महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री देणाऱ्या मराठवाडय़ात काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले. पण हा आता इतिहास झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मराठवाडय़ात भाजपला सहानुभूती होतीच. त्यात मोदींच्या सभांची भर पडली. भाजप हाच आता मराठवाडय़ातला अव्वल पक्ष ठरला आहे. या बरोबरच मराठवाडय़ात हिंदू-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण हा विषय नव्याने चर्चेत आला आहे. याचे कारण औरंगाबाद व नांदेड या दोन्ही जिल्ह्य़ांत अल्पसंख्य समाजाने काँग्रेसला थेट नाकारले. मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) पक्षाच्या ओवेसी यांनी मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण केले. त्यामुळे मागील निवडणुकीत १९ जागांसह अव्वल असलेल्या काँग्रेसची या वेळी थेट तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. या पक्षाला ९ जागांवर समाधान मानावे लागले. अर्थात, पक्ष म्हणून काँग्रेसकडे मराठवाडय़ात एकजिनसी वृत्ती कधीच नव्हती. आपापल्या मतदारसंघाबाहेर डोकावूनही पाहायचे नाही, ही वृत्ती असल्याने काँग्रेस घसरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मराठवाडय़ात शिवसेनेला मागील तुलनेत दोन जागा जास्त मिळाल्या. सेनेने ११ जागा जिंकल्या. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्य़ात ४ जागा सेनेच्या हाती लागल्या, तर बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्य़ात सपाटून मार खावा लागला. प्रदीप जैस्वाल, आर. एम. वाणी व हर्षवर्धन जाधव हे तिघे आमदार पराभूत झाले. यातील जाधव हे गेल्या वेळी कन्नडमध्ये मनसेकडून विजयी झाले होते. या वेळी सेनेशी सोयरीक करून त्यांनी निवडणूक लढविली.  
खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविषयी शिवसेनेत मोठी नाराजी आहे. त्यात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाले आणि सेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली असली, तरी प्रत्यक्षात दोन जागांची कमाई करीत ११ जागांसह सेनेने दुसरे स्थान प्राप्त केले.
राष्ट्रवादीला ९ जागा मिळाल्या. राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे यांच्यासह वैजापूर येथून भाऊसाहेब चिकटगावकर व कन्नडमधून उदयसिंह राजपूत यांनी जागा राखल्याने राष्ट्रवादी टिकली.
तुळजापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली होती. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्य़ात भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. लातूरमध्ये शिवसेनेला, बीडमध्ये काँग्रेस व शिवसेनेला, परभणीत काँग्रेस व भाजपला, तर हिंगोलीत राष्ट्रवादीला भोपळा फोडता आला नाही. कार्यकर्ते नसतानाही स्वबळ आजमावण्यासाठी गेलेल्या पक्षांना तेथील मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले. शरद पवार यांनी मराठवाडय़ात काँग्रेसच्या नेत्यांवर जहरी म्हणता येईल, अशीच टीका केली होती. तुळजापूरमध्ये तर मधुकरराव चव्हाण यांचे वयही काढले होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला राखता आली नाही. तब्बल २३ विद्यमान आमदारांना मराठवाडय़ातील मतदारांनी धूळ चारली.या वेळी निवडणूक गाजली ती गंगाखेडची. कोटय़धीश रत्नाकर गुट्टे व सीताराम घनदाट यांनी मतांसाठी पैसे वाटले. ते पकडले गेले. मतदार मात्र शहाणा असतो, हेच येथील निकालावरून स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे निवडून आले.