24 May 2020

News Flash

दुर्बळांची मुखत्यारी

मधुमेहाचे दोन प्रकार असतात; पहिल्या प्रकारचा असतो त्यात रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही.

|| संहिता जोशी

विदा वापरणं म्हणजे काय, विदा वापरण्याचा हक्क कोणाकोणाला, आपलीच विदा आपण या ठिकाणाहून त्या ठिकाणी स्थलांतरित करू शकतो का, हे प्रश्न कळीचे आहेत. पण आपल्या विदेची मुख्यत्यारी आपणच ‘हो-हो’ करत पहिल्यापासून एखाद्या समाजमाध्यमाला, एखाद्या साधनाला दिली असेल तर?

मधुमेहाचे दोन प्रकार असतात; पहिल्या प्रकारचा असतो त्यात रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज असा नाहीच. मात्र कृत्रिम इन्सुलिनची मात्रा प्रमाणात घेत राहिल्यास विकाराचा फारसा उपद्रव होत नाही. रक्तातल्या साखरेचं प्रमाण सतत बेसुमार असल्यामुळे जे दोष उद्भवतात – दृष्टी अधू होणं, मूत्रपिंडं निकामी होणं, वगैरे.. असे प्रकार कृत्रिम इन्सुलिनच्या योग्य मात्रेमुळे सहज टळतात. अगदी लहान वयापासून हे रुग्ण आहारानुसार इन्सुलिनची इंजेक्शनं घेतात. उतारवयात होणारा, दुसऱ्या प्रकारचा मधुमेह निराळा.

माझ्या एका मैत्रिणीला जन्मापासूनच मधुमेह आहे. ती आता खिशात यंत्र घेऊन फिरते. ते यंत्र सतत तिच्या रक्तातली साखरेची पातळी मोजत असतं. शरीर हे मात्र यंत्र नाही. कधी गोष्टी बिनसतात आणि तिच्या रक्तातली साखरेची मात्रा अचानक खूप खाली येते. दोन मोठय़ा कॅडबऱ्या, पेलाभर लिंबू सरबत वगैरे साखरेचा भडिमार करावा लागतो. कधी एखादी रात्र तिला हॉस्पिटलात घालवावी लागते. यंत्रामुळे हे बदल वेळेतच लक्षात येतात आणि जिवाला धोका निर्माण व्हावा अशी परिस्थिती एकदाही आलेली नाही, असं तिनं मला सांगितलं.

‘‘हे लोक सतत आपली विदा (डेटा) गोळा करत असतात. आपल्याला ते मान्य असो वा नसो. फोन वापरला तरी फोन कंपनीला आपली विदा मिळणार. त्या जागी व्हॉट्सॅप वापरलं तर फेसबुक आणि इंटरनेट कंपनीला आपली विदा मिळणार, जंगलात जाऊन राहिल्याशिवाय सुटका अशी नाहीच,’’ असा माझा नेहमीचा सूर असतो. पहिल्या प्रकारचा मधुमेह असणाऱ्यांसाठी, सतत रक्तातल्या साखरेची विदा गोळा करणाऱ्या यंत्रांमुळे आयुष्याची प्रत खूप उंचावली आहे. सतत विदा गोळा करणं, ती साठवून ठेवणं, त्यातून माणसामाणसांतले फरक शोधून काढणं यांमुळे आरोग्यसुविधा मिळवणं सोपं आणि स्वस्त झालं आहे.

जन्मापासून मधुमेह असणारी माझी मैत्रीण म्हणते, रक्तातली साखर सतत मोजणाऱ्या यंत्रामुळे खूप स्वातंत्र्य मिळतं; मला मधुमेह आहे हे विसरण्याची सोय या यंत्रानं केली आहे.

हातावर बांधायची आरोग्यकंकणं (फिटनेस बँड्स) गेली काही र्वष बाजारात आहेत. त्यांचे बरेच ब्रँड्सही आहेत. त्यांतून आपल्या हृदयाचे ठोके मोजण्यापासून प्राथमिक पातळीवरचा ईसीजी मोजणं शक्य आहे. मधुमेहींसारखंच हृदयात बिघाड असणाऱ्या अनेकांनाही आपले विकार विसरून जगण्याचं स्वातंत्र्य मिळणं कठीण नाही.

समजा, माझ्या मैत्रिणीला तिच्या सध्याच्या यंत्राचा कंटाळा आला; नव्या ब्रँडचं यंत्र आकारानं बारीक, वजनानं हलकं किंवा दिसायला अधिक आकर्षक आहे. मीही हातावर एक आरोग्यकंकण बांधून फिरते. जुन्याचा पट्टा तुटला, मग नवीन घेतलं तेव्हा त्याच कंपनीचं घेतलं. कारण जुन्या यंत्रानं गोळा केलेली विदा दुसऱ्या ब्रँडच्या यंत्राला वाचता येत नाही.

काही कारणानं जीमेलऐवजी दुसरी ईमेल व्यवस्था वापरायची असेल तर जुनी ईमेलं सहज नव्या ठिकाणी नेता येत नाहीत. फेसबुकवर आपण काय काय लिहिलं आहे हे सहज गोळा करण्याची सोय नाही. फेसबुकच्या मनात येतं तेव्हा फेसबुकवरच चार वर्षांपूर्वी आपण काय लिहिलं होतं, हे ‘मेमरी’ म्हणून दाखवलं जातं. पण गणपती आणि दिवाळी ग्रेगोरियन कालगणनेनुसार येत नाहीत. गेल्या वर्षी गणपतीला काय आरास केली होती, हे या वर्षी गणेश चतुर्थीला ‘मेमरी’ म्हणून वर येत नाही.

यात सगळ्यात एक धागा असा आहे की आपल्या विदेची मालकी आपल्याकडे नाही. केंब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीच्या नाशाला कारणीभूत ठरलेला खटला भरणाऱ्या डेव्हिड कॅरलला आपली विदा त्यांच्याकडून हवी होती. मीच तयार केलेली विदा मला परत द्या, अशी त्याची बाजू होती. ब्रिटिश न्यायालयानं त्याची बाजू उचलून धरली, पण त्याला विदा परत मिळाली नाही. केंब्रिज अ‍ॅनालिटिकानं त्याऐवजी दंड भरला.

मालकीहक्काचा अर्थ विदेच्या बाबतीत निराळ्या पद्धतीनं लावावा लागतो. बौद्धिक संपदेवरचा हक्क असतो तसा काहीसा विचार विदेबाबत केला पाहिजे. या लेखाचा बौद्धिक संपदा हक्क कोणाकडेही असला तरीही लेख वाचण्याचा हक्क ‘लोकसत्ता’च्या सर्व वाचकांना आहे. तसंच आपण जी विदा तयार केली आहे, ती इकडून तिकडे नेण्याचा हक्क आपल्याला असला पाहिजे; ती विदा वाचण्याचा हक्क गूगल, फेसबुक, वगैरेंना असावा.

याची व्यावहारिक उदाहरणं म्हणजे आता भारतातही लैंगिक गुन्हे करणाऱ्यांची एकत्र नोंद ठेवली जाते; पाश्चात्त्य देशांत हे गेल्या काही दशकांपासूनच सुरू आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीयांविरोधात पोलीस जरा जास्तच मगरुरीनं वागतात, यासाठी पोलिसांच्या वर्तनाची विदा गोळा करायला सुरुवात झाली आहे. ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं तेच लोकांमध्ये भेदभाव करून कायदे मोडत असतील तर त्याची दखल घेणं महत्त्वाचं असतं. समाजातल्या दुर्बल घटकांचं रक्षण करण्यासाठीही विदा आणि संबंधित तंत्रज्ञान वापरणं शक्य आहे.

रोजच्या आयुष्यात याचा फायदा कसा होऊ  शकतो तर, समजा ‘उबर’साठी टॅक्सी चालवणारीनं उद्या ठरवलं की आता ‘उबर’ नको, फक्त ‘ओला’साठीच टॅक्सी चालवणार, तर तिला ग्राहकांनी दिलेली रेटिंग, तिची टॅक्सीचालक म्हणून असणारी पत एका कंपनीकडून दुसरीकडे सहज हस्तांतरित करता आली पाहिजे. एखाद्या जवळच्या मैत्रिणीनं तिच्या एखाद्या मैत्रिणीची शिफारस आपल्याकडे केली तर आपण ती मनावर घेतो. मग ‘उबर’कडे असणारी रेटिंग आपल्याच परवानगीनं ‘ओला’कडे का जाऊ  नयेत?

म्हणलं तर ही सगळी विदा वाचायला सोप्या पद्धतीनं आपल्या समोर मांडलेली असते. फेसबुक पोस्ट्स ज्या प्रकारे विदागारात (डेटाबेस) साठवली जातात, तशा कच्च्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडता येत नाहीत. पण फेसबुकऐवजी उद्या कोणी ‘फुटबुक’ सुरू केलं, तर कुणालाही आपली फेसबुकवरची सगळी विदा तिथे नेण्याचा हक्क असला पाहिजे.

गूगल आपली विदा गोळा करतं, पण ती विदा एकत्र करून ‘गूगल ट्रेंड्स’सुद्धा सहजरीत्या बघता येतात. समाजशास्त्रज्ञांना गूगल वापरून समाजाचा अभ्यास करायचा असेल तर त्यांना किचकट सॉफ्टवेअर लिहिण्याची गरज नाही. हल्ली फेसबुकवर जाहिरात दिसली तर ती जाहिरात आपल्याला का दाखवली जाते, हेही फेसबुक दाखवतं. मुळात फेसबुकवर जाहिरात ‘स्पॉन्सर्ड’ आहे, हेही दिसतं. आपल्या विदेचा आपल्याला फायदा होण्याची ही सुरुवात आहे. कारण गोळा केलेली विदा योग्य प्रकारे सादर करण्याची क्षमता आणि वेळ सगळ्या अभ्यासक आणि सर्वसामान्यांकडे नसते.

तळटीप : अधूनमधून लोक फेसबुकवरच, फेसबुकलाच ‘मेरी झाँसी नही दूँगी’छाप नोटिसा देताना दिसतात. माझी विदा, लेखन, फोटो वगैरे वापरण्याचा अधिकार मी फेसबुकला देत नाही, वगैरे मजकूर त्यांत असतो. आपली विदा फेसबुकच्या विदागारातच पडलेली असते. शिवाय फेसबुकवर पहिल्यांदा खातं बनवतानाच ते आपल्याला अत्यंत सूक्ष्म टंकात सांगतात की तुमची विदा आम्ही वापरणार आहोत, बरं. आपणही त्यावर हो-हो करून पुढे जातो. तेव्हा या बाणेदारपणात काही हशील नाही; त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

ही विदा कशी वापरावी, ती हस्तांतरित करण्याचा हक्क कोणाला असावा, विदा वापरणं म्हणजे काय, हे प्रश्न कळीचे आहेत. ही विदा वापरण्याची मुखत्यारी कोणाकडे असावी, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2019 12:05 am

Web Title: what is data management mpg 94
Next Stories
1 सांगोवानगीदाखल..
2 माझ्या दारचं जास्वंद
3 खऱ्याची दुनिया नाही, सायेब!
Just Now!
X