मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसंच देवेंद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. आज ( २५ फेब्रुवारी) अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीत जरांगे बोलत होते. सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. अशातच जरांगे यांचे सहकारी असलेले किर्तनकार अजय बारसकर यांनी मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांत बंद दाराआड बैठका घेतल्या आहेत, असा आरोप केला. दरम्यान, या आरोपांनंतर आता मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.