अ‍ॅड. तन्मय केतकर

मालमत्ता आणि त्यामधील हक्क आणि हिस्सा हा नेहमीचा वादाचा विषय असतो. एखाद्या पाल्याचे पालक हयात असेपर्यंत त्या पाल्याला त्या पालकांच्या मालमत्तेत स्वतंत्र हक्क किंवा हिस्सा असू शकतो का? हा महत्त्वाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयासमोर एका अर्जाद्वारे उपस्थित झाला होता.

या प्रकरणात अंथरुणास खिळून आणि स्मृतीभ्रंश झालेल्या पतीची काळजी घेणाऱ्या पत्नीने आपल्या पतीची अज्ञानपालनकर्ती (गार्डियन) म्हणून नेमणूक होण्याकरता न्यायालयात याचिका दाखल केली. सद्यस्थितीत विविध प्रकारे अपंग/ दिव्यांग व्यक्तींसंबंधात असलेल्या कायदेशीर तरतुदीमध्ये अशाप्रकारे अज्ञान पालनकर्ता म्हणून नेमायची स्पष्ट तरतूद नसली तरी न्यायालयाच्या पूर्वीच्याच आदेशांच्या आधारे या प्रकरणाचा निकाल देणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र दरम्यानच्या काळात अंथरूणास खिळून आणि स्मृतीभ्रंश झालेल्या व्यक्तीच्या अन्यत्र निवासास असलेल्या मुलाने न्यायालयात अर्ज करून आपण त्यांचे अज्ञानपालनकर्ता म्हणून काळजी घेत असल्याने, पित्याच्या मालमत्तेत आपल्याला हक्क व हिस्सा असल्याचा दावा केला. कोणत्याही जातीधर्माच्या वारसा कायद्यामध्ये आई-वडील हयात असेपर्यंत त्यांच्या नावावरील मालमत्तेत मुलाला असा हक्क मिळू शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

एवढेच नव्हेत तर पालकांच्या मालमत्तेत अशाप्रकारे हक्क व हिस्सा असल्याचे प्रतिपादन करणे हास्यास्पद असल्याचा खुलासादेखिल न्यायालयाने आपल्या निकालात केला आहे. आपल्या पित्याची केव्हाही काळजी घेतल्याचा कोणताही पुरावा सादर करू न शकल्याने मुलाचा अर्ज फेटाळण्यात आला आणि पतीची अज्ञान पालनकर्ती म्हणून नेमणूक होण्यासाठीचा पत्नीचा अर्ज मंजूर करण्यात आला.

या प्रकरणामध्ये वादातील सदनिका या  पती-पत्नीच्या नावावर होत्या. साहजिकच त्या त्यांच्या स्व-कष्टार्जीत मालमत्ता असणार असेच गृहीत धरायला हवे. पालक हयात असेपर्यंत त्यांच्या अशा स्वकष्टार्जित मालमतांमध्ये मुलांना काहीही हक्क व हिस्सा नसतो हे या निकालाने स्पष्ट झालेले आहे. याच सदनिका किंवा मालमत्ता जर वडिलोपार्जित असतील तर सगळे चित्रच बदलण्याची दाट शक्यता आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

tanmayketkar@gmail.com