नवी मुंबई : एक समृद्ध शहर

जेमतेम चाळीस वर्षे वयोमान असणाऱ्या नवी मुंबईची आज भल्याभल्यांना भुरळ पडली असून, देशातील दुसरे आणि राज्यातील पहिल्या नियोजनबद्ध शहराची आजची लोकसंख्या वीस लाख असली तरी भविष्यात हा आकडा एक कोटीच्या घरात जाणार आहे.

जेमतेम चाळीस वर्षे वयोमान असणाऱ्या नवी मुंबईची आज भल्याभल्यांना भुरळ पडली असून, देशातील दुसरे आणि राज्यातील पहिल्या नियोजनबद्ध शहराची आजची लोकसंख्या वीस लाख असली तरी भविष्यात हा आकडा एक कोटीच्या घरात जाणार आहे.
सुपरसिटी म्हणून गणल्या गेलेल्या नवी मुंबईला म्हणावा असा भूतकाळ नसला तरी या शहराला उत्तम भविष्यकाळ आहे, असे म्हटले जाते. सुमारे साडेतीनशे किलोमीटर क्षेत्रफळावर वसलेले हे शहर देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून उदयास येत आहे. जेमतेम चाळीस वर्षे वयोमान असणाऱ्या या शहराची आज भल्याभल्यांना भुरळ पडली असून, देशातील दुसरे आणि राज्यातील पहिल्या नियोजनबद्ध शहराची आजची लोकसंख्या वीस लाख असली तरी भविष्यात हा आकडा एक कोटीच्या घरात जाणार आहे. मुंबईवर आदळणारे लोकसंख्येचे लोंढे थोपविण्यासाठी सरकारने जुलै १९५८ रोजी नवीन शहर वसविण्याचा विचार केला. त्यानंतर बारा वर्षांनी हे शहर वसविण्याची जबाबदारी शासनाने सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोवर सोपविण्यात आली. सिडकोनेही निवासी, वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पायाभूत सुविधांनी युक्त असे शहर वसविण्याचे उत्तरदायित्व पार पाडल्याचे दिसून येते. सर्वसाधारपणे घर, पाणी, वीज, रस्ते, दळणवळण आणि शैक्षणिक सुविधा बघूनच नागरिक एखाद्या शहराची निवड निवासासाठी करीत असतात. नवी मुंबई या सर्व सुविधांनी इतर शहरांच्या तुलनेत काकणभर सरस आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा कधीही भासणार नाही असे नियोजन सिडको आणि पालिका या दोन स्थानिक प्राधिकरणांनी केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेले आणि आर्थिक अडचणीमुळे अडगळीत पडलेले खालापूर येथील मोरबे धरण पालिकेने घेण्याचे धारिष्टय़ दाखविले. त्यासाठी साडेचारशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण असलेली नवी मुंबई पालिका दुसरी पालिका ठरली. या धरणात साडेचारशे दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. पालिकेने मोरबे धरण घेतल्याने सिडकोने हेटवणे (३५० दशलक्ष लिटर) आणि बाळगंगा (३५० दशलक्ष लिटर) ही धरणे विकसित केलेली आहेत. त्यामुळे भविष्यात ११५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. दळणवळणाची गरज भागविताना सिडकोने आपल्या १४ नोडमध्ये ६५० किलोमीटर रस्त्याची निर्मिती केलेली आहे. त्यावर चार लाख खासगी आणि १२०० शासकीय वाहनांची रेलचेल सुरू आहे. रेल्वेचे जाळे विणल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही हे ओळखणाऱ्या सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर ६७ टक्के खर्चाचा हिस्सा उचलून नवी मुंबईत रेल्वेचे जाळे तयार केले आहे. त्यामुळे मानखुर्द-पनवेल मार्गावर ८९ आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर ३२ गाडय़ांची धडधड दररोज सुरू आहे. त्यातून दहा लाखांपेक्षा जास्त प्रवासी आज प्रवास करीत आहेत. याशिवाय केडीएमटी, बेस्ट, केएनपीटी, एसटी या शासकीय वाहतूक व्यवस्था जोरात आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना एखाद्या स्थानकावर दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत नाही.
९८ टक्के  लोकसंख्या सुशिक्षित असणारे हे शहर विद्युत बिल भरण्यामध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे या शहरात विद्युतपुरवठा खंडित करण्याचे प्रकार येथे होत नाहीत. शैक्षणिक सुविधांबाबत हे शहर देशातील इतर शहरांपेक्षा आता वरचढ ठरू लागले आहे.
एज्युकेशनल हब
नवी मुंबईला एज्युकेशन हब म्हटले जाते. शहरात २२८ प्राथमिक, १४१ माध्यमिक, ६२ उच्च माध्यमिक, बारा पदवी, चार डीएड, १८ इंजिनीअरिंग, पाच पॉलिटेक्निक, सात शिपिंग, १२ नर्सिग, तीन फार्मसी, तीन माहिती तंत्रज्ञान, बारा मॅनेजमेंट, चार हॉटेल मॅनेजमेंट, तीन विधी, तीन संगणक तंत्रज्ञान, तीन वास्तुविशारद, तीन मेडिकल, पाच डेंटल, दोन आयुर्वेद, दोन रिसर्च आणि सात सर्वसाधारण महाविद्यालये आहेत. याशिवाय सीबीएसई व आयसीएसई अशी डझनभर विद्यालये आहेत.
रोजगाराची संधी
रोजगाराच्या अनेक संधी शहरात उपलब्ध असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, खोपोली या शहरांमधून कामानिमित्ताने येणाऱ्यांची संख्या लाखो आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक नगरी, रिलायन्स उद्योग समूहाची घणसोली, कोपरखैरणे येथील मुख्यालये, एपीएमसीची सर्वात मोठी बाजारपेठ, वाशी, सीबीडी रेल्वे स्थानकातील इन्फोटेक आणि टेक्नॉलॉजी सेंटर, कळंबोली येथील स्टील, लोखंड बाजार, जेएनपीटी यांसारखे मोठे उद्योग नवी मुंबईत आहेत.
रियल इस्टेटचा सर्वात मोठा उद्योग आज नवी मुंबईला जागतिक पातळीवर घेऊन गेला आहे.
सांस्कृतिक नवी मुंबई
रोटी, कपडा और मकान या माणसाच्या प्राथमिक गरजांव्यतिरिक्त सांस्कृतिक भूक भागविणारे वाशी, पनवेल येथे असलेले नाटय़गृह, ऐरोलीत लवकरच आणखी एक नाटय़गृह तयार होत आहे. मॉल, पब, सिनेमागृह, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट नवी मुंबईत दररोज एक उघडत आहेत. खारघरमधील गोल्फ कोर्स, वाशीतील एक्झिबिशन सेंटर, पनवेलमधील नियोजित विमानतळ, खारघरमधील सेंट्रल पार्क, द्रोणागिरीमधील एसईझेड, मेट्रो, सायन्स सेंटर, सीबीडीतील अर्बन हाट, नेचर पार्क, व्हॅली पार्क, पामबीच मार्ग, एनआरआय वसाहत, पालिकेचे मुख्यालय, नेरुळमधील वंडर पार्क, ऐरोलीतील बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिभवन, सांडपाणी पाण्यावरील प्रक्रिया केंद्र, कॅन्सरचे मुंबईनंतरचे खारघर येथील दुसरे रुग्णालय, सिडको नव्याने बांधत असलेली दोन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटले अशा अनेक प्रकल्पामुळे नवी मुंबई सर्व शहरांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Navi mumbai a rich city

ताज्या बातम्या