काँग्रेस आणि राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यावर उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. पक्षाकडून उमेदवारीचे अधिकृत पत्र मिळावे म्हणून उमेदवार आणि त्यांचे समर्थक पक्षाच्या कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसले होते, पण यादी तयार करण्यास होणाऱ्या विलंबामुळे इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची चांगलीच घालमेल झाली.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात इच्छुक किंवा त्यांचे समर्थक पक्षाचे पत्र मिळविण्यासाठी सकाळपासून जमले होते. दुपारी पत्र देण्यात येईल, असे सांगण्यात आले. नंतर चार, सहा, रात्रीचे आठ वाजता पत्रे दिली जातील, असे जाहीर करण्यात येत होते. उद्या अर्ज भरण्याची मुदत आणि पत्र घेऊन मतदारसंघात पोहचणार कधी, असा इच्छुकांच्या समर्थकांना प्रश्न पडला होता.
काँग्रेसमध्ये तर कोणाता पायपोस कोणात नव्हता. दुसरी यादी केव्हा जाहीर होणार हे कोणालाच काही माहित नव्हते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची बंद खोलीत बराच वेळ चर्चा सुरू होती. संतप्त झालेल्या समर्थकांनी  घोषणाबाजीही केली.
शुक्लकाष्ठ टाळण्यासाठीच पाठिंबा काढला ?
आघाडी तुटली तरी जम्मू आणि काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने निवडणुकीपर्यंत सरकार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्यात आघाडी तुटल्यावर राष्ट्रवादीला तशी भूमिका घेता आली असती, पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावण्याची शक्यता लक्षात घेता राष्ट्रवादीने थेट सरकारचा पाठिंबाच काढून घेतल्याची चर्चा आहे.
सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला मान्यता देण्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित आहे. तसेच अन्य काही मंत्र्यांच्या खात्यांची प्रकरणे मुख्यमंत्र्यांकडे आहेत. आघाडी तुटल्यावर निवडणुकीपर्यंत सरकारमध्ये कायम राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला असता तर मुख्यमंत्री चव्हाण यांनी अजितदादा आणि तटकरे यांच्या विरोधातील चौकशीला मान्यता दिली असती, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते.