जलप्रपातातून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा योग्य वापर करून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या आधारे प्रचंड दगडी जाते फिरते ठेवणे आणि त्यावर धान्य दळून सैन्याची रसद भागवणे, ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अमलात आणण्याचा प्रयोग औरंगाबादमध्ये झाला. त्यावेळचे शास्ते अभियांत्रिकीत कसे जाणकार होते याचाच हा पुरावा..
पृथ्वीच्या जन्मापासून तिच्या अफाट पसाऱ्यातील निसर्गरहस्य समजावून घ्यायला मानवाचा लाखो वर्षांचा काळ गेला. भूमातेच्या गर्भातील प्रचंड ऊर्जा, वादळ, पाऊस, वारा, धरणीकंप आणि महापुरांनी भयभीत झालेल्या मनुष्यप्राण्याला दैनंदिन मूलभूत गरजा भागवण्यासाठी प्रवासाबरोबर अग्नी व पाण्याची निकड होतीच. ‘गरज ही शोधाची जननी आहे,’ या सूत्राची अनुभूती ज्या काळात मानव प्राथमिक अवस्थेत वावरत होता तेव्हापासूनच प्रत्ययाला आली. उपलब्ध नैसर्गिक साधनांच्या आधाराने त्याने गरजा भागविण्यासाठी बुद्धीची जोड द्यायला सुरुवात केली. गती साधण्यासाठी उत्क्रांतीच्या अवस्थेत त्याला चाकाची कल्पना सूर्यनारायणाच्या दर्शनाने सुचली, तर जलप्रवासाला लाकडी नाव सुलभ आहे त्या नावेची कल्पना माशाच्या आकारावरून सुचल्याचे बोलले जाते.
गरजेतून नवनिर्मिती आणि कालांतराने त्यात सुधारणा हा तंत्रज्ञानातील होणारा बदल त्याकाळीही धीम्यागतीने चालला होता. झंझावती वाऱ्यामध्ये एक बेमालूम ऊर्जा आहे याची कल्पना आल्यावर इ.स. पूर्व काळापासून जलप्रवासाच्या नावेसाठी शिडाच्या होडीच्या साह्याने त्या ऊर्जेचा वापर करण्याचा परिपाठ सुरू झाला. याच ऊर्जेचा वापर करून जीवनावश्यक पाण्याची गरज भागविण्यासाठी पवनचक्कीचा शोध लागण्यासाठी मात्र त्यानंतर हजारो वर्षांचा काळ गेला. भरभरून देणाऱ्या निसर्गराजाच्या औदार्याने त्याच्या पवनशक्तीचा वापर करून पाणी उपसा आणि विजनिर्मितीसाठी आजही जगातल्या प्रगत राष्ट्रांत पवनचक्कीची चक्र गतिमान होताना दिसताहेत.
आपल्या देशात वसाहतवादातून आक्रमक झालेल्यांनी, साम्राज्य विस्तार करणाऱ्यांनाही पाणी आणि दैनंदिन रसद याची गरज भागवण्यासाठी पाणचक्कीच्या निर्मितीतून जल अभियंत्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा प्रयोग मराठवाडा भूमीत औरंगाबाद येथे झाला. ती म्हणजे पर्यटक तसेच अभ्यासकांना अवाहने करणारी बाराशे वर्षांची पुरातन पाणचक्की.. औरंगाबाद शहर दर्शनामध्ये या पानचक्कीला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जलप्रपातातून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाचा योग्य वापर करून त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या आधारावरती दगडी जाते फिरते ठेवणे आणि त्यावर दळण दळून सैन्याची रसद भागवणे ही कल्पना चारशे वर्षांपूर्वी अमलात आणण्याचा प्रयोग औरंगाबाद नगरीत झाला. त्यावेळचे आमचे शास्ते अभियांत्रिकीत कसे जाणकार होते याचाच हा पुरावा आहे.
‘खाम’ नदीच्या काठावरचे पाणचक्की या ठिकाणी पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा हे दोन्हीही उद्देश साधले आहेत.
मोघल सरदार मलिक अंबर यांनी आपल्या अधिपत्याखालील औरंगाबाद शहराला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘सायफन’ पद्धतीचा वापर करून ‘नहर-ए-अंबरी’ नावाची पाणीपुरवठा योजना आखली होती. जेथे पाणचक्की आहे त्याच्या प्रांगणात सुफीसंत बाबा शहा मुसाफिर हे अवतारी पुरुष राहात असत. तेव्हा या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यांचे शिष्य बाबा शहा महदूम यांनी पाणचक्कीचे बांधकाम पूर्णत्वास नेले. याव्यतिरिक्त दरगा, खामनदीवरील वेस व वाहतुकीसाठी पूल ही बांधकामेदेखील त्यांच्याच कल्पकतेने पूर्ण झाली.
कोणत्याही अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाची जोड नसताना मनुष्यबळाच्या साह्याने खामनदीच्या उगमस्थानी प्रथम पाणी अडविण्यासाठी तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जी िभत उभारली आहे त्यासाठी विटा आणि चुन्याचा वापर केला गेला. तलावातील साठवलेले पाणी सुमारे चार मैल अंतरावरील ऐतिहासिक मकबरा वास्तूपर्यंत आणण्यासाठी ‘नहरी’ म्हणजेच कालव्याचा मार्ग खोदून ते पाणचक्कीपर्यंत आणले गेले. या पाणीपुरवठा योजनेसाठी त्या काळी चार लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.
औरंगाबादच्या उत्तरेकडे ५ कि.मी. अंतरावर भरपूर पाणी साठय़ाचे ‘जटवडय़ा’चे पहाड आहेत. येथील पाणीसाठा एकत्रित करून कालव्यांनी बीबीच्या मकबऱ्यापर्यंत आणण्यात यशस्वी झाल्यावर त्या पाणी प्रवाहाला बंदिस्त करून भूमिगत मातीच्या नळांनी हे पाणी पाणचक्की प्रांगणात आणले गेले. हा जलप्रवाह नळाच्या साह्याने उंच िभतीवर चढवून एका मोठय़ा हौदात सोडला गेलाय. येथे एक ध्यानी घेतले पाहिजे की, पाणचक्कीच्या पातळीपेक्षा पाण्याच्या उगमस्थानाची पातळी उंचावर असल्याने कोसळणाऱ्या पाण्याच्या दाबाद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करण्यात अभियंते यशस्वी झालेत.
सायफन पद्धतीचा वापर करून जे पाणी भिंतीवर नेण्यात आले तेथून ते ज्या हौदामध्ये पडते तो हौद सुमारे १६२ फूट लांब, ३१ फूट रुंद व चार फूट खोल आहे. तसेच त्यामध्ये १ लाख २८ हजार गॅलन पाणी साठवण्याची त्याची क्षमता आहे. या हौदाच्या नजीकच पुरातन मशीद असून त्याचे बांधकाम म्हणजे बंगाली-ईस्लामी वास्तुशास्त्राचा अनोखा मिलाफ आहे.. जो जलप्रवाह कोसळतो तेथून उतरंडीच्या िभतीत नळ बसवून हे पाणी एका छोटेखानी खोलीत आणले गेले आहे. याच ठिकाणी भलेभक्कम भव्य लोखंडी पात्याचे चक्र भक्कम लोखंडी दांडय़ावर बसवले आहे. िभतीवरून कोसळणारा जलप्रवाहाचा दाब लोखंडी पात्यावर पडल्याने त्या लोखंडी चक्राला गती प्राप्त होऊन लोखंडी दांडा फिरता राहतो.
त्या दांडय़ाच्या मध्यभागी जे भलेमोठे दगडी जाते आहे ते या दांडय़ाच्या गतीच्या आधारे सतत फिरते राहिल्याने धान्य दळण्याचे काम विनासायास पार पाडले जाते. थोडक्यात, पाणी प्रवाहातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर करून दळणाच्या दगडी जात्याला गती प्राप्त झाली.
पाणचक्की हे ठिकाण फक्त जल व्यवस्थापनासाठी सर्वश्रुत होते असे नव्हे तर ते एक यात्रेकरू, पांथस्थ तसेच धार्मिक अध्यापन करणाऱ्यांचे सांस्कृतिक शैक्षणिक केंद्रही होते. मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळी पाणचक्कीला जोडून निवास व्यवस्थेसाठी बांधकाम करण्यात आले. या बांधकामाला ‘खानका’ असे म्हणतात. या निवासात अध्ययन- पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास-भोजनाची सोय होती. तेथील अरेबी, फारसी ग्रंथसंपदेचे ग्रंथालय आशियातील सर्वात मोठे ग्रंथालय होते.
पाणचक्कीच्या परिसरात बाबा शहामुसाफीर व त्यांचे शिष्य बाबा महदूम यांच्या कबरी आणि दर्गावास्तू असून त्यांच्या बांधकामासाठी काळय़ा पाषाणाचा वापर केला असून त्याला विटांसारखा लाल रंग दिला आहे.
सध्या या पाणचक्की आणि त्याचे व्यवस्थापन तथा नियंत्रण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे आहे. ही पुरातन जलव्यवस्थापन पद्धती आणि वास्तुकला बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात.
चार शतकांपूर्वीचे हे जल अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि त्यासाठी उभारलेली वारसा वास्तू बघितत्यावर त्यावेळच्या प्रजाहितदक्ष- दूरदृष्टीच्या शासनकर्त्यांच्या कल्पकतेची जाणीव होणारच.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना