राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर शरद पवार यांनीच मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली असली तरी पवारांचे नेतृत्व पुढे करून मतांचे गणित जुळविण्याचा हा प्रयत्न आहे, की मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या अजित पवार यांना डिवचण्याचा हा भुजबळ यांचा प्रयत्न आहे, याचीच चर्चा सध्या पक्षात सुरू आहे.  
मुख्यमंत्रीपद मिळवायचेच या निर्धाराने अजित पवार विधानसभेच्या िरंगणात उतरले आहेत. पक्षाचे उमेदवार ठरविणे, कोणाला कुठे मदत करायची, पक्षाची सारी व्यूहरचना अजितदादांनी निश्चित केली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात रंगात आला असतानाच राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. राष्ट्रवादीला सत्ता मिळाल्यास शरद पवार यांनीच मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे मत मांडतानाच पवार यांना तशी आपण विनंती करू, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.  अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यांवरून झालेल्या आरोपांमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. अशा वेळी मतदारांना आपलेसे करण्याकरिता शरद पवार यांनीच मुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी करीत भुजबळ यांनी नाराज मतदार राष्ट्रवादीपासून दूर जाणार नाहीत अशी खबरदारी घेतली. राज्यात आजही शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. अजितदादांपेक्षा शरद पवार हे पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्यास नक्कीच फरक पडू शकतो. यामुळेच शरद पवार यांचे नाव पुढे करून भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मतांचा टक्का वाढेल अशा पद्धतीने खेळी केली आहे. शरद पवार हेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षाला तारू शकतील, असा पक्षात मतप्रवाह आहे. अर्थात, राज्याच्या राजकारणात परतणार नाही, असे शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
पक्षात आपण ज्येष्ठ असताना अजितदादांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्याची सल भुजबळांच्या मनात आहे.