मागील भागात आपण यज्ञवेदींच्या रचनांची माहिती करून घेतली. पण कुठलीही वास्तू उभी करताना त्यासाठी काही आलेखन किमान मनात त्याचा विचार करणे गरजेचे असते. हा विचार आपण या भागात करणार आहोत. शिवाय वेदींच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या विटांचाही विचार येथे केला जाणार आहे. शुल्बसूत्र हा इंजिनीअरिंग ड्रॉइंगचा प्राचीन आविष्कार आहे. त्या काळी फूटपट्टय़ा नव्हत्या. अशा वेळी दोरीच्या साहाय्याने मापे घेतली जात. यासाठी दोरी कशी असावी याविषयी एक सूचना मानवधर्मसूत्रात केली आहे. सूत्रकार म्हणतो, दोरीने मोजणी करण्यासाठी दोरीच्या दोन्ही टोकांना गाठी मारलेल्या, सर्वत्र सारख्या जाडीची आणि ताणली असता लांबी कमी-जास्त न होणारी असावी. ही सूचना अत्यंत महत्त्वाची, कारण ती ताणली गेल्यास मापं बदलण्याचा धोका असतो. एकदा ही पक्की दोरी तयार झाली म्हणजे विविध आकाराच्या वेदी तयार करता येतात. पूर्वी अग्निहोत्र ठेवण्याची पद्धत होती. यात गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नी अशा वेदी असत. यातील गार्हपत्य वर्तुळाकार, आहवनीय चौरसाकृती तर दक्षिणाग्नी ही अर्धचन्द्राकृती वेदी असते. मात्र या तीनही अग्नींचे क्षेत्रफळ सारखे असणे आवश्यक असे. या साऱ्या आकृती काढताना चौरसाची बाजू व वर्तुळाची त्रिज्या यांचा परस्परसंबंध सांगणारी सूत्रं आहेत. ह्या वेदी तयार करताना मापे काटेकोर असली पाहिजेत. ही मापे कशी काढावी यासाठी अनेक प्रकारची सूत्रं दिली आहेत. वानगीदाखल कर्ण कसा काढावा याविषयीचे सूत्र,
आयाममायामगुणँ विस्तारँ विस्तरेण तु।
समस्य वर्गमूलँ यत् तत्र्कण तद्विदोवितु:॥
मानव धर्मसूत्रकारांच्या मते, काटकोन त्रिकोणात लांबीला लांबीने गुणले व रुंदीला रुंदीने गुणल्यानंतर त्यांची बेरीज करून तिचे वर्गमूळ काढले तर कर्ण मिळतो.   
शुल्बसूत्रांतील विटा- कोणत्याही प्रकारच्या वेदीच्या बांधणीसाठी विटा अत्यंत महत्त्वाच्या असल्याने विटांच्या संदर्भात सर्वच सूत्रांत वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. विटा मातीशिवाय इतर कोणत्याही द्रव्यांनी करू नयेत, असा स्पष्ट नियम बौधायनात आहे. आपस्तंब शुल्बसूत्र व मानवसूत्रांत विटांची मापे देताना त्याच्या साच्यांची मापे दिली आहेत. त्यावरून विटा करण्यासाठी लाकडी साचांचा उपयोग केला जात असे, हे स्पष्ट होते. श्येन म्हणजे पक्षाच्या आकाराची यज्ञवेदी करताना त्याच्या पंखात तिरप्या विटा लागत असल्याने साच्याच्या फळ्या तिरप्या असाव्यात असे म्हटले आहे.
विटांचे प्रकार – विटांच्या आकारावरून त्यांचे निरनिराळे प्रकार असले तरी ओल्या व सुक्या विटा असे दोन प्राथमिक प्रकार आहेत. ओल्या मातीची वीट प्रथम तयार करून नंतर ती वाळवून भाजली जाते. ह्या क्रियेत वीटेचे माप बदलते. ओल्या वीटेपेक्षा भाजलेली वीट कितीने कमी होते त्याचा स्पष्ट उल्लेख बौधायन, आपस्तंब आणि मानव अशा सर्व शुल्बसूत्रांत येतो. सूत्रकार म्हणतात, इष्टका शोषपाकाभ्यां ित्रशन्मानास्तु हीयते। म्हणजे वाळल्यामुळे व भाजल्यामुळे विटा १/३० ने कमी होतात.
बौधायनाच्या दुसऱ्या अध्यायात ४३ ते ६० सूत्रे विटांच्या संदर्भात येतात. आजच्या काळात देखील विटांच्या बाबतीत जी काळजी घेतली जाते तशीच काळजी इ.स. पूर्व आठशेत घेतली जात होती ही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. यानुसार फुटकी वीट, मध्ये चीर असलेली वीट, जुनी वीट, काळ्या रंगाची म्हणजेच जास्त भाजलेली वीट वापरायला बंदी आहे. शिवाय ‘न लक्ष्माणमुपदध्यात्’ म्हणजेच चिन्ह असलेली वीट वापरू नये असे सांगितले आहे. लक्ष्म म्हणजे ‘चिन्ह’ किंवा ‘खूण’. वीट तयार करताना त्यावर लाकूड, दगड किंवा इतर कोणत्याही वस्तूचा छाप पाडला असल्यास ती वीट वापरायला बंदी करण्यात आली आहे.
वर आपण चितींचा उल्लेख केला आहे. ह्या चितींची निर्मिती करताना विटा व मातीची एक विशिष्ट रचना तयार करतात. उदाहरणार्थ, अग्निचिती रचताना तिच्या थरांमधे ओली माती अशा प्रकारे ठेवतात की चितीचा आतील भाग उंच व टोकाकडील भाग निमुळता होत जातो. तर कूर्मचितीत मध्यभागी ओली माती जास्त व कडेला थोडी ठेवल्याने कासवाच्या पाठीप्रमाणे मधला भाग फुगीर दिसतो. याउलट द्रोणचितीत कडांना ओली माती जास्त व मध्यभागी कमी ठेवल्याने द्रोणाचा आकार प्राप्त होतो, अशा असंख्य गोष्टी सांगितल्या आहेत.
प्राचीन काळात यज्ञाला अनन्यसाधारण महत्त्व होते. हे यज्ञ काटेकोरपणे केले जात. त्यात होणारी थोडीशी चूकसुद्धा यज्ञफळापासून खूप दूर नेणारी होती. त्यामुळे यज्ञाच्या निमित्ताने भारतीयांनी अनेक विषयांचा व्यासंग केला. त्यात धर्मशास्त्राबरोबर, ज्योर्तिगणित, ज्योतिषशास्त्र, भूमिती, वास्तुरचनाशास्त्र या विषयांत भारतीयांनी मोठी प्रगती साधली. त्यातील शेवटच्या दोन शास्त्रांची माहिती शुल्बसूत्रांत येते. पण आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शूल्बसूत्रांचा अभ्यास भूमिती किंवा वास्तुशास्त्राचे ग्रंथ म्हणून करता येणार नाहीत. त्यांचे प्रयोजन अगदी वेगळे आहे. त्यामुळे केवळ यज्ञाशी संबंधीत भूमिती व वास्तुशास्त्राची चर्चा या ग्रंथांतून झाली आहे. स्वाभाविकच गृहरचना, नगररचना अशा विषयांना येथे अजिबात स्थान नाही म्हणून यात संपूर्ण भूमिती किंवा वास्तुशास्त्र पाहाणे चुकीचे ठरेल.