खिडकी

खिडकी म्हणजे भिंतीत पाडलेले भोक, ज्याच्यातून बाहेर बघू शकतो. हवा, उजेड आत येणे व बाहेर बघणे एवढेच पूर्वीचे उद्देश होते. आज मात्र वातानुकूलित यंत्रांच्या सोयीमुळे खिडकीचा उपयोग हवा, उजेड आत…

खिडकी म्हणजे भिंतीत पाडलेले भोक, ज्याच्यातून बाहेर बघू शकतो. हवा, उजेड आत येणे व बाहेर बघणे एवढेच पूर्वीचे उद्देश होते. आज मात्र वातानुकूलित यंत्रांच्या सोयीमुळे खिडकीचा उपयोग हवा, उजेड आत येण्यापेक्षा घराची, बंगल्याची, इमारतीची शोभा वाढवण्यासाठीच प्रामुख्याने केला जातो.
घराची खिडकी ही माणसाच्या हवा व उजेडाच्या गरजेतून निर्माण झाली. गुहेच्या, घराच्या, झोपडीच्या, इमारतीच्या बाहेरील हवा व प्रकाश घरात येण्यासाठी आपल्या पूर्वजांनी खिडकीची सोय केली. हवा व प्रकाश घरात येण्यासाठी किंवा इमारतीच्या आत येण्यासाठी धातूच्या किंवा लाकडी चौकटीत बसवलेल्या झडपा म्हणजे खिडकी, अशी खिडकीची व्याख्या केली जाते. खिडकीला इंग्रजीत window म्हणतात. window हा इंग्रजी शब्द स्विडिश भाषेतील vindoga या शब्दापासून आला असावा, त्याचा अर्थ छपरात असलेले मोठे भोक. डॅनिश भाषेत खिडकीला vindue म्हणतात. त्याचा अर्थ डोळ्याला जेथून थेट दिसते ती जागा (Direct Link to ‘eye’) जुन्या इंग्रजी भाषेत खिडकीलाी eye-hole किंवाी eye-door असेही म्हटले जाई. थोडक्यात काय खिडकी म्हणजे भिंतीत पाडलेले भोक, ज्याच्यातून बाहेर बघू शकतो. हवा, उजेड आत येणे व बाहेर बघणे एवढेच पूर्वीचे उद्देश होते. आज मात्र वातानुकूलित यंत्रांच्या सोयीमुळे खिडकीचा उपयोग हवा, उजेड आत येण्यापेक्षा घराची, बंगल्याची, इमारतीची शोभा वाढवण्यासाठीच प्रामुख्याने केला जातो.
अगदी अश्मयुगात मानव जेव्हा गुहेत राही, तेव्हा डोंगरकपारीतील नैसर्गिक झरोक्यातून तसेच गुहेच्या प्रवेशद्वारातून हवा व सूर्यप्रकाश आत येत असे. नवाश्मयुगीन मानव तंबूसाठी किंवा झोपडीसाठी चौकटीविरहित झडपा असणाऱ्या लहान खिडक्यांची योजना करे. काही ठिकाणी जेथे तापमान जास्त असे, अशा ठिकाणी छत उंचावर असे व मध्यवर्ती खांब इतर भागातील खांबापेक्षा उंच असे. त्यामधील जागेत दगडी जाळ्या बसवत, त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यकिरण आत न येता भरपूर उजेड व हवा आत येई व तापमान नियंत्रित राही. मध्यपूर्वेत इराणी व बॉबिलोनियन प्रासादात खिडक्या नसत, पण प्रासादाच्या मध्यवर्ती भव्य चौकात भव्य दरवाजे असत, त्यातूनच प्रासादात भरपूर हवा व उजेड येत असे. पूर्वीच्या ग्रीक देवालयातही खिडक्या नव्हत्या. पूर्वाभिमुख दरवाजे किंवा छपराच्या मध्यभागी असणारे खुले भाग यातून हवा व उजेड येई.
तेराव्या शतकात सर्वप्रथम खिडक्यांची पद्धत सुरू झाली असावी. चर्चमध्ये खिडक्यांची योजना घुमटाखालील भागात किंवा भिंतीच्या वरच्या भागात करत असत व त्यांना दगडी जाळ्या लावत. गोथिक काळात मात्र खिडक्यांचा आकार वाढला. १० मीटर ७ ते ५ मीटर एवढय़ा मोठय़ा आकाराच्या खिडक्या बनवत व त्यावर टोकदार कमानी असत. एवढय़ा मोठय़ा खिडक्यांमध्ये दगडी खांब योजून त्याचे विभाग पाडत. प्रत्येक विभागाला काचेची तावदाने व लोखंडी सांगाडे वापरत. दोन खांबांमधील खिडकीच्या या भागाला ‘सज्जाबारी’ म्हणत. खिडकीचा आकार वाढल्याने व कमानीची रचना केल्याने सजावटीस भरपूर वाव मिळे. कमानीच्या भागात सुंदर कोरीव काम किंवा नक्षीकाम असे. काचेच्या खिडक्यांचा वापर जगात फार उशिरा सुरू झाला. काचेच्या खिडक्या स्टेन ग्लास पेंटिंगच्या बनवत. काचेवर रंगवलेल्या चित्रावरून भाविकांना धार्मिक रूढी, परंपरा, प्रसंग, घटना, इ.चा परिचय होई. रंगीबेरंगी काचांचे तुकडे जोडून बनवण्याची स्टेन ग्लास पद्धती सुरू होण्याचे कारण म्हणजे काचेची मोठी तावदाने तेव्हा उपलब्ध नसत.
मध्ययुगात आणखी वेगळ्याच प्रकारच्या खिडक्यांची रचना आढळते. येथूनच खिडकीच्या स्थापत्यशास्त्राची  सुरुवात झाली असावी. फ्रेंच खिडकी व झुकावाधिष्ठित खिडकी या खिडक्या  मध्ययुगीन काळातील वैशिष्टय़पूर्ण खिडक्या होत्या. फ्रेंच खिडकी म्हणजे प्रासादाच्या मुख्य दालनाच्या एका टोकाला अगदी जमिनीपासून सुरू होऊन थेट छपरापर्यंत पोहोचत असे. तिला ‘डोअर विंडो’ असेही म्हणत असत. झुकावाधिष्ठित खिडकी प्रामुख्याने पहिल्या मजल्यावर असे व तिचा आकार सज्जाबारीपेक्षा जरा लहानच असे. मध्ययुगात चर्चमधील खिडक्यांची रचना वेगळीच असे. आजही आपल्याला युरोप, अमेरिका खंडांतील देशांत या खिडक्या आढळतात. चर्चमध्ये दर्शनी भागात मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक भव्य व वर्तुळाकृती खिडकी बनवत. अशा खिडकीला गोल आकार असल्याने चक्राकार खिडकी किंवा चक्रवातायन (wheel window) म्हणत. त्यातही स्टेन ग्लासचा वापर करून पाने, फुले, वेली यांची नक्षी तयार करत असत.
भारतातही आपल्याला निरनिराळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या प्रकारच्या व वैशिष्टय़पूर्ण खिडक्या दिसतात. बौद्धकाळात बौद्ध भिक्षुक विहार नावाच्या निवासस्थानात राहत. हे विहार म्हणजे लेणीच असे व त्याला खिडकी नसे, लेणीचे प्रवेशद्वारच खूप मोठे असल्याने त्यातून हवा व उजेड येत असे. पण त्यांच्या प्रार्थनागृहात मात्र मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक प्रचंड मोठी नालाकृती खिडकी असे. तिचा आकार उगवत्या सूर्याप्रमाणे किंवा पिंपळ पानाप्रमाणे असे. त्यामुळे त्या खिडकीला ‘सूर्यखिडकी’ किंवा ‘पिंपळखिडकी’ म्हणत. पेशवेकालीन खिडक्या तर प्रेक्षणीय होत्या. खिडक्यांचा आकार अगदी लहान असे, परंतु त्या जमिनीलगत असत. त्यांना दोन झडपा असत. खिडकीच्या खालच्या भागात सुंदर नक्षीकाम केलेले खांब असत व त्यांची उंची १ मीटपर्यंत असे. त्यानंतर खिडकीचा भाग असे व खिडकीच्या वरच्या भागात कमानी असत, त्यावरही कोरीव काम असे. उन्हाची तिरीप किंवा पावसाची झड आत पोहोचू नये म्हणून खिडकीच्या बाहेरच्या बाजूला छोटेसे लाकडी छप्पर असे. भरपूर तापमान व कडक उन्हाळा असणाऱ्या राजस्थान राज्यातील प्रासादात वायुविजनासाठी (ventilation) भरपूर खिडक्या असत व त्याही समोरासमोर असत. या भरपूर खिडक्यांमुळेच प्रासादाचा भाग व्यापत असल्याने त्यावर सुंदर नक्षीकाम व कमानी असत, जेणेकरून प्रासादाचे बाह्य़सौंदर्य वाढावे. जयपूरचा हवामहल त्याचे उत्तम उदाहरण आहे. जैन व हिंदू देवळांत, तसेच मशिदीत व थडग्यातही कोरीव काम केलेल्या दगडाच्या जाळ्या बसवत. प्रामुख्याने संगमरवराचाच वापर केला जाई. त्यामुळे आत थंडावा राही. काही हिंदू देवळांत देवतांच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडावे म्हणून देवळाच्या शिखराला खिडकीवजा झरोके असत.
पूर्वी चीन, जपान व कोरियामध्ये कागदाचा वापर खिडक्यांसाठी करत. जपानमध्ये भूकंपाची सतत टांगती तलवार असल्याने लाकडाची घरे बांधतात. तेथे प्रासाद व देवालयात भव्य खिडक्या आहेत. लाकडी नक्षीदार जाळी किंवा झडपा असलेल्या खिडक्या बनवून त्याला आतून कागदाचे पडदे लावत. चीनमध्येसुद्धा खिडक्यांना उभे व आडवे खांब लावून, त्यांना आतून पारदर्शक कागदी पडदे लावत.
आधुनिक युगात तांत्रिक प्रगती झाल्याने खिडक्यांच्या रचनेत भरपूर बदल जगात सर्वत्रच झालेला दिसतो. दिवसेंदिवस लाकडाची उपलब्धता कमी होत असल्याने तसेच  पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अ‍ॅल्युमिनियम फ्रेम वापरून खिडक्या बनवल्या जातात. या खिडक्या टिकाऊ असतात, लोखंडाप्रमाणे गंजत नाहीत. लाकूड पावसात खराब होते, पण या खिडक्या टिकतात. त्या मजबूत असतात. आता खिडक्यांना सरकत्या काचा लावण्याचीच पद्धत रूढ झाली आहे. कधी कधी खिडक्यांना काचेचे दुहेरी थर लावले जातात. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण मिळते. घरे, इमारती जवळजवळ असल्याने खिडक्यांना पडदे लावण्याची प्रथा प्रचलित झाली, म्हणजे येताजाता लोकांना घरातले दिसत नाही.
आता तर सूर्यकिरणांच्या कोनाचा विचार करूनही खिडकीचे डिझाइन बनवतात. त्यामुळे कमीतकमी किरणे इमारतीत प्रवेश करतात व कमीतकमी उष्णता शोषली जाते. काही ठिकाणी तर फोटोव्होल्टिंग काचा वापरतात. त्यामुळे सूर्यप्रकाश आत येत नाही, पण उजेड मात्र येतो. खिडक्यांसाठी वापरात असलेल्या काचांमध्ये विशिष्ट प्रकार म्हणजे इ-ग्लास/ स्मार्ट ग्लास. इ-ग्लास म्हणजेची’ electrically switched glass. यात विजेचा वापर करून आतल्या प्रकाशाची तीव्रता कमीजास्त करता येते. केवळ एक बटण दाबताच तापमान व प्रकाश काचेच्या सहाय्याने नियंत्रित करता येते. त्यामुळे एअरकंडिशन मशीनचा वापर कमी होतो व हिवाळ्यात हीटर वापरावा लागत नाही. तर असा हा प्राचीन काळापासून आजपर्यंतचा विविध खिडक्यांचा प्रवास मोठा रंजक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Window