रामदास आठवले निर्मळ मनाचा माणूस आहे. मात्र, काही लोकांच्या दबावामुळे गांगरून त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे सांगत रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी मंगळवारी रामदास आठवले यांना भाजपसोबत जाण्याचा निर्णय बदलून शिवशक्तीसोबत येण्याचे आवाहन केले. अर्जुन डांगळे यांनी मंगळवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अर्जुन डांगळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भांडूप मतदारसंघातून आपले उमेदवार अनिल गांगुर्डे माघार घेतील, असेही डांगळे यांनी सांगितले.
ते म्हणाले, युती तुटल्यानंतर कोणासोबत जायचे हे आमच्या पक्षात ठरलेले नव्हते. मात्र, रामदास आठवले अमित शहा यांना भेटायला गेल्यावर काही जणांनी त्यांच्यावर दबाव टाकला आणि घाईघाईत त्यांच्याकडून पाठिंब्याची घोषणा करवून घेतली. त्यादिवशी जे काही घडले ते विपरित होते. रामदास आठवले लोकचळवळीतील नेते आहेत. त्यांनी जागांचा विचार न करता शिवसेनेसोबत यावे, असे आवाहनही अर्जुन डांगळे यांनी केले.
अर्जुन डांगळेंच्या निर्णयाचे स्वागत करून उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यासोबत लढायला अर्जुन आला आहे. सध्या राजकारण पूर्णपणे ढवळले जात आहे. शिवसेना एकाकी पडली आहे, असे भासवले जात आहे. मात्र, शिवछत्रपतींचा आशीर्वाद महाराष्ट्र अखंड ठेवणाऱयांनाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.