मुंबईतील एका उपनगरात राहणाऱ्या माझ्या एका नातेवाईकाकडे काही कारणाने एक रात्र राहण्याचा योग आला. सकाळी जाग आली तीच बऱ्याच स्त्री-पुरुषांच्या एकत्र हसण्याच्या आवाजाने. मी खिडकीतून डोकावून बाहेर पहिले, प्रौढ वयाचे आणि काही अगदी वयस्कर असे स्त्री-पुरुष एकत्र येऊन जोरजोराने हसण्याचा व्यायाम करत होते. या सोसायटीतील सभासदांचा हा हास्य क्लब असणार हे माझ्या लगेच लक्षात आले. शहरात किंवा वेगाने विकसित होणाऱ्या ग्रामीण भागातदेखील आता ज्येष्ठ नागरिक मंच, ज्येष्ठ नागरिक कट्टा, विरंगुळा केंद्र, योगाभ्यासाचे वर्ग, हास्यक्लब.. तत्सम उपक्रम चालविले जातात, हे मला माहीत होते. माझे नातेवाईक मला म्हणाले, ‘काय रे! हसण्याच्या आवाजांने उठलास ना? अरे, आमच्या सोसायटीमध्ये एक-दोन महिन्यांपासून हा हास्यक्लब सुरू झाला आहे. आमच्या सोसायटीतील ज्या  इमारतीच्या जवळ तो हास्यक्लब भरतो त्या इमारतीतील सभासद आता तक्रार करू लागले आहेत, यांच्या मोठमोठय़ांनी हसण्याचा आम्हाला त्रास होतो म्हणून. परंतु हेही तितकेच खरे आहे, यात सामील सर्व याच सोसायटीतील सभासद किंवा सभासदांच्या कुटुंबीयांपैकीच आहेत, त्यातले बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत, तेही कोणा सभासदाच्या कुटुंबापैकीच आहेत. त्यामुळे त्या विरोधाची धार तशी बोथटच आहे, पण पाहू अजून किती दिवस ती तशी बोथट राहते! सोसायटीचे पदाधिकारी आक्षेप घेण्यास कचरतात, त्यामुळेही काही लोक आता याविरुद्ध पोलिसाकडे तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत अशी कुणकुण लागलीय. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक व्यायाम प्रकार असला तरी काहींना म्हणजे आजारी व्यक्तींना, रात्री कामावरून येऊन झोपलेल्यांना, याचा त्रास होऊ शकतो.

बऱ्याच सोसायटय़ांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळी बसण्यासाठी छान जागा करून दिलेली असते. घरात चकार शब्द न उच्चारणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती अशा कट्टय़ावर आल्या की त्यांच्या आवाजाला चांगली धार चढते, आवाज अगदी तारसप्तकात जातो. कुठल्याही विषयावर तावातावाने एकदा बोलू लागले, की आपण किती मोठय़ाने बोलत आहोत याचे त्यांना भान राहत नाही. यांचे बोलणे, हसणे, मुद्दा पटवून देणे, टाळ्या देणे सर्व एकदम वरच्या पट्टीत. बरं, विषय कुठलाही चालतो. यांच्या घरात यांचे बोलणे कोणी ऐकून घेत नाही, पण जवळच्या इमारतीत  राहणाऱ्या रहिवाशांना मात्र यांचे बोलणे ऐकून घेण्याशिवाय पर्याय नसतो. बरं हे सर्व पडले ज्येष्ठ. आपल्याच सोसायटीत राहणारे. इथल्यापैकीच कोणाचे, वडील, मोठा भाऊ, सासरे किंवा अन्य वयस्कर नातेवाईक. मध्येच कुठल्या तरी खिडकीतून कोणीतरी, ‘काका जरा हळू बोला प्लीज! अमुकतमुक अभ्यास करतोय.’ किंवा ‘अमुकतमुक आजारी आहे, आत्ताच झोप लागलेत,’ वगैरे विनंती करू शकतो. इतकेच. थोडय़ा वेळाने परत येरे माझ्या मागल्या.

नंतर मला गेल्या महिन्यातला एक प्रसंग आठवला, गेल्या महिन्यात, एका संध्याकाळी उपनगरात राहणाऱ्या माझ्या मित्राकडे गेलो होतो. मित्र घरी नव्हता म्हणून पंधरा-वीस मिनिटे त्याची वाट पाहत त्याच्या घरी थांबलो होतो. मी त्याच्या घरच्या हॉलमध्ये बसलो होतो आणि त्या हॉलच्या मोठय़ा खिडकीमधून त्यांच्या सोसायटीची आखीवरेखीव हिरव्यागार हिरवाईने सजलेली, नाना तऱ्हेच्या फुलझाडांनी सजलेली बाग सहज दिसत होती. त्या बागेतच एका बाजूला लहान मुलांसाठी खूप प्रकारची खेळणी बसवली होती. झोपाळे होते, घसरगुंडय़ा होत्या, अजून बरीच नावीन्यपूर्ण कितीतरी प्रकारच्या खेळण्यांची साधने बसवलेली होती आणि लहान लहान मुले आनंदाने आणि उत्साहाने अक्षरश: बागडत होती. मनसोक्त हसत खिदळत, दंगामस्ती करत होती. त्यांची ती किलबिल मनाला खूप आनंददायी वाटत होती. त्या छोटय़ा मुलांच्या आयाही आजूबाजूला बाकावर कट्टय़ावर बसून आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या खेळण्यातला आनंद मनसोक्त पाहात होत्या. पंधरा-वीस मिनिटांत माझा मित्र घरी आला आणि चहापाणी घेत आम्ही गप्पा मारायला लागलो, पण काही वेळातच आमच्या लक्षात यायला लागलं, आमचं बोलणं आम्हाला धड ऐकू येईनासं झालं होतं. कारण, बागेतील मुलांच्या किलबिलाटाचं रूपांतर आता मोठय़ा आवाजात झालं होतं. माझा मित्र म्हणाला, ‘रोज संध्याकाळी आम्ही खाली राहणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागतो. घरात एकमेकांशी बोललेलंदेखील धड ऐकू येत नाही. टीव्हीचे कार्यक्रम नीट ऐकू येत नाहीत. कोणी अभ्यासाला बसला असेल, कोणी आजारी माणूस असेल तर त्यालादेखील हा त्रास सहन करावा लागतो,’ असं म्हणत त्यांनी त्या बाजूची खिडकी लावून घेतली. तो आवाज कमी झाला असला तरी त्याचा एकसारखा येणारा घुमणारा आवाज त्रासदायकच वाटत होता. मित्रांने खिडकी थोडी उघडून बाहेर मोठय़ा आवाजात मुलांना ‘जरा गप्प बसा, हळू आवाजात खेळा’ म्हणून फर्मावले त्याबरोबर एका बाईंनी त्याला तितक्याच खणखणीत आवाजात सुनावले. ‘बच्चे शामको गार्डन में नही खेलेंगे तो कहा जाएंगे, आपको इतनी तकलीफ होती है तो और कही जाके रहो.’ आणि बरेच पुढे आणखीही काही बरेच सुनावले. मुलांचा गलका अजूनच मोठा होत गेला.  मित्राची बायको म्हणाली, ‘रोज संध्याकाळचा हा त्रास आहे, पण बोलणार तरी कोणाला. सगळी सोसायटीतीलच लहान मुलं आहेत. ती बागेत नाही तर कुठे खेळणार? अहो आमची नातवंड आली की तीपण तिथेच जाऊन खेळतात.’ थोडक्यात काय, मुंबईत किंवा इतर शहरात ज्यांचे घर ऐन महामार्गालगत आहे, किंवा ज्या रस्त्यावर अहोरात्र वाहनांची येजा आणि माणसांची वर्दळ असते अशा जागी ज्यांना राहावं लागतं, त्यांना त्या गजबजाटात, कानावर आदळत राहणाऱ्या बाहेरच्या आवाजाशी जुळवून घेऊन राहणं भाग असतं. त्याच प्रकारे अशा सार्वजनिक बागेजवळ राहणाऱ्या, रहिवाशांना, दिवसभरातील काही विशिष्ट वेळापुरती मुलांच्या रोज होणाऱ्या गोंगाटाची सवय करून घेत राहण्याशिवाय अन्य पर्याय नाही. एक मात्र त्यातल्या त्यात चांगले असते की, बऱ्याच सोसायटय़ांमध्ये मुलांना खेळण्यासाठी काही वेळ निश्चित केलेली असते. दिवसभर गडबड गोंधळ घालता येत नाही. आताच्या मुलांना शाळा आणि क्लास करून खेळण्यासाठी मोकळा वेळ जेमतेमच उरतो. काही ठिकाणी अशा प्रसंगी होणारी बाचाबाची किंवा भांडणे विकोपालादेखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अंतिम उपाय एकच, बाहेरच्या गोंगाटाची सवय जडवून घेणे.

मोठय़ा मुलांचे सोसायटीच्या आवारात बेभान होऊन सायकल चालविणे, फुटबॉल, हॉकी, किंवा सर्वाचा आवडता आणि मिळेल त्या चिंचोळ्या जागेत खेळला जाणारा, सर्वाचा लाडका क्रिकेट या खेळावरून होणारी भांडणे, त्यावर एक वेगळा लेख होऊ  शकेल. परंतु असे खेळ सोसायटीच्या आवारात खेळू नयेत याबद्दल बहुतांश सभासदांचे एकमत असल्यामुळे अशा मैदानी खेळाला बऱ्याच सोसायटय़ांमध्ये मनाई केलेली आहे.

पण मग मी जरा माझ्या लहानपणीची आमची वस्ती आठवायचा प्रयत्न केला. पहाटे पाच वाजता सार्वजनिक नळ येत असे. पाण्याची टंचाई, त्यामुळे काही भाडेकरू अगदी पहाटे चार वाजल्या पासूनच नळावर आपल्या बालद्या, कळशा घेऊन नंबर धरून बसायचे. त्यातच लवकर कामावर जाणाऱ्या घरात फारफऱ्या स्टोव्हने टिपेचा सूर पकडलेला असायचा. पाच वाजेपर्यंत इतर बिऱ्हाडकरू आपल्या बालद्या, कळशा परजत नळावर पोचलेले असायचे. मग यथावकाश नळ पाच वाजता कधी साडे पाच वाजता यायचा आणि जेमतेम तासभर, अत्यंत सालसपणे, निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सुतासारखा सरळ पडत राहायचा. त्यातच नेरुरकर काका आपण भांडणात भाग घेणार नाही हे दाखविण्यासाठी मोठ मोठय़ांनी स्तोत्र म्हणत राहायचे, त्यांना इतर पामर रहिवाशांना दाखवून द्यायचे असायचे की, राम प्रहरी भांडण करत बसण्यापेक्षा देवाचं नाव घेणं उत्तम. त्यातच एका ब्रह्मचाऱ्याला नळाखाली पाचच मिनिटात अंघोळ उरकून घ्यायची असायची. त्यासाठी त्याचं म्हणणं असायचं- ‘मी एकटा रहातो, मी इतरांसारखं घरात पाणी भरून ठेवत नाही. तेव्हा मला वाहत्या नळाखाली तुम्ही पाच मिनिटं अंघोळ करू दिली पाहिजे.’ बर, एकंदर प्रकृती धटिंगण स्वरुपात मोडणारी असल्यामुळे त्याला काही वेळ दिलाही जायचा. त्याचे अंघोळ सोपस्कार होईपर्यंत नळावरील बायकामंडळी विरुध्द दिशेला तोंडे करून उभी राहायची. नळ येण्याआधी एक तास आणि नळ आल्यावर एकतास माणसांचे आवाज आणि भांडय़ांचे आवाज याचा जो काही गदारोळ उडायचा, त्याचा होईल तेवढा त्रास सकाळी सकाळी, त्या सार्वजनिक नळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या बिऱ्हाडकरूंना मुकाट सहन करून घेण्याशिवाय पर्यायच नसायचा. काही वेळा प्रकरण हातघाईवर येऊन पोलीस स्टेशनपर्यंत देखील पोचायचे. पण सर्वाना एक ठाऊक होते, पाणी टंचाई याला कारणीभूत आहे आणि आपल्याला सर्वाना भांडत- तंटत का होईना इथेच, एकमेकांसोबत रहावे लागणार आहे. पुढे पुढे हे सर्व रोजचेच होऊ  लागल्यामुळे सर्वाच्या हे अंगवळणी पडून गेले. हे झाले मोठय़ांच्या मोठय़ा आवाजाचे.

वाडीतली, चाळीतली शाळकरी मुले फार क्वचित क्लासला किंवा छंद वर्गाना वगैरे जात. घरचा अभ्यास याची बिलकुल चिंता किंवा धास्ती कुठल्याही मुलाला कधीही नसायची. त्यामुळे दिवसाची शाळा संपली की मुलांचा धुडगूस सुरू व्हायचा. वाडीतील मोकळी जागा, व्हरांडे, जिणे, गॅलऱ्या-गच्ची, सार्वजनिक नळ, जिथे जिथे म्हणून मोकळी जागा मिळेल किंवा ज्या जागेत सहज घुसता येईल अशी कुठलीही जागा त्यांना चालायची. गोटय़ा, डब्बा ऐसपैस, पकडा-पकडी, लगोरी, लाकूड का पाणी, क्रिकेट, आबाधुबी, आंधळी कोशिंबीर, ज्या खेळात खूप धावा धावी करावी लागेल, आरडाओरडा करावी लागेल, भरपूर धातींगणपणा करता येईल आणि पाच पैसे सुद्धा खर्च करावे लागणार नाहीत असे सर्व तऱ्हेचे खेळ चालायचे. सर्वाचे दरवाजे सताड उघडे असल्यामुळे कोणाच्याही घरात लपायला बिनधास्त घुसायचे. त्यांच्या टेबला खाली, पलंगा खाली, कपाटा मागे, दरवाजामागे, मोरीच्या कट्टय़ा मागे लपायचे, वर त्यांनाच सांगू नका म्हणून दटावायचे. त्या धडपडीत कोणाचे तरी घरातील समान पडायचे, पाणी सांडायचे, बॉल लागून दिवा फुटायचा, आरसा फुटायचा. तावदानाची काच फुटायची, निवडलेले धान्य विस्कटून जायचे.. काय वाट्टेल ते घडायचे, भांडणे व्हायची. मुलांना धपाटे मिळायचे, मोठी माणसे हमरीतुमरीवर यायची. काही दिवसांनी ज्या रहिवाशांनी मुलांचा आरडाओरड सहन न झाल्यामुळे भांडण केलेले असायचे, त्याच्याकडे कोणी लहान मूल राहायला आले की तेही या खेळात सामील व्हायचे. त्यावेळी देखील काही व्यक्ती आजारी असायच्या, रात्रपाळी वरून येऊन काही लोक झोपलेले असायचे. कोणाकडे तरी बाळंतीण बाळाला घेऊन झोपलेली असायची. त्यांना या मुलांच्या खेळाचा, आरडाओरडा करण्याचा त्रास व्हायचाच. पण करणार काय? सगळेच आपले आणि आपण सर्वाचे!

सोसायटीत भांडणासाठी आता काही नवीन कारणे उद्भवली आहेत. नाही असे नाही, पण लहानमोठय़ा माणसांनी केलेला गडबड गोंधळ, मोठमोठे आवाज, आणि अस कलकलाट अशी काही भांडणाची कारणे मात्र अनादी आहेत.

सोसायटीत चालणारे हास्यक्लब असोत, किंवा ज्येष्ठ नागरिक कट्टे असोत किंवा सोसायटीत तयार केलेली सोसायटीतील सभासदांच्या लहान मुलांना खेळण्यासाठी सोसायटीने तयार केलेली आणि राखलेली बाग असो, त्या ठिकाणी होणाऱ्या आवाजाचा त्रास इतर सभासदांना दिवसातून काही वेळा पुरताच होत असतो. अशा वेळी खरं म्हणजे सर्वानीच समजुतीने त्यातून मार्ग काढणे आवश्यक असते. खेळणाऱ्या लहान मुलांना, त्यांच्या पालकांनी जरा हळू आवाजात खेळा म्हणून मधे मधे सांगायला हरकत नाही. मुले अशा विनंत्या लगेचच विसरून परत ओरडाओरडी करू लागतात ही गोष्ट खरी असली तरी, मधे मधे त्यांच्या आवाजाला आवर घालण्याचा पालकांनी प्रयत्न तरी करून पाहावा. आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत आहे याची जाणीव आम्हाला आहे, इतके तरी त्यातून दिसून येईल. तीच गोष्ट ज्येष्ठ नागरिकांची, त्यांनीदेखील आपल्या मोठय़ा आवाजाचा इतर रहिवाशांना त्रास होत आहे हे समजून एकमेकांना आवाजावर मर्यादा ठेवण्यासाठी सूचित करायला हरकत नाही. कारण अनुभवातून आलेले शहाणपण त्यांच्यापाशी असते. आणि त्याचा प्रत्यय वेळोवेळी येतोदेखील. हास्यक्लबच्या बाबतीत, म्हणायचं झालं तर तो एक उत्तम व्यायाम आहे, त्याचे चांगले परिणाम अनुभवायला येतात. परंतु या हास्य प्रकारात मोठमोठय़ाने हसणेच अभिप्रेत असल्यामुळे आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा पर्याय शक्य नाही; तेव्हा हास्यक्लब जवळपासच्या मोकळ्या मैदानात घेतल्यास यापासून होणाऱ्या आवाजाचा त्रास इतर रहिवाशांना होणार नाही.

थोडक्यात काय? शहरी वस्तीमध्ये त्या काळीही आणि आत्ताही काही रहिवाशांना, आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणत गलबलाटाशी, आरडाओरडीशी, मोठय़ा आवाजाशी जुळवून घेतच आनंदाने राहण्याची सवय करून नव्हे, तर सवय जडवून घ्यावी लागते. सहजीवनातील हा अविभाज्य भाग असल्यामुळे, कायदा आणि पोलीस काही प्रमाणत मदतीला येतीलही, पण अखेर तडजोड करूनच जीवन पुढे चालत राहते, अन्य तरणोपाय नाही. थोडक्यात काय, अशा कारणाने होणारे वसाहतीतील भांडण तसे अनादी आहे.

मोहन गद्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

gadrekaka@gmail.com