समानार्थी शब्द आहेत.
विविध प्रासादांची मापे बृहत्संहितेच्या वास्तुविद्या या प्रकरणात वेगवेगळ्या लोकांच्या प्रासादाची मापे दिली आहेत. राजप्रासाद १०८, १००, ९४, ८४, ७६ हस्त
(प्राचीन काळी त्याला क्युबीट म्हणत असत. म्हणजेच एक हस्त = एक क्युबीट = १.५ फूट, त्यानुसार १६२, १५०, १४१, १२६, ११४ फूट) रुंदी असणारे पाच प्रकारचे प्रासाद सांगितले आहेत. तर लांबी अनुक्रमे रुंदीच्या पावपट जास्त असते. यानुसार १३५, १२५, ११५, १०५, ९५ हस्त (म्हणजेच १६८.७५, १५६.२५, १४३.७५, १३१.२५, ११८.७५ फूट ) होते. यातील १०८ हस्त हे सर्वोत्तम प्रमाण मानले आहे. त्याचप्रमाणे सेनापती, महाराणी, युवराज, सामंतराजे, राजाचे वेगवेगळे अधिकारी, कञ्चुकी, गणिका, वेगवेगळे कारागीर, निरनिराळ्या खात्यांचे प्रमुख, राजवैद्य, राजपुरोहित, राजज्योतिषी अशा विविध लोकांच्या घरांची मापे दिली आहेत. राजा व त्याच्या विविध अधिकाऱ्यांशिवाय चातुर्वण्र्याच्या घरांची मापे दिली आहेत. त्यानुसार घराची रुंदी ३२ पासून १६ पर्यंत अनुक्रमे चारने कमी करावी. या मापाने ब्राह्मणाची पाच प्रकारची घरं, क्षत्रियाची २८पासून चारने कमी करत जाऊन चार प्रकारची घरं, वैश्याची २४ पासून सुरुवात करून तीन प्रकारची व वीसने सुरुवात करून दोन प्रकारची अशी शूद्राची घरे सांगितली आहेत. याशिवाय कोशगृह, आरामगृह यांचीही मापे दिली आहेत. तर कोठार, गोशाला व अश्वशालेची रुंदी गरजेनुसार सांगितली असली तरी उंची मात्र १००क्युबीटपेक्षा जास्त नसावी, असा नियम दिला आहे.
राजाच्या प्रासादात ७० मिसळून ते अनुक्रमे १४, ३५ ने भागल्यास प्रासादाची ‘शाला’ अर्थात हॉल व ‘अिलद’ म्हणजे ओटय़ाचे माप मिळते. राजप्रासादाचे १०८ हे सर्वोत्तम माप मानल्यास १०८ + ७० याला १४ ने भागल्यास येईल ते माप हॉलचे व ३५ने भागल्यास व्हरांडय़ाचे माप मिळते. ज्या घराच्या सर्व बाजूंना व्हरांडा असतो अशा ‘सर्वतोभद्र’ घराला चार दरवाजे असतात. हॉलच्या िभतीला लागून बाहेरच्या बाजूने डाव्या बाजूकडून उजवीकडे जाणारा व्हरांडा असेल तर त्याला ‘नंद्यावर्त’ म्हणतात. याला तीन दरवाजे असतात. घरासमोर व्हरांडा डाव्या बाजूने सुरू होऊन उजवीकडे जातो, तेथून त्याच क्रमाने पुढील सर्व व्हरांडे जातात, अशा घराला दक्षिणेकडे दार नसते त्याला ‘वर्धमान’ असे नाव आहे. ‘स्वस्तिक’ प्रकारच्या घराचा पश्चिम व्हरांडा डाव्या हॉलकडून निघून उजवीकडे जातो. याला केवळ पूर्वेकडे एकच दार असते. तर रुचक प्रकारच्या गृहाला पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडे दरवाजा असतो. यातील नंद्यावर्त व वर्धमान ही घरे सर्व लोकांसाठी उत्तम आणि स्वस्तिक व रुचक मध्यम मानली आहेत. तर सर्वतोभद्र राजा व मंत्र्यांसाठी उत्तम समजली जात. घराच्या समोर माíगका असेल तर घराला ‘शोष्णीश’, मागे असल्यास ‘सायाश्रय’, दोन बाजूला असल्यास ‘सावष्टंभ’ व सर्व बाजूंना असल्यास ‘सुस्थित’ म्हणतात.
बृहत्संहितेनुसार प्रासादाच्या रुंदीच्या सोळा पटीत चार मिळवल्यास पहिल्या मजल्याची उंची मिळते. यानंतर पहिल्या मजल्याच्या उंचीतून १.१२ अंश कमी करत गेल्यास प्रत्येकी वरच्या मजल्याची उंची मिळते.
काश्यप शिल्पात मात्र थोडी वेगळी मापे सांगितली आहेत. तेथे उंचीच्या परिमाणांवरून प्रासादाचे शान्तिक, पौष्टिक, जयंत, अद्भुत व सार्वकामिक असे प्रकार केले आहेत.
शान्तिक – संपूर्ण घराच्या उंचीचे आठ भाग करून त्यातील १ भाग अधिष्ठानाची उंची, २ भाग खांबाची उंची, १ भाग प्रस्तर, १ भाग गल, २ भाग शिखर व १ भाग स्तूप असे विभाजन केले आहे.
पौष्टिक – घराच्या उंचीचे नऊ भाग करून त्यातील १ भाग अधिष्ठानाची उंची, खांबाची उंची अडीच भाग, मंचाची उंची एक भाग, गल एक भाग, शिखराची उंची दोन किंवा अडीच भाग व स्तुपाची उंची एक भाग
जयंत यात घराचे दहा भाग करून १ भाग अधिष्ठानाची उंची, अडीच भाग खांब, प्रस्तर एक भाग, गल दीड भाग, शिखराची उंची तीन भाग व स्तुपाची उंची एक भाग
अद्भुत – घराच्या उंचीचे अकरा भाग करून सव्वा भाग अधिष्ठानाची उंची, खांब अडीच भाग, प्रस्तर एक भाग, कंठ व शिखर प्रत्येकी अडीच भाग व उरलेला भाग स्तूप हे अद्भुत प्रासादाचे एक प्रमाण आहे. याशिवाय घराच्या उंचीचे अकरा भाग करून एक भाग अधिष्ठान, खांब दोन भाग, प्रस्तर एक भाग, उपग्रीव दीड भाग प्रस्तर पाऊण भाग, गल सव्वा भाग, शिखर अडीच भाग व स्तूप एक भाग अशा प्रकारेही प्रासादाची विभागणी केली जाते.
सार्वकामिक – घराच्या उंचीचे सात भाग करून त्यातील एक भाग अधिष्ठान, खांब दोन भाग, शिखर तीन भाग व स्तूप एक भाग
वरील सर्व प्रकार एक मजली प्रासादाचे आहेत. मजले वाढत जातात तसे त्यांच्या मापात बदल होत असले तरी प्रासादांचे वरीलप्रमाणेच प्रकार होतात. याप्रमाणे सोळा मजली प्रासादांपर्यंत बांधकाम होत असे.
bapat.asawari@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2013 रोजी प्रकाशित
प्रासादनिर्माण
मानसार या वास्तुग्रंथानुसार ब्रह्मदेवाने सर्वप्रथम वैराज, कैलास, पुष्पक, माणिक व त्रिविष्टप या नावाची सोन्याची रत्नजडित विमाने अनुक्रमे स्वत: शंकर, कुबेर, वरुण व विष्णूसाठी तयार केली.
First published on: 16-11-2013 at 11:25 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Edifice built