scorecardresearch

निवारा : ग्रामीण भारतात असलेली वास्तुकलातज्ज्ञांची गरज

ग्रामीण भागात काम करताना एककेंद्री एक अमली कारभार चालवणे चुकीचे ठरते.

घराचा आराखडा त्रिमिती मॉडेलमधून समजावताना वास्तुशिल्पी.

विनिता कौर चिरागिया

भारत हा खेडय़ांचा देश आहे. शेतीप्रधान देश आहे. अशा भारतात आजघडीला ४५० वास्तुकला महाविद्यालये आहेत. दरवर्षी जवळ जवळ ३६०० आर्किटेक्ट (वास्तुशिल्पी) या महाविद्यालयातून बाहेर पडतात. तरीही त्यातील जास्तीत जास्त व्यावसायिक वास्तुशिल्पी एकूण लोकसंख्येच्या केवळ ३१% असलेल्या शहरी लोकसंख्येसाठी काम करताना दिसतात. ६९% ग्रामीण लोकसंख्येला, समाजाला त्यांच्या व्यावसायिक ज्ञानाचा किंवा कामाचा उपयोग होत नाही. परिणामी या मोठय़ा समाजाच्या पायाभूत सुविधा अनियोजित आणि दुर्लक्षित राहतात. आजही जातीत जास्त गावात मेस्त्री किंवा बेलदार हाच घरांच्या आणि गावांच्या रचनेचा रचनाकार असतो. बांधकामाचे नियोजनही तोच करतो. जरी हे मेस्त्री गावातील घरांचे नियोजन आणि बांधकाम उत्तम करत असले तरी गावाच्या रचनेचे योजनाबद्ध नियोजन, भविष्यातील गरजा आणि आजच्या काळातील वाढलेल्या आधुनिक गरजांचे दृश्यमान इत्यादींवर काम करताना त्यांच्या कौशल्यांना मर्यादा पडतात.

भारतातील दोनतृतीयांश (२/३) भाग हा ग्रामीण आहे आणि केवळ ०.२५% वास्तुशिल्पी या भल्या मोठय़ा भागातील लोकसंख्येसाठी कार्यरत आहेत. शहरीकरण झपाटय़ाने वाढतेय. शहरांचा आवाका आजूबाजूच्या गावांना गिळंकृत करीत आहे. अर्थव्यवस्थेचा भस्मासुर नीतिमत्तेला बाजूला सारून आंधळे शहरीकरण लोकांच्या मनात थोपवतो आहे. या झटपट फोफावणाऱ्या शहरीकरणामुळे अतिशय विद्रूप आणि अनियोजित नगरे डोके वर काढीत आहेत. ही नगरे निर्माण होताना नैसर्गिक स्रोतांचा नाश तर  होत आहेच, पण नियोजन नसल्याने आर्थिक नुकसान होऊन राहणीमानाचा दर्जाही खालावत आहे. अनारोग्य, सांडपाण्याचा अयोग्य निचरा, गर्दी, कोंडलेल्या गल्ल्या, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक समस्या निर्माण होत आहेत. याचबरोबर काही दशके आणि शतके परंपरेने आलेले ज्ञान आणि स्थानिक कौशल्याचा नाश होत आहे. हे न भरून काढता येणारे नुकसान आहे.

या सर्व समस्यांकडे पाहून ग्रामीण भागात वास्तुशिल्पीची (आर्किटेक्ट) गरज अधोरेखित होते. परंतु ग्रामीण भागात काम करताना वास्तुशिल्पकलेसारख्या वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या क्षेत्राला बरेच संवेदनशील आणि अंतर्मुख व्हावे लागते. शहरी भागात काम करताना बऱ्याचदा वास्तुशिल्पी नैसर्गिक स्रोत, बांधकाम साहित्य आणि त्याचे शहराच्या आजूबाजूला होणारे परिणाम याबाबत अनभिज्ञ असतो. स्थानिक कौशल्यापेक्षा औद्योगिक साहित्याकडे त्याचा कल जास्त असतो. कारण त्यात कमी परिश्रमात जास्त आर्थिक नफा कमावता येतो. परंतु ग्रामीण भागात काम करत असताना या सर्व बाजूंची समज आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. तेव्हाच गावांची शाश्वतता टिकवून ठेवण्यात आपल्याला यश येईल.

ग्रामीण भागात काम करताना एककेंद्री एक अमली कारभार चालवणे चुकीचे ठरते. इथे प्रत्येक व्यावसायिकाला किंवा वास्तुशिल्पीला उत्प्रेरकाप्रमाणे काम करायला हवे. (उत्प्रेरक- ज्या पदार्थामुळे रासायनिक प्रक्रियेची गती वाढते; परंतु त्या पदार्थाचा त्या प्रक्रियेत सहभाग नसतो.) ग्रामीण भागात काम करताना वास्तुशिल्पीला काम करण्याच्या नवीन नवीन पद्धती शोधाव्या लागतात. उदाहरण द्यायचे झाले तर- नकाशे आणि आराखडे ग्रामीण व्यक्तींना समजणे कठीण असते. अशा वेळी जमिनीवर रांगोळीने नकाशे बनवणे किंवा त्रिमिती मॉडेल बनवून संकल्पना समजावून सांगणे अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या आखण्यापासून वास्तुशिल्पीला काम करावे लागते. तसेच केवळ बांधकामाचे ज्ञान असणे पुरेसे ठरत नाही, तर पर्यावरण, स्थानिक झाडेझुडपे, प्राणी, भौगोलिक परिस्थिती, हवामान यांचा योग्य अभ्यास असणेसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्व विषयांची सांगड घालून एक प्रभावी अभिकल्प वास्तुशिल्पी रेखाटू शकतो.

ग्रामीण भागात काम करत असताना वास्तुशिल्पीचे ‘अभिकल्प’ (design) किंवा ‘विकासाच्या व्याख्या’ या गरजांवर केंद्रित असव्यात. परंतु या गरजा भागवताना त्या भागाची स्थानिक ओळख अबाधित ठेवणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. आजघडीला जवळजवळ सर्वच गावांची स्थानिक ओळख मिटून जाताना दिसत आहे आणि याला आपण सर्वच जबाबदार आहोत.

वास्तुतज्ज्ञांच्या अभिकल्पातून स्थानिक कला आणि कौशल्यांना योग्य रीतीने सामावून वाव देता येऊ शकतो. यामुळे स्थानिकांचे आर्थिक सबलीकरण होऊन पसा बाहेर न जाता ग्रामीण भागात टिकून राहू शकतो. गावातल्या गावात चक्रीय अर्थव्यवस्था सुरू राहू शकते. यामुळेच काही किलोमीटरच्या परिघामध्ये व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात.

शाश्वत सामाजिक विकास हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असून, यामध्ये पायाभूत सुविधा या समाज केंद्रित, समाजाबरोबर नियोजन केलेल्या, समाजासाठी समाजाने केलेल्या असाव्यात. यामध्ये वास्तुशिल्पी गोष्टी एकत्र आणण्याचे काम करू शकतो आणि त्या कार्यक्रमाचा सूत्रधार बनू शकतो. अशा पद्धतीने पायाभूत सुविधा निर्माण केल्यास समाज त्याच्याशी बांधील राहतो, समाजाला त्याबद्दल आपलेपणा वाटतो. अशा अभिकल्पाशी समाज एकरूप होतो. या अशा पद्धतीने उभारलेले उत्तम उदाहरण म्हणजे वास्तुशिल्पी यतीन पंडय़ा यांनी अभिकल्प केलेले ‘गांधी-नु-गाम’ (कच्छ, गुजरात).

वास्तुशिल्पी हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून दृश्यमान योग्य संकल्पना आखण्यामध्ये पारंगत असतो. तर ग्रामीण समाजाकडे पारंपरिक शाश्वत अनुभव आणि ज्ञान यांचा खजिना असतो. ग्रामीण भागातील राहणीमानाची आणि गरजांची योग्य समज या समाजाला असते. या दोघांच्या समन्वयातून आपण एका सुदृढ आणि सर्वागीण विकासाकडे वाटचाल करू शकतो. अनियोजित आणि अस्ताव्यस्त वाढणाऱ्या गावांकडे पाहून वास्तुतज्ज्ञांनी ग्रामीण भागाकडे वळणे अत्यावश्यक आहे. पर्यावरण, संस्कृती, स्थानिक कौशल्य यांचा योग्य मिलाफ करून गावांचे नियोजन केल्यास गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करणे जास्त कठीण काम नाही.

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘स्वदेस’ चित्रपटाने अनेक तरुणांच्या डोक्यात गावाकडे वळण्याचे बीज रोवले. आज वेगवेगळ्या सोशल मीडियावर अशा अनेक तरुणांच्या कथासुद्धा वाचायला मिळत आहेत. एकूणच चांगले चित्र निर्माण होण्याच्या वाटेवर आहे. तरीपण ६.८ करोड व्यावसायिक असलेल्या देशात कुपोषण, बेरोजगारी आणि गरिबी यांसारख्या प्राथमिक समस्याही संपवणे आपल्याला शक्य झालेले नाही. हा चिंतनाचा विषय आहे. आपल्या व्यावसायिक शिक्षणापलीकडे जाऊन संवेदनशीलतेने ग्रामीण भागातील समस्यांकडे पाहणे आवश्यक आहे. आपल्या भारतीय परंपरेचे केवळ कोरडे कौतुक थांबवून तिचे संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.

अनुवाद- प्रतीक हेमंत धानमेर

vinita@designjatra.org

 

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Need for vastu art experts in rural india abn

ताज्या बातम्या