टेराकोटाची न्यारी दुनिया..

दिवाळीला आपलं घर कशा पद्धतीने सजवावं किंवा आपल्या प्रियजनांना काय भेट द्यावी, हा प्रश्न दरवर्षी न चुकता आपल्या सर्वानाच पडतो. वेगळी, हटके वस्तू शोधण्यासाठी आपसूकच पावलं मग मार्केट पालथी घालू लागतात आणि ‘च्युझी’ नजर नावीन्यपूर्ण वस्तू धुंडाळू लागते.

दिवाळीला आपलं घर कशा पद्धतीने सजवावं किंवा आपल्या प्रियजनांना काय भेट द्यावी, हा प्रश्न दरवर्षी न चुकता आपल्या सर्वानाच पडतो. वेगळी, हटके वस्तू शोधण्यासाठी आपसूकच पावलं मग मार्केट पालथी घालू लागतात आणि ‘च्युझी’ नजर नावीन्यपूर्ण वस्तू धुंडाळू लागते. अशा ‘च्युझी’ व्यक्तींसाठी टेराकोटापासून बनवलेल्या सुरेख आणि खिशाला परवडणाऱ्या वस्तू हा दीपोत्सव नक्कीच अविस्मरणीय करतील..
तिमिराला नष्ट करून मानवी जीवनात आशादायी प्रकाश पसरविणारा सण म्हणजे दीपावली! आनंद, उत्साह आणि मांगल्य विखुरणाऱ्या या सणाची आपण सर्वजण मोठय़ा आतुरतेने वाट पाहात असतो. पण येत्या दिवाळीला आपलं घर कशा प्रकारे सजवावं किंवा आप्तजनांना काय भेट द्यावी, हा प्रश्न हमखास सतावतोच. गेल्या वर्षीची वस्तू गिफ्ट लिस्टमधून केव्हाच बाद झालेली असते, तर ठेवणीतल्या वस्तूंकडे आपली ‘च्युझी’ नजर ढुंकूनही पाहात नाही. अशा वेळी मग घरासाठी नवीन काय घ्यावं आणि प्रियजनांना काय द्यावं यासाठी ऑफिस सुटलं की प्रत्येक संध्याकाळ बाजारपेठा धुंडाळण्यात पालथी घातली जाते. अशा ‘च्युझी’ लोकांसाठी टेराकोटापासून बनविलेल्या अप्रतिम वस्तू या दीपोत्सवासाठी उत्तम पर्याय ठरू शकतील.
टेराकोटा ही एक प्रकारची सेमी हार्ड क्ले असून ती वेगवेगळ्या आकारात सहजपणे मोल्ड करता येते. तिचा अस्सल गडद लाल रंग आपली नजर आकर्षित करतो. आपल्याकडे माठ, पणत्या या मातीपासूनच बनवल्या जातात, पण त्याला आधुनिक रूपडं बहाल करण्यासाठी त्यावर काही प्रमाणात प्रक्रिया करावी लागते. टेराकोटाच्या वस्तू या चटकन नजरेत भरणाऱ्या आणि आपला तोरा दिमाखदारपणे मिरवणाऱ्या अशाच असतात. पाहताक्षणीच प्रेमात पडावं अशा या वस्तू कलात्मक वस्तूंच्या दुकानात, वेगवेगळ्या हस्तकला प्रदर्शनातून मिळू शकतील. यात हत्ती, घोडे, बलगाडी या पारंपरिक वस्तूंबरोबरच छान मिनाकारी केलेली फुलदाणी, फ्रेम्स, की होल्डर्स, वॉल हँिगग्ज, बेल हँगिंग्ज, हँिगग दिया, कंदील, फ्लॉवर होल्डर प्लेट, पसरट तबक असे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. यावर वारली आर्ट, मिनाकारी करून त्यांना अधिक सुंदर केलेलं आहे. याशिवाय मोती, घुंगरू लावून एखाद्या वस्तूला अधिक आकर्षक बनवलं जातं. यातीलच एखादी छान वस्तू तुम्हाला तुमच्या घरासाठी किंवा भेट म्हणून देण्यासाठी घेता येईल. फ्लॉवर पॉट, फ्रेम्स, वॉल हँिगग्ज किंवा बेल हँिगग्ज तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढवतील किंवा तुम्ही या वस्तू भेट म्हणून दिल्या तरी त्या खात्रीने पसंतीस उतरतील.

या दीपोत्सवासाठी तुम्ही खास पाण्यावरची रांगोळी किंवा फ्लोटिंग रांगोळी काढणार असाल तर टेराकोटाचं तबक किंवा फ्लॉवर होल्डर प्लेटचा वापर करून त्यात अशी रांगोळी काढा. तुमचा हा वेगळा प्रयत्न नक्कीच सगळ्यांची वाहवाह मिळवून जाईल. किंवा हॉलमधल्या सेंटर टेबलवर असं तबक ठेवून त्यात सेंटेड, फ्लोटिंग कॅण्डल्स सोडाव्यात, खूप सुंदर दिसेल. पारंपरिक सणाला तशीच पारंपरिक जोड हवी असेल, तर टेराकोटापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती, फ्रेम्स, वॉल हँिगग्ज यांची मदत घ्यायला हरकत नाही. गॅलरीत, साइड टेबलच्या वरती किंवा मुख्य दरवाजाच्या बाजूला बेल हँिगग लावलं तर सुंदर दिसेल. सौंदर्य आणि कलात्मकता यांचा अनोखा संगम यातून साधता येईल. टेराकोटापासून बनविलेल्या वस्तू सुरेख दिसतात व त्या खिशालासुद्धा परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे यांचा उपयोग करून येणारी दिवाळी अधिक अविस्मरणीय करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hand painted terracotta pots

ताज्या बातम्या