अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयामधून पळून जाण्याच्या घटनेला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी झाला. ज्या व्यक्तींनी ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केली, त्या सर्वांवर कारवाई सुरू आहे. त्याच दरम्यान ससून रुग्णालयाचे तत्कालिन अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर ‘संजीव ठाकूर यांच्यावर ही कारवाई पुरेशी नसून त्यांना अटक करण्यात यावी’ या मागणीसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले आहेत.