अजित सावंत
आपण आपआपल्यापरीने आपलं घर सजवत असतो. इंटिरियरमध्ये फर्निचरसारख्या मूलभूत गोष्टींबरोबरच बऱ्याच अॅक्सेसरीजही वापरल्या जातात. जसे की- पिक्चर फ्रेम्स, शो पीसेस, स्क्लप्चर्स, म्युरल्स इ. या सगळ्या अॅक्सेसरीजबरोबरच आणखी एक गोष्ट उत्तमरीत्या वापरता येते, ती म्हणजे ‘इनडोर प्लँट्स’. इनडोर प्लँट्स म्हणजेच घराच्या आत ठेवता येतील अशी झाडं.

आजकाल फ्लँट्सना बाल्कनी असण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना झाडांची आवड असूनही झाडं ठेवता येत नाहीत. अशा वेळेस इनडोर प्लँट्स कामी येतात. या झाडांना सूर्यप्रकाश व पाणी तुलनेने कमी लागतं. ही झाडं दिसायला सुंदर तर असतातच, पण मेंटेन करण्यासाठी सोपी असतात. ही झाडं घराला एक जिवंतपणा आणतात. नैसर्गिक शोभा वाढवतात. खरी झाडं व फुले अतिशय सुंदर प्रकारे आपल्या घराचा लूक पालटतात. ही झाडं घराच्या कोणत्याही खोलीत आपण ठेवू शकता. अगदी बाथरूम, टॉयलेटमध्येही! ही प्लँट्स आपण एका प्रोफेशनल नर्सरीमधूनच घ्यावी. कारण तिथे असणारा तज्ज्ञ आपणास झाडाची निगा कशी राखावी हे व्यवस्थित समजवून सांगू शकतो. गाडीवर विकायला येणाऱ्या विक्रेत्यांकडून झाडं घेणं टाळावं, कारण तो अनुभवी असेल, पण प्रोफेशनल नक्कीच नाही. मला आधी नवल वाटायचं की या गाडीवाल्या विक्रेत्यांकडील सगळीच झाडं ही फुलांनी डवरलेली कशी असतात. कालांतराने असं कळलं की हे सगळे विक्रेते रोज सकाळी विक्रीस निघण्याअगोदर त्यांच्या सप्लायर नर्सरीमध्ये जातात व फुलांनी डवरलेली रोपं घेऊन विक्रीस निघतात.

आणखी वाचा-घर स्वप्नातलं : ‘दिसणं’ सुधारणारा वॉर्डरोब

आपल्या घरी विजेचा वापर, स्वयंपाकघराचा वापर, टॉयलेटचा वापर यांमुळे काही प्रमाणात का होईना उपद्रवी वायू तयार होत असतात. त्यामुळे घरातील हवा काही प्रमाणात दूषित होते. अशीही काही इनडोर प्लँट्स उपलब्ध आहेत जी हवेचे शुद्धीकरण करतात. अशा प्युरिफायर प्लँट्सची काही उदाहरणे खालीलप्रमाणे :

अरेका पाम ( Areca Palm), फर्न प्लँट ( Fern Plant), मॉन्स्टेरा डेलिशिया ( Monstera Deliciosa), मनी प्लँट ( Money Plant), अॅन्थ्युरियम ( Antherium), पीस लिली ( Peace lily), लकी बांबू प्लँट ( Lucky Bamboo Plant), ड्रेसेना रिप्लेक्सा ( Dracaena Reflexa)

साधारणपणे इनडोर प्लँट्स ही लिव्हिंग रूममध्ये ठेवली जातात. लिव्हिंग रूमचा आकार जर मोठा असेल तर आपण मोठ्या आकाराच्या पानांचे झाड निवडू शकता, पण लिव्हिंग रूमचा आकार जर लहान असेल तर लहान आकाराच्या पानांचे झाड निवडावे- जेणे करून ते विजोड दिसणार नाही. प्लँट ज्या कुंडीत लावले जाते त्याला प्लँटर म्हणतात. या प्लँटर्सची अगणित डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत. अगदी तीस-चाळीस रुपयांपासून हजारोंपर्यंत किमतीचे पँटर्स उपलब्ध आहेत. हे प्लँटर्स प्लॉस्टिक, माती, तोळे व पितळ यांसारखे धातू, सिरॅमिक, लाकूड, काच, फायबर अशा विविध मटेरियल्सपासून बनवलेले असतात. कुंडीखाली प्लेट ठेवण्याची गरज प्रत्येक प्लँटरला नसते, पण गरज असेल तर आवर्जून कुंडीखाली प्लेट ठेवावी. हे प्लँटर्स ठेवण्यासाठी सुंदर असे स्टँडही मिळतात. आपल्या इंटिरियरला सूट होणारे प्लँटर्स निवडावेत. सौम्य प्रकाशाचा लाइट वापरून, हे प्लँटर्स हायलाइटही करता येतात. असे हायलाइट केलेले प्लँटर्स खूप छान दिसतात. प्रखर लाइट टाळावेत. प्लँटर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ( Pebbles) ठेवून सजवू शकता. झाडांची योग्य निगा राखणे खूप गरजेचे आहे. इनडोर प्लँट थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये. अन्यथा झाड खराब होऊ शकते. काही झाडांना आठवड्यातून एकदा सूर्यप्रकाशात थोडा वेळ ठेवण्याची गरज असते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. झाडांना गरजेप्रमाणेच पाणी द्यावे. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास माती जास्त ओली व मऊ होईल. यामुळे झाडाची मुळे सडू शकतात. तसंच पाणी गरजेपेक्षा कमी दिलं तर झाडाचं निर्जलीकरण ( Detydreath) होऊन झाड सुकायला सुरुवात होईल. त्यामुळे पाण्याचे योग्य प्रमाण ठेवणे खूप गरजेचे आहे.

आणखी वाचा- .. हे एक प्रकारचे अतिक्रमणच!

पाणी घालण्यापूर्वी झाडाची माती तपासावी. जर माती ओली असेल तर पाणी घालू नये. माती सुकलेली दिसली तरच योग्य त्या प्रमाणात पाणी घालावे. नेहमी थंड वा गरम पाणी न वापरता रूम टेंपरेचरचे पाणी वापरावे. नेहमी चांगल्या प्रतीचे खत वापरावे. अधूनमधून खूरपणी करावी, जेणेकरून माती भुसभुशीत राहील व मुळांना योग्य त्या प्रमाणात ऑक्सिजन मिळेल. परिणामी झाडं निरोगी राहील. झाडाचे आरोग्य जपण्यासाठी व ते सुंदर दिसण्यासाठी त्याची नियमितपणे छाटणी करणे गरजेचे आहे.

वर नमूद केलेल्या एअर प्युरिफायर प्लँटसव्यतिरिक्त अजूनही काही प्लँट्स खूप लोकप्रिय आहेत. त्याची सूची खालीलप्रमाणे.

रबर प्लँट ( Rubber Plant), स्पायडर प्लँट ( Spyder Plant), अॅग्लोनिमा प्लँट ( Aglaonema Plant), जेड प्लँट ( Jade Plant), झेड झेड प्लँट ( ZZ Plant), विपिंग फिग प्लँट ( Weeping fig), फिलोडॅन्ड्रन प्लँट ( Philodendron Plant), फिडल लिफ फिग प्लँट ( Fiddle Leaf fig Plant), ऑर्किड प्लँट ( Orchid Plant), स्वोर्ड फर्न प्लँट ( Sword Fern Plant), रेडिएटर प्लँट ( Radiator plant), कास्ट आयर्न प्लँट ( Cast Iron Plant), गयाना चेस्टनट प्लँट ( Guiana Chestnut Plant) असे बरेच प्रकार उपलब्ध आहेत.

झाड मेंटेन करण्याची हौस नसेल किंवा वेळ नसेल तर आपण नैसर्गिक झाडासारखी हुबेहूब दिसणारी कृत्रिम झाडंही मिळतात, फुलं मिळतात. पण अर्थात नैसर्गिक झाडांची मजा काही औरच आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेले प्लँट जर योग्य त्या प्लँटरमध्ये व योग्य त्या ठिकाणी ठेवले तर थंडावा मिळतो व आपण थोडेसे का होईना निसर्गाच्या सान्निध्यात राहतो.

ajitsawantdesigns@gmail.com