vastu_pratisadस्वस्त घरांचा सोपा उपाय
‘वास्तुरंग’मधील ‘आम्ही कशाला वळू टॉवरकडे’ हा मधुसूदन फाटक यांचा लेख वाचला. त्याबरोबरचे छायाचित्र पाहिल्यावर मला वाटले दादर (प.) येथील ‘डिसिल्व्हा शाळे’जवळील ‘पालनसोजपाल चाळ’ आहे की काय? तीही अशीच बरीच जुनी आणि प्रचंड लाकडी इमारत आहे.
‘पाश्चात्त्यांचे ते चांगले’ या समजुतीपायी ‘प्रायव्हसी’च्या वेडाने खुराडय़ासारख्या ‘सेल्फ कंटेंट’ ब्लॉकमध्ये राहण्याचा अट्टहास लोकांनी सोडला तर लेखात वर्णन केल्याप्रमाणे सुविधा देणाऱ्या अशा मोठय़ा इमारती बांधणे हा मुंबईत स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याचा एकमेव सोपा उपाय आहे असे वाटते. सध्याचा विचार करता ‘कमोड’ची सोय असलेले आणखी एखादे जास्त शौचालय असावे. ‘प्रायव्हसी’ नाही म्हणून अशा जागेत राहाणाऱ्यांचे काही कुठे अडले नाही. त्यांचे संसार चांगले फुलले, फळले!
अशा चाळींमुळे स्वस्त जागा उपलब्ध होतील. मोकळ्या वातावरणात मनमोकळा श्वास घेता येईल, मनमोकळे संबंध निर्माण होऊन जिव्हाळ्याची बेटे तयार होतील. ज्यांची आज अत्यंत गरज आहे.
– दि. मा. प्रभुदेसाई, कुर्ला (प.)

तो सुबक तांब्या…
‘वास्तुरंग’मधील स्मरणीय भांडी हा डॉ. सुजाता शिंपी यांचा लेख वाचला. व माझ्या मनात सत्तर वर्षांपूर्वीच्या आईच्या घरातील जुन्या वस्तूंच्या आठवणींची उजळणी सुरू झाली. जाते, खलबत्ता उखळ-मुसळ, बंब, मोठमोठे पितळेचे डबे, पातेल्या, पितळीचा ताट, इ. एक ना दोन अनेक जुन्या जमान्यातील वस्तू होत्या घरात.
पण माझ्या मनात अजूनही घर करून आहे तो छोटासा पितळेचा फिरकीच्या झाकणाचा, वरती कडी असलेला घाटदार जड असा तो सुबक तांब्या. त्याच्या आत तांब्याच्या गळ्याशी घट्ट बसेल असं छोटंसं फुलपात्र. पाच-सहा मोठी भांडी पाणी त्या तांब्यात भरून वर ते फुलपात्र ठेवलं व फिरकीचे झाकण घट्ट बसविले की थेंबभर पाणीही बाहेर झिरपायचं नाही. प्रत्येक प्रवासाच्या वेळी पत्र्याची बॅग, एक वळकटी व पाण्यानी भरलेला हा तांब्या बरोबर हवाच. मला तर तो जड तांब्या उचलायचाही नाही, पण तो घेण्यासाठी घट्ट मात्र असायचा. प्रवासाला निघाल्यानंतर पाच-एक मिनीट वडील तांब्या मला धरायला द्यायचे. मग मात्र आईच त्याचा ताबा घ्यायची. कोणी कुठे विसरेल म्हणून ती तो माझ्या भावाजवळही द्यायची नाही. त्या तांब्यावर तिचे खूप प्रेम होते, कारण तो तिला तिच्या धाकटय़ा भावानी म्हणजे मामानी दिला होता. बहीण धाकटय़ा भावाला जशी मायेने जपते तसाच तो तांब्या ती जपत होती. वरच्यावर आई तो चिंचेने व मातीने लख्ख घासायची. तेव्हा तर तो खूप छान दिसायचा. पितळेच्या मोठय़ा डब्याशेजारीच तो ठेवलेला असायचा.
कालानुरूप पुढे अनेक बदल घडले. प्रवासात तांब्याच्या जागी वॉटर बॅग आल्या. वयोमानानुसार आई-वडिलांचे प्रवासही कमी झाले. मग त्या तांब्याचा उपयोग कडधान्य-साबुदाणा वगैरे ठेवण्यासाठी झाला. छोटे फुलपात्र रोजच्या भांडय़ात झाले. वडील गेल्यावर आईही थकली. डबे घासण्याची ताकद कमी झाली. त्यातच तेथे जुनी जागा- चाळ पाडून नवी इमारत बांधण्याचे ठरले म्हणून आईला दोन-तीन वर्षे दुसऱ्या पर्यायी, पण लहान जागेत राहण्याची वेळ आली. आईला भांडी-कुंडी, संसार आवरता घ्यावा लागला. पितळेचे डबे एकात एक घालून त्यापैकी एका मोठय़ा डब्यातच तो तांब्या ठेवून दिला. वयोमानाप्रमाणे आईची स्मरणशक्तीही कमी होत गेली. घरातला पसारा व वस्तू कमी करायच्या म्हणून जुनी मोठमोठी पातेली- डबे विकायला काढले. घरातल्या त्या वस्तू विकताना आईचे मन खूप हळहळायचे, पण इलाज नव्हता. आम्हाला मुलांचा त्या वेळी स्टीलचा संसार होता त्यामुळे आम्हाला त्या पितळेच्या अवजड भांडय़ात कुणालाच रस नव्हता. आई सारखी म्हणायची की, सगळी जुनी भांडी विकेन, पण माझा फिरकीचा तांब्या नाही बाई विकणार! पण कसं कोण जाणे तिच्या अनवधानामुळे जुने डबे विकले त्या वेळी तो डब्यातला तांब्याही विकला गेला. ते माझ्या भावाच्याही लक्षात आले नाही. सर्व आवराआवर झाल्यावर तांब्या तिला दिसेना. खूप भांडी उलटी-सुलटी करून, मागे-पुढे सरकवून ती तांब्या शोधीत होती. तांब्या दिसेना तेव्हा तो डब्यांबरोबरच मोडीत गेला असावा अशी तिची खात्री झाली. ती खूप बेचैन झाली. जिथे मोड दिली होती त्या दुकानात स्वत: जाऊनही तिने चौकशी केली, पण या गोष्टीला खूप उशीर झाला होता. तिथेही तांब्याचा शोध लागला नाही म्हणून ती कमालीची अस्वस्थ झाली. मी तिच्याकडे गेले की, प्रत्येक वेळी हळवी होऊन ती त्या तांब्याबद्दल व तिच्या भावावरील प्रेमाबद्दल बोलून दाखवायची. (त्या वेळी तिचा भाऊही हयात नव्हता.) त्यामुळे ती जास्तच भावनाविवश व्हायची. तिची व्यथा मला समजायची. मलाही वाईट वाटायचे. त्या निर्जीव वस्तूवरील प्रेम व भावना यामुळे तिच्या मनातील भावनांचा गुंता जास्तच वाढत होता. एकदा मी पुण्याला गेले असता तुळशी बागेतून भातुकलीच्या खेळातील तसाच छोटा स्टीलचा तांब्या घेऊन आले, पण तिने त्याला हातही लावला नाही.
वास्तूवरील प्रेमाप्रमाणेच निर्जीव भांडय़ावरील प्रेमातही आपण भावनेने गुंततो हा अनुभव मलाही आहे. आमच्या नवीन संसाराकरिता ५०/५५ वर्षांपूर्वी सासूबाईंनी त्यांच्या वेळची बरीच जुन्या घाटाची पितळेची भांडी आणली होती, पण त्यांच्या पश्चात मीही ती विकली व मला हवी असलेली स्टीलची भांडी घेतली. मात्र त्यांनी आणलेला गडू टाइप जड व घाटदार तांब्या मला खूप आवडलेला. मी विकला नाही व माझ्या हयातीत विकणारही नाही. पूर्वी पाणी पिण्यासाठी आम्ही तो वापरत होतो, पण पुढे सोयीनुसार स्टीलची तांब्या-भांडी आली, पण तो घाटावर पितळेचा जड गडू टाइप तांब्या आता आम्ही आंघोळीसाठी वापरतो. दोन दोन दिवसांनी तो पावडरनी घासला तरी पूर्वीसारखा छान व चकचकीत दिसतो.
– शुभदा कुळकर्णी
(१६ मे च्या ‘वास्तुरंग’ मधील ‘सलाम भाऊच्या धक्क्याला’ हे पत्र शुभदा कुळकर्णी यांचे आहे.)