• vastuसंस्थेतील एका सदस्याने संस्थेची कोणतीही परवानगी न घेता आपल्या सदनिकेचे दुरुस्तीचे काम पूर्ण केले, त्यात त्याने बरेच बदल केले. उदा. हॉलची बाल्कनी लोखंडी चॅनल्स टाकून बाहेर काढणे, इ. यामुळे माझ्या सदनिकेमधील मोठय़ा प्रमाणात कॉलम बिम, छतास तडे जाणे असे अनेक प्रकारचे नुकसान झाले आहे. त्यासाठी संस्थेने त्याला एक नोटीसदेखील साधारण वर्षांपूर्वी दिली, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. वरील विषयाबद्दल अन्य कोणीही चकार शब्ददेखील बोलत नाहीत. सदर गृहनिर्माण संस्थेचा मी अध्यक्ष आहे. तरी संस्थेने त्यावर कोणती कारवाई करावी याबद्दल मार्गदर्शन केल्यास बरे होईल.
    -एस. एम. सारंग, ठाणे.
  • संस्थेने सदर सदस्याला काय नोटीस पाठवली आहे हे माहीत नसताना हे उत्तर आम्ही देत आहोत ते असे- या सदस्यावर दोन प्रकारे कारवाई करता येईल. १) ज्या सदस्याने अनधिकृत बाल्कनी वाढवली आहे त्यासंबंधी त्याला एक नोटीस पाठवून संबंधित बांधकामासाठी ठाणे महानगरपालिकेने परवानगी दिली असल्यास त्याची प्रत मागावी. अथवा ते बांधकाम पाडून पूर्ववत करण्यास त्याला सांगावे. त्यानंतर १५ दिवसांत त्याने काहीच उत्तर न दिल्यास महानगरपालिकेकडे यासंबंधी संस्थेने एक ठराव करून लेखी तक्रार द्यावी व ते बांधकाम पाडून टाकण्यासाठी त्याचा पाठपुरावा करावा. दुसरा भाग म्हणजे आपल्या नुकसानाचा! त्यासंबंधी आपण गृहनिर्माण संस्थेला एक पत्र देऊन त्याबाबत तक्रार करावी. त्या तक्रारीचा परामर्श संस्थेने घ्यावा व एक ठराव करून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार घेऊन झालेले नुकसान भरून देण्यास संबंधित सदनिका धारकाला सांगावे. त्याने ते न केल्यास संस्थेने स्वखर्चाने ते दुरुस्त करून द्यावे व त्याचा खर्च हा त्याच्या खात्यात अ‍ॅरियर्स म्हणून दाखवावा. त्याने न भरल्यास १०१ कलमाअंतर्गत त्याच्याविरुद्ध कारवाई करावी. याव्यतिरिक्त संस्था ठराव करून त्याला दंडदेखील आकारू शकते. मात्र तो आकारणीपूर्वी तो किती आकारावा याबाबत तज्ज्ञ व्यक्तीचे मत विचारात घेऊन कारवाई करावी.
  •  एका सदनिकेचे मालक सावंत यांनी पुजारी नावाच्या माणसाला पॉवर ऑफ अटर्नी दिली. पुजारी यांनी सदर सदनिका त्यांचे हस्तांतरित केलेली नाही. किंवा त्या सदनिकेचा करारनामा आपल्या नावे उपनिबंधक कार्यालयामध्ये नोंददेखील केला नाही. तर मी अशा पॉवर ऑफ अटर्नीधारकाकडून सदनिका खरेदी करू शकतो का? मूळ मालक उपलब्ध नाही.
    -महेश जननलाल, गोरेगाव, मुंबई.
  • सर्वसाधारणपणे पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीधारक मूळ मालकाच्या वतीने खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतो. परंतु तशा अर्थाची कलमे ही त्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीच्या मजकुरात असणे आवश्यक आहेत. तसेच सदर पॉवर ऑफ अटर्नी सन १९१२-१३ पूर्वीची नसेल तर ती रजिस्टर असणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी देणारा जिवंत असला पाहिजे. दोन्ही पक्षकारांपैकी कोणताही पक्षकार मृत झाल्यास सदर कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) आपोआप रद्दबातल ठरते. या सर्व गोष्टींच्या निकषावर आपली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी योग्य ठरत असेल तर सदनिका खरेदीला काही हरकत नाही.
    * ‘अ’ हा सदनिकेचा मूळ धारक (मालक) होता. त्याची पत्नी ‘ब’ ही नामांकनाच्या जोरावर गृहनिर्माण संस्थेची सदस्य बनली. तिला तीन मुलगे (सी, डी, ई) आहेत. त्यातील ‘डी’ या मुलाला असोसिएट्स मेंबर करून घ्यायची ‘ब’ची इच्छा आहे. तर तसे तिला करून घेता येईल का?
    -मानद सचिव, वरळी, मुंबई.
  • आपल्या या माहितीत गृहनिर्माण संस्थांना नॉमिनेशनच्या जोरावर एखाद्या व्यक्तीला सदस्यत्व बहाल करता येते. त्याप्रमाणे आपण मृत सदस्याच्या पत्नीला आपल्या संस्थेचे सदस्यत्व दिले आहे. यावरून ‘अ’ च्या मूळ मालकाच्या वारसांनी त्या सदनिकेवरील हक्क कायमस्वरूपी सोडून दिला आहे की, आपल्या आईलाच सदस्यत्व देण्यासाठी फक्त ना हरकत पत्र दिले आहे याचा उलगडा होत नाही. त्याचा असोशिएट मेंबरशिप देण्याशी फारसा संबंध येत नाही, त्यामुळे आमच्या मते, त्यांच्या मुलाला (‘डी’ला) आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून आवश्यक फी भरून घेऊन असोशिएट मेंबरशिप देण्यास हरकत नाही.
    * आम्ही विकासकाला रिडेव्हलपमेंटसाठी न मोडता येणारी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिली आहे. विकासक काहीही करीत नाही म्हणून आम्ही त्याला एक कायदेशीर नोटीस वकिलामार्फत दिली. ही नोटीस सदर पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द करण्यासाठी पुरेशी आहे का? आणि सदर इरिव्होकेबल पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द होऊ शकेल का?
    एक वाचक, कल्याण
  • कोणतीही पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द होऊ शकते. मुळातच पॉवर देणारी अथवा घेणारा यातील कोणीही व्यक्ती मृत झाली तरी अगदी इरिव्होकेबल पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द होऊ शकते. याशिवाय ज्या कारणासाठी पॉवर दिली गेली आहे ते कारण जरी संपुष्टात आले तरी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द होऊ शकते. या ठिकाणी आपण पॉवर कशासाठी दिली आहे. विकासक काहीही करीत नाही म्हणजे नक्की काय करतो? याचादेखील खुलासा होणे आवश्यक आहे. ज्या कारणासाठी पॉवर दिली आहे ते कारण रद्द झाल्यास पॉवर आपोआपच रद्द होईल. म्हणूनच कोणत्या आधारावर पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिली आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व समजून घेतल्याशिवाय या प्रश्नाचे उत्तर अधिक विस्ताराने देणे चुकीचे ठरेल. तरीसुद्धा वकिलाच्या नोटिशीबरोबरच आपण सदर पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द केली आहे, अशा अर्थाची जाहीर सूचना स्थानिक वृत्तपत्रात द्यावी म्हणजे आपल्या कृतीला आमच्या मते अधिक बळकटी येईल.               ghaisas2009@gmail.com