२६ डिसेंबरच्या ‘वास्तुरंग’मधील विद्युतसुरक्षा या लेखमालेतील लेखात ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’चे अधोरेखित केलेले महत्त्व वादातीत आहे. परंतु ‘विविध कंपन्या, शॉपिंग मॉल, उद्योग व सोसायटय़ा यांच्या विद्युत- मांडण्यांच्या संबंधातील अर्थिग-रिझल्ट ०.२ ओहमच्यावर जाऊ नये’ हे लेखातील विधान कोणत्या आधारावर केले आहे ते समजत नाही.
कोणत्याही विद्युत-मांडणीचे अर्थिग हे त्या मांडणीतील उपकरणांची व संपर्कात येणाऱ्या सजीवांची सुरक्षितता जपण्यासाठी केलेले असते. ही मांडणी मोठय़ा उपकेंद्राच्या स्वरूपात असेल तर तेथील जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण होणारे ‘टच व स्टेप पोटेंशिअल’ हे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सुसह्यतेच्या मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही अशा बेताने तेथील अर्थिग डिझाइन करावे लागते. अशा उपकेंद्रातील अर्थ रिझल्ट १ ओहमपर्यंत असावा असे आय.ई.ई.ई.ने म्हटले आहे. तसेच वरील लेखातील कंपन्या, उद्योग वगैरे कमी दाबाच्या विद्युत-मांडण्यांचे अर्थ रिझल्ट ५ ओहमपर्यंत असावे अशी त्यांची शिफारस आहे. भारतीय-मानक ३०४३ अथवा सी.ई.ए. नियम २०१० मध्ये अर्थ-रिझल्टच्या मर्यादेचा उल्लेख नाही.
अशा परिस्थितीत ०.२ ओहम ही मर्यादा तांत्रिकदृष्टय़ा योग्य वाटत नाही. तिचा आग्रह धरल्यास करावे लागणारे अर्थिग विनाकारण बोजड आणि म्हणून खर्चीक होईल. ते टाळावयास हवे.
विनय जोशी, निवृत्त मुख्य अभियंता (म.रा.वि.मं.)
ही बाब अव्यवहार्य
१२ व २६ डिसेंबरच्या ‘वास्तुरंग’मध्ये ‘विद्युतसुरक्षा’ सदरात लेखकाने दिलेले काही सल्ले हे अव्यवहार्य असून, त्यास नियमांचा आधार नाही. १२ च्या ‘वास्तुरंग’मध्ये ‘प्रत्येक अर्थपिटचा रेझिस्टन्स ३ ओहमपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.’ व २६ च्या ‘वास्तुरंग’मध्ये अर्थिग रिझल्ट ०.२ ओहमच्या वर जाऊ नये,’ या सूचना अव्यवहार्य आहेत व त्यास कोणत्याही मानकाचा (Standard / Regulation) आधार नाही. अर्थपिटचा रेझिस्टन्स (विद्युत विरोध) हा संबंधित भूमीची रेझिस्टिविटी, पाइपची लांबी व व्यास यावर अवलंबून असतो. साधारणत: भूमीची रेझिस्टिविटी १०० ओहम मीटर धरली जाते. (संदर्भ: कर: ३०४३). या रेझिस्टिविटीच्या जमिनीत ३ मीटर लांबीचा पाइप (जो नेहमी वापरला जातो) वापरून अर्थपिट केल्यास IS: ३०४३ मधील सूत्रानुसार त्याचा रेझिस्टन्स २७ ओहम येतो. (३ ओहम रेझझिस्टन्स येण्यासाठी ४० मीटर लांबीचा पाइप लागेल!) शिवाय विद्युत संचांतील अर्थपिटच्या रेझिस्टन्सपेक्षा संपूर्ण अर्थिग प्रणालीचा रेझिस्टन्सच ग्राह्य़ धरला जातो. कएएए Standard 80-2000 हे मानक अर्थिगच्या बाबतीत जगभर प्रमाण मानले व वापरले जाते. त्यातील तरतुदीनुसार मोठय़ा विद्युत केंद्रात अर्थिग प्रणालीचा रेझिस्टन्स १ ओहमपर्यंत व छोटय़ा वितरण केंद्रात १ ते ५ ओहमच्या दरम्यान असावा अशी शिफारस केली आहे. ही पाश्र्वभूमी ध्यानात घेता सदर दोन लेखांमधील सल्ल्यांना मानकांचा आधार नाही व या सूचना व्यवहार्यही नाहीत. वाचकांना मानकातील तरतुदीची योग्य माहिती असावी म्हणून हा पत्रप्रपंच!
श्रीनिवास मुजुमदार, चारकोप निवृत्त अधीक्षक अभियंता, (म.रा.वि.मं.)