27 February 2021

News Flash

आधुनिक विषमतेचे वैषम्य

सगळ्यांचा खासगीपणा जपून ती विदा वापरण्याचा मक्ता पुन्हा समाजाकडे हस्तांतरित होणं महत्त्वाचं आहे.

चित्र ‘पीएचडी कॉमिक्स’च्या ‘हू ओन्स युअर डेटा’ या सचेतपटातून साभार 

संहिता जोशी

फेसबुक, ट्विटर यांतून सर्व लोकांना व्यक्त होण्याची मुभा देण्यानं ‘संवाद वाढेल’- ‘जग जवळ येईल’ वगैरे स्वप्नं खरी न होता उलट, गटा-तटांच्या विभागण्याच आणखी धारदार झाल्या.. त्याहूनही, अशी ‘समाजमाध्यमं’ वापरणारे आणि वापरू देणारे यांच्यात विदेवरच्या मक्तेदारीतून दरी तयार झाली..

एकविसाव्या शतकात जग आणखी जोडलं जाईल; लोक एकमेकांच्या जवळ येतील; माहिती आणि ज्ञानावर असणारी विशिष्ट जाती, धर्म, वर्ग, देशांची मक्तेदारी आणखी ढिली होईल आणि यातून विषमता कमी होईल, एकमेकांबद्दल असणारा द्वेषभाव कमी होईल..  वगैरे स्वप्नं अनेकांनी बघितली होती. विदा-अर्थकारणातून आजवर ज्यांना संधी उपलब्ध नव्हत्या त्या उपलब्ध होतील, अशी आशा होती. आज अनेक लोकशाही देशांतही लोकांना मूलभूत हक्कांसाठी, जिवंत राहण्यासाठी, मतदान करण्यासाठी, समान न्यायासाठी लढा द्यावा लागत आहे. ‘नॉलेज इज पॉवर’- ज्ञानातून सत्ता मिळते, असं म्हणतात. विदा-तंत्रज्ञान ही क्रांती सध्या तरी फक्त तंत्रज्ञान वापरणाऱ्यांपुरतीच मर्यादित राहिली आहे, आणि सामान्य, विशेषत अल्पसंख्याकांचं आयुष्य कदाचित आणखी अस्थिर होत आहे.

माहिती आणि विदा यांतला फरक विदाविज्ञानाच्या संदर्भात करावा लागतो. आपलं नाव काय, ही ‘माहिती’ आपण नव्या भेटलेल्या व्यक्तीला देतो. संदर्भानुसार पेशा, शिक्षण, वगैरे सांगतो. समोरासमोर भेटलेल्या व्यक्तींना आपली उंची, वर्ण वगैरे ‘माहिती’ दिसतेच. ही एकेका व्यक्तीला दिल्यावर तिला ‘माहिती’ म्हणता येईल. समजा मराठी नावांचा अभ्यास केला, माणसांची नावं आणि त्यांची व्यक्तिगत ‘माहिती’ ताडून बघण्याचा; तर विदाविज्ञान वापरून असं लक्षात येईल की सर्वसाधारणपणे मराठी लोकांत मुलींची नावं आ- किंवा ईकारान्त असतात; मुलग्यांची नावं अकारान्त असतात. यात नावं ही झाली विदा आणि विदा वापरून निष्कर्ष काढताना माहिती ही गणिती संकल्पना वापरली जाईल. (नावांची स्त्री/पुरुष अशी विभागणी करताना किती माहिती मिळाली यावरून केलेली विभागणी योग्य का, हे ठरवलं जातं.)

त्याचे गणिती तपशील सोडून देऊ. मुद्दा असा की व्यक्तीपातळीवर एखादीचं नाव काय, या ‘माहिती’चा उपयोग हाक मारण्यासाठी, नक्की कोणाबद्दल बोलत आहोत हे इतरांना कळण्यासाठी होतो. विदाविज्ञानातला सोपा प्रयोग मघाशी सांगितला, त्यात मराठी भाषेत व्यक्तींची लिंगपरत्वे नावं कशी बदलतात, याच्या अभ्यासासाठी नावं वापरली गेली. एकेका व्यक्तीसाठी नाव काय, ही ‘माहिती’ झाली. मोठय़ा प्रमाणावर नावं आणि लिंग अशी ‘माहिती’ गोळा केली तेव्हा ती विदा झाली. विदेतून निष्कर्ष काढताना किती माहिती मिळाली, याची गणितं वापरली. त्या गणितांमधून भाषा कशी वापरली जाते याबद्दल एक निष्कर्ष काढता आला. (वासिली, साव्वा ही रशियन/स्लाविक नावं मुलींची असतील असं मला सुरुवातीला वाटलं होतं. सुझन, जेन ही अकारान्त नावं मुलींची असतात.)

आपल्या विदेची मक्तेदारी आपल्याकडे असावी, असा उल्लेख गेल्या लेखात केला होता. फेसबुकऐवजी फुटबुक वापरण्याची सोय असेल तर आपली विदा इकडूनतिकडे नेण्याची सोपी सोय असावी. यात आपण तयार करतो ती फक्त कच्ची विदा असते. नावांचंच उदाहरण घेतलं तर, माणसांची नावं ही कच्ची विदा. त्यातून शेवटच्या अक्षरात कोणता स्वर आहे, ही वापरण्यासाठी तयार विदा. तयार विदेचा व्यापारी वापर होतो किंवा संशोधनासाठी.

फेसबुक सुरू करण्यामागे मार्क झकरबर्गचा उद्देश नफा मिळवणं हा होता; तसाच आणखी एक उद्देश होता, सगळं जग जोडलं जावं. लोकांना एकमेकांत सहज देवाणघेवाण करता यावी. त्यातून जग आणि मुख्य म्हणजे वेगवेगळे लोक, समाज जोडले जातील. वेगवेगळ्या जाती, धर्म, भाषा, राजकीय विचारसरणींचे लोक एकमेकांशी संवाद साधू शकले तर आपसांतला वैरभाव कमी होईल, असा त्याचा विचार होता. प्रत्यक्षात फेसबुक आणि ट्विटरादी समाजमाध्यमांमुळे जग आणखी द्विभागलं गेलं, विचारकूपं (एको चेंबर्स) तयार झाली आणि त्यातून प्रादेशिकतावादाला, अतिरेकी राष्ट्रवादाला खतपाणी घालणारी सरकारं लोकशाही मार्गानं निवडून आली, वगैरे, वगैरे.

आता फेसबुकवर जाहिराती दिसतात त्यासोबत दोन क्लिक करून ठरावीक जाहिरात आपल्याला का दिसते, हेही दिसतं. वय काय, कुठे राहता यांनुसार या जाहिराती कोणाला दाखवायच्या हे ठरवलं जातं. कुठे राहता यातही फेसबुकनं केलेले प्रभाग पुरेसे मोठे असतील तर असमानता वाढण्याचं प्रमाण कमी होईल. कसं? कुठल्याही झोपडपट्टीपासून साधारण पाच-सात किलोमीटर अंतरावर अतिश्रीमंत लोकही राहतात. विशेषत मूलभूत गरजेच्या, पण चनीच्या गोष्टींच्या जाहिरातीही फक्त श्रीमंतांनाच दाखवल्या आणि गरिबांना वगळलं तर असमानता वाढत जाऊ शकते.

एक उदाहरण पाहा. मान्यताप्राप्त किंवा विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या शिक्षणसंस्थांना जाहिराती करण्याची गरज नसते. आणि लांडीलबाडी करणाऱ्या संस्थांच्या जाहिरातींना शिकलेले, पैसेवाले लोक फारसे बळी पडत नाहीत. आपल्या ओळखीतल्या, नात्यातल्या लोकांकडे चौकशी करून खरंखोटं करण्याची सोय, मक्तेदारी वरच्या वर्गातल्या लोकांकडे असते. गरिबांना बहुतेकदा चौकशी करण्याची सोय नसते; त्यामुळे लबाड संस्थांच्या जाहिराती फक्त गरीब वस्तीतच दाखवायच्या अशी सोय करता आली तर गरिबांना लुबाडून, आणखी गरीब करण्याची आणि पर्यायानं असमानता वाढवण्याची सोय राहील. अमेरिकेत फीनिक्स विद्यापीठ नावाच्या कमी दर्जाच्या शिक्षणसंस्थेनं अशा प्रकारे गरीब कुटुंबं, एकल माता, वगैरे असुरक्षितता वाटणाऱ्या वर्गाला जाहिराती दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं; विद्यार्थ्यांना खोटी आश्वासनं देऊन लुबाडलं; अशा प्रकारचे आरोप काही काळ होत आहेत.

आपली मक्तेदारी फक्त आपल्या विदेवरच असावी असं नाही; तर तिचा वापर कसा केला जावा हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.

किती टक्के मुलींची नावं आकारान्त/ईकारान्त आहेत, हे सारांशाचे (अ‍ॅग्रीगेट) आकडे. सगळ्या मुलींची नावं आकारान्त/ ईकारान्त नसतात; कमल, सुमन अशी मुलींची नावं असतातच. गूगल आपल्याबद्दल अशी बरीच विदा गोळा करत असतं. आपण साधारण कोणत्या भागात राहतो, काय वेळेला काय शोधतो, ही काही साधी उदाहरणं. त्या विदेचा सारांश गूगल ट्रेंड्समधून मिळवता येतो. यात एकेका व्यक्तीची माहिती मिळत नाही.

अमेरिकेतल्या २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकांच्या निकालांवर केंब्रिज अनालिटिका आणि रशियन बॉट्सचा प्रभाव पडला; तो विदाविज्ञान वापरूनच. तसंच निवडणुका झाल्यावर अर्थशास्त्रज्ञ सेथ स्टीफन्स-डाविडोनोविच या संशोधकानं गूगलची सारांशरूपी विदा वापरली. त्याला दिसलं की लोकांच्या वंशवादाचा ट्रम्पला फायदा झाला. विदाविज्ञान वापरण्याचा मक्ता अर्थशास्त्रज्ञाला मिळाल्यावर त्यानं तो समाजाच्या भल्यासाठी वापरण्याचं ठरवलं.

आपली कच्ची विदा गूगलनं गोळा केली. आणि ठरावीक प्रकारे तिची पक्की विदा करून आपल्याला उपलब्ध करून दिली. आपल्या लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकांचे निकाल मे महिन्यात लागले. त्याच्या निदान महिनाभर आधीच अनेक ब्लॉगर्स, अभ्यासकांनी गूगल ट्रेंड्स वापरून दाखवून दिलं होतं की या निवडणुकांमध्येही भाजप+आघाडी इतरांचा धुव्वा उडवेल.

फेसबुक, गूगल आणि इतर अनेक व्यापारी कंपन्या आपली विदा गोळा करतात. सगळ्यांचा खासगीपणा जपून ती विदा वापरण्याचा मक्ता पुन्हा समाजाकडे हस्तांतरित होणं महत्त्वाचं आहे. जग जोडलं जावं ही झकरबर्गची कल्पना रोमँटिक आहे; पण नफेखोरीच्या पलीकडे विचार न केल्यामुळे जोडलेल्या जगात समाजात गटतट पडणं सोपं झालं आहे.

विदा वापरण्याचा मक्ता लोकांना सहज मिळाला की गटतट पाडणं कठीण होतं. माहिती आणि ज्ञान जेवढय़ा जास्त लोकांना सहज उपलब्ध होतात, तेवढं फोडा-आणि-राज्य-करा कठीण होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 4:27 am

Web Title: article about facebook and twitter users behavior issues zws 70
Next Stories
1 दुर्बळांची मुखत्यारी
2 सांगोवानगीदाखल..
3 माझ्या दारचं जास्वंद
Just Now!
X