मैत्र हिरवाईचे : वास्तूमधील हरितमित्र

घरातल्या छोटय़ाशा कोपऱ्यात, बाल्कनीत वा गच्चीत झाडे लावताना त्यांची कशाप्रकारे जोपासना करावी, त्यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे सांगणारे सदर.. घर असो वा बंगला किंवा सदनिका, लहान वा मोठे असा फरक करण्यापेक्षा जे आहे ते आपल्या मालकीचे याचा जो आनंद त्या वास्तुधारकास मेळतो त्यास तोड नसते.

घरातल्या छोटय़ाशा कोपऱ्यात, बाल्कनीत वा गच्चीत झाडे लावताना त्यांची कशाप्रकारे जोपासना करावी, त्यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे सांगणारे सदर..
घर असो वा बंगला किंवा सदनिका, लहान वा मोठे असा फरक करण्यापेक्षा जे आहे ते आपल्या मालकीचे याचा जो आनंद त्या वास्तुधारकास मेळतो त्यास तोड नसते. अशा या स्वमालकीच्या घरास पुढे अंगण, पाठीमागे परसदार, बंगला असेल तर वरची प्रशस्त गच्ची आणि सदनिकाधारक असल्यास आणि तेही बाल्कनीसह म्हटल्यावर आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटते. आपल्या घरास बाल्कनी नाही या एका कारणामुळे अनेक सदनिकाधारक आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कायम खंत ठेवून असतात.
घर म्हटले की त्यामध्ये पती वा पत्नी, मुले, आजी, आजोबा, नातेवाईक यांची सतत वर्दळ चालू असते आणि यालाच आपण भरलेले घर म्हणतो. याचा आनंद वेगळाच. घरात जेमतेम एक- दोन माणसे, ती सकाळीच बाहेर पडणार आणि सायंकाळी परत येणार अशी वास्तू फक्त निवारा म्हणूनच कार्यरत असते. अशा ठिकाणी अनेक वेळा हवेहवेसे वाटणारे घरपण हरवलेले दिसत असले, तरी नाइलाजाने हा पर्याय स्वीकारावा लागतो. अशा रिकाम्या घरात अचानक छोटा
पाहुणा आला तर मात्र आनंदास सीमा नसते. थोडक्यात, दोघात तिसरा, जोडीला अजून कोणीतरी असेल तर, सर्व आनंदात अडीअडचणीत एकमेकांना साथ देत असतील तर, असे घरपण काही वेगळेच असते. अनेक वेळा अशा वेगळेपणातही पाळीव प्राण्यांची सोबत असेल तर घरपणात वेगळा रंग भरला जातो. ज्या वेळी आपण अशा बोलणाऱ्या, हसणाऱ्या, हालचाल करणाऱ्या लोकांचा विचार करत असतो तेव्हा आपल्याच जवळ, शेजारी असलेल्या, अबोल, स्तब्ध, पण वाऱ्याच्या मंजूळ झुळुकीनेसुद्धा छान प्रतिसाद देणाऱ्या आपल्या हरित मित्रास विसरलेले असतो. त्याच्या अस्तित्वाशिवाय घर ही संकल्पनाच पूर्ण होऊ शकत नाही. हे जरी सत्य असले तरी घरातील जागा, राहणाऱ्या लोकांचे ज्ञान-अज्ञान, शंका-कुशंका यांमुळे अनेक लोक छानशा कुंडीमध्ये अगदी सहजपणे वाढणाऱ्या आपल्या हरित सोबत्यांच्या सहवासास दुरावलेले आढळतात. घर म्हटले की अंगणी तुळस हवीच. सोबत झेंडू, पारिजातक, शेवंती का नको? परसदारी अळू, पुदिना आणि माहेरची केळही हवीच. बंगल्याच्या गच्चीवरून सोडलेला छानसा वेल आाणि सुबक पद्धतीने मांडलेल्या छान फुलझाडांच्या कुंडय़ा असतील तर घरातील वर्दळ कायम गच्चीकडेच मार्गस्थ झालेली दिसते. मग बाल्कनीबद्दल काय बोलणार? सदनिकेचा हा सर्वात सुंदर भाग, लहान असो वा मोठा, येथे आमच्या हरित मित्रांची कुंडीमधील लहानशी वसाहत घरातील सर्व सदस्यांबरोबर आपली जागा न बदलता अगदी सहजपणे आपला आनंद व सहवास वाटत असते.
आपल्या दैनंदिन सहवासामधील हे लहान-मोठे हरित मित्र जे घरात, गच्चीवर, बाल्कनीत अथवा घराबाहेर परिसरात असतील तर आपण त्यांची नियमित विचारपूस करावयास हवी. कुंडीतील लहान रोप असो अथवा परिसरातील मोठा वृक्ष, तो जरी नि:शब्द, स्थितपर्ण असला तरी आपल्यासाखाच एक जीव आहे. त्याच्याकडेसुद्धा भावना आणि मत्रीचा ओलावा असतोच. वृक्ष सहवासामध्ये राहाणाऱ्या व्यक्ती कायम आनंदी, आरोग्यदायी आणि ताणतणावापासून मुक्त असतात हे आता विज्ञानाने सप्रयोग सिद्ध केले आहे. मात्र त्यासाठी आपणास योग्य अशा हरित मित्रांचीच निवड करावी लागते. घरातील लोकांच्या प्रेमळ सहवासाइतकाच किंबहुना एक कांकणभर अधिकच आनंददायी सहवास आपण घरातील वनस्पतींपासून मिळवू शकतो. त्यांच्या असण्याने प्रसन्नता तर वाढतेच, पण त्याचबरोबर सभोवतीच्या प्रदूषणावरही अगदी सहजपणे नियंत्रण ठेवता येते. कुंडीतील झाडे, परिसरातील वृक्ष, लतावेली या हरित गृहसंकुल योजनेचा प्राणवायू आहेत.
आपले शहर हरित असावे असे आपण म्हणतो, पण या सुंदर संकल्पनेचा स्रोत आपले स्वत:चे घर असते, हे आपण सोईस्करपणे विसरतो. कागदावरील हरित शहर कल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्यासाठी प्रत्येक वास्तुधारकाने आपली वृक्षओंजळ या हरितगंगेस समíपत करावयास हवी. ही काळाची गरज तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या भावी पिढीसाठी सुदृढ पर्यावरणाची मजबूत बठकसुद्धा बनेल. या स्वच्छ वाहत्या हरितगंगेतील काही शुभ्र थेंबांचा वास्तूशी येणारा संबंध कसा असू शकेल याचा ओघवता परिचय आपण या लेखमालिकेच्या माध्यमातून करून घेऊ या!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nature friendly housing