14 August 2020

News Flash

चीनपेक्षा प्रगत होण्यासाठी..

चीनशी आपले कितीही भांडण असले तरी त्यांच्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या फायद्यासाठी उचलल्या पाहिजेत.

कारखाना व कार्यालयाची छायाचित्रे ‘लिंक्डइन’वरून

दीपक मिश्रा

‘उत्पादक उद्योगांची भरभराट हे तर चीनच्या आर्थिक प्रगतीचे गमक’ असे सारेच म्हणतात.. पण हेच जर भारताने साध्य करायचे ठरवले, तर काय-काय करावे लागेल, याविषयी चीनमधल्या एका भारतीय उद्योजकाच्या अनुभवांवर आधारलेले हे टिपण..

मी चीनमध्ये गेली दहा वर्षे कारखाना चालवत असून एखादा देश पुढे जातो त्याला काही कारणे असतात, असा माझा अनुभव आहे. चीनशी आपले कितीही भांडण असले तरी त्यांच्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या फायद्यासाठी उचलल्या पाहिजेत.

चीनमधील एका मध्यम आकाराच्या भारतीय कंपनीचा मी उपाध्यक्ष आहे. ड्रमची झाकणे बनवणारे आम्ही जगातले एक मोठे कारखानदार आहोत. भारताबाहेर स्टीलच्या परांची (स्कॅफोल्डिंग) बनवून त्यांची निर्यात करणारेही आम्ही एक सर्वात मोठे कारखानदार आहोत. आधीच एक सांगितले पाहिजे की, मी स्वत: गेली दहा वर्षे चीनमध्ये असलो तरी मी एक स्वदेशाभिमानी असून चीनचा लाळघोटय़ा नाही. पण तरीही सांगोवांगी गोष्टींपेक्षा प्रत्यक्ष काय आहे ते भारतीयांनी वाचावे म्हणून हे लिखाण करीत आहे.

व्यावसायिक आणि आर्थिक कारणांसाठी आम्ही हे दोन्ही उद्योग चीनमध्ये करायचे ठरवले. त्यासाठी चीनमध्ये स्वस्तात मिळणारा कच्चा माल, अत्यंत कामसू कामगार, कारखाना चालवण्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टींची सहज उपलब्धता आणि चीनमध्येच आमच्या मालाला असलेली प्रचंड मागणी या गोष्टी कारणीभूत ठरल्या.

भारत आणि चीन यांचे संबंध मैत्रीपूर्ण नाहीत, हे आम्हाला पुरेपूर माहीत आहे आणि त्यामुळे, तेथे काम करण्यात काय धोका आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यांच्याकडील कायदे चिनी लोकांना संरक्षण देणारे आहेत. आम्ही आमच्या कारखान्यात आमचे स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आमचे तंत्रज्ञान स्वस्त तर आहेच, शिवाय स्पर्धेला तोंड देऊ शकणारे आहे. आमचे तंत्रज्ञान चिनी लोक चोरण्याची भीतीही आमच्या मनात होती. हे असे असूनही पुरेशी खबरदारी घेऊन आम्ही येथे कारखाना काढायचे ठरवले. खबरदारी म्हणून कोणाही चिनी माणसाला आमचा भागीदार म्हणून घ्यायचे नाही असे आम्ही ठरवले. चीनमध्ये एक कायदा आहे की एखाद्या कंपनीत चिनी माणसाची छोटीशी जरी भागीदारी असली तरी त्याला नकाराधिकार (व्हेटो) असतो. आणि म्हणूनही आम्ही कोणा चिनी माणसाला आमच्या कंपनीत भागीदारी दिली नाही.

२००६ साली आम्ही चीनमध्ये कारखाना कुठे काढायचा यासाठी जागेचा शोध घेऊ लागलो. आम्हाला चीनच्या पूर्व किनाऱ्यालगत जागा अशी हवी होती की जेथे विकसित क्षेत्रांपेक्षा कामगार स्वस्तात उपलब्ध होतील, जेथे कारखान्यात सांडपाणी तयार झाले तर सरकारी नियमांची आडकाठी असू नये व त्याचा निचरा करण्याची व्यवस्था उपलब्ध असावी. अखेर २००८ साली चीनमधील बऱ्याच लोकांशी सल्लामसलत झाल्यावर नानजिंग शहराच्या पश्चिमेला ५० कि.मी.वरील कान्जिओ या औद्योगिक वसाहतीत आम्ही जागा शोधली. जागेची माहिती आम्हाला मिळाल्यावर मग आम्ही या औद्योगिक वसाहतीच्या प्रमुखाला प्रत्यक्ष भेटायचे आणि ती जागा पाहायचे ठरवले. ठरलेल्या दिवशी मी आणि माझे एक सहकारी सकाळी १० वाजता प्रमुखांच्या ऑफिसात पोहोचलो. तर तेथे, त्या स्थानिक ठिकाणच्या राजकीय पक्षाचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी औद्योगिक वसाहतीच्या ऑफिसात उपस्थित होते. आम्ही त्या औद्योगिक वसाहतीच्या प्रमुखांना सांगितले की आज काही करार करण्याचा आमचा मानस नाही. त्यावर ते प्रमुख अत्यंत नम्रपणे म्हणाले की तुम्ही आमची जागा पाहून आणि त्याबाबतच्या अटी ऐकून निश्चितपणे खूश व्हाल अशी आम्हाला खात्री आहे.

मग त्यांनी त्यांच्या योजना आम्हाला सांगितल्या आणि त्या औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळे प्लॉट्स दाखवले. त्यापैकी एका प्लॉटची आम्ही निवड केल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलेले भाव हे, त्यांनी अगोदर ई-मेलमध्ये कळवलेल्या भावापेक्षा कमी होते. आम्ही त्यांच्याकडून आणखी काही सवलती मागितल्या आणि त्या त्यांनी आम्हाला काहीही खळखळ न करता देऊ केल्यावर चार तासांत आम्ही करार करून त्यावर सह्य़ा केल्या. आम्ही त्या औद्योगिक क्षेत्रातील पहिले परदेशी गिऱ्हाईक होतो आणि कसेही करून आम्हाला तेथे जागा द्यायची हा त्यांचा निश्चय आम्हाला स्पष्ट दिसत होता.

या करारावर सह्य़ा केल्यावर आम्ही त्या प्रमुखांना सांगितले की, आम्हाला आता नानजिंगला जाऊन एखाद्या वकिलाला भेटायचे आहे आणि कंपनी कशी बनवायची त्याबाबत त्यांची मदत घ्यायची आहे. त्यावर ते प्रमुख म्हणाले की, जर तुम्ही आमच्यावर भरवसा ठेवत असाल तर त्या सर्व कायदेशीर बाबी आम्ही तुम्हाला काहीएक पैसे न आकारता पुऱ्या करून देऊ. एव्हाना आम्ही त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवू लागलो असल्याने त्यांच्या या सूचनेस आम्ही मान्यता दिली. त्याच वेळी त्यांनी जवळच्या बँक मॅनेजरला खाते उघडण्यासाठीची सर्व कागदपत्रे घेऊन बोलावून घेतले होते. आश्चर्य म्हणजे या सर्व गोष्टी एका दिवसाच्या अवधीत घडल्या होत्या.

एका आठवडय़ाच्या काळात आमच्या कंपनीला नोंदणी क्रमांक मिळाला आणि आणखी दोन आठवडय़ात नोंदणी पूर्ण झाल्याची सर्व कागदपत्रे आमच्या हातात पडली. त्यानंतरच्या आठवडय़ात बँक खाते उघडले गेले. थोडक्यात आम्ही जागा पाहिल्यापासून एक महिन्यात आम्ही जागा खरेदी करू शकलो आणि सर्व प्रकारच्या नोंदण्या पुऱ्या झाल्या.

आमच्या औद्योगिक क्षेत्रातील एक अधिकारी आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी देण्यासाठी नेमला गेला. आम्हाला कारखाना बांधण्यासाठी वास्तुरचनाकार हवा होता. त्या अधिकाऱ्याने त्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पाच वास्तुरचनाकारांची नावे दिली. चर्चेअंती आम्ही नानजिंग येथील एका वास्तुतज्ज्ञाची निवड करून त्याला आमच्या कारखान्याची इमारत कशी हवी ते सांगितले. त्यानंतर आम्ही क्षेत्रीय अधिकाऱ्यास भेटून आम्हाला कारखान्याच्या उभारणीसाठी कंत्राटदार हवा सांगितल्यावर त्याने दुसऱ्याच दिवशी, आम्हाला त्या क्षेत्रात काम करणाऱ्या आठ-नऊ कंत्राटदारांची नावे दिली. मग आम्ही या सर्व कंत्राटदारांना आमच्या कामाच्या निविदा पाठवल्या आणि त्यातील एकाला काम दिले.

कंत्राटदाराला काम दिल्यापासून चार महिन्यांत आमचा कारखाना उभा राहिला आणि पुढच्या दोन महिन्यात आमचे उत्पादन सुरू झाले. जागा बघितल्यापासून सहा महिन्यांत कारखाना उभा करून उत्पादन सुरू झाल्याचा अनुभव काहीसा नवलाचाच, पण इथे या गोष्टी सामान्य किंवा नित्याच्याच होत्या! अशा अन्य बाबीही आहेत. त्यापैकी काही इथे नोंदवतो :

(१) भारतापेक्षा येथील कामगारांचा पगार जास्त असला तरी उत्पादित वस्तू आम्हाला स्वस्तात विकता येतात कारण येथील कामगाराची उत्पादकता जास्त आहे. कामगारांना कंपन्यांतर्फे जेवण विनामूल्य दिले जाते. ही सोय चीनमध्ये सगळ्या कारखान्यात आहे.

(२) आमचे औद्योगिक क्षेत्र एका छोटय़ा गावात असून त्या गावाची लोकसंख्या केवळ दीड लाख आहे. चीनमधील हे एक सामान्य क्षेत्र असूनही या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे, रुंद आहेत. औद्योगिक क्षेत्रात वीज, पाणी, जमिनीचे सपाटीकरण, सांडपाणी निचरा आणि महामार्ग जोडणी या सर्वाची उपलब्धता असणे, ही येथे सामान्य बाब आहे.

(३) दरवर्षी चीनच्या नववर्षांनिमित्त कारखाने धरून सर्व व्यवसाय दहा दिवस बंद राहतात. याशिवाय चीनमध्ये १ मे चा जागतिक कामगार दिन, ऑक्टोबरमधील एक राष्ट्रीय दिवस, जूनमधील ड्रॅगॉन बोट महोत्सव या दिवशी सुट्टी असते. त्याशिवाय, चीनमधील कारखान्यात किरकोळ रजा आणि वार्षिक रजा नसतात.

(४) चीनमधील कायदे स्पष्ट असून त्यातून वेगळा काही अर्थ काढायला कोठेही फट नाही. येथे पंचतारांकित विमा उतरावा लागतो. त्यात स्थावर मालमत्ता, अपघात, बेकारी, पालकत्व, आणि रुग्णालय या गोष्टी अंतर्भूत असतात. अपघाताच्या स्वरूपानुसार भरपाई मिळते. कारखान्याची उभारणी झाल्यावर एकदा कारखाने निरीक्षक पाहणी करतात आणि त्यानंतर कधीच पाहणी होत नाही. किंबहुना आमच्या कारखाना चालवण्याच्या गेल्या दहा वर्षांतील अनुभवात कोणताही सरकारी निरीक्षक कोणत्याही कारणासाठी कधीही कारखान्यात आला नाही.

(५) प्रत्येक महिन्यात आम्ही आमचे ‘व्हॅट रिटर्न’ भरतो आणि ते तपासून झाल्यावर लगेच त्याच महिन्यात आमचा परतावा आम्हाला मिळतो. यात कधी कोणी प्रत्यक्ष ढवळाढवळ करीत नाही की कधी त्या कामात कोणत्याही कारणाने खंड पडला नाही. कोणी कोणाला कसलाही इन्व्हॉईस आपल्या लेटरहेडवर अथवा लोगो वापरून पाठवीत नाही (याला चीनमध्ये  फॅपिओ म्हणतात). सेल्स टॅक्स खात्याने दिलेला क्रमांक वापरून बनवलेला फॅपिओच प्रत्येक विक्रेत्याला वस्तू विकताना (अग्रिम विक्रीकर भरण्यासाठी) वापरावा लागतो. प्रत्येक विक्रेत्याला कर संकलन खात्याकडून एक उपकरण विकत घ्यावे लागते. ते उपकरण संगणक आणि त्याच्या प्रिंटरला जोडले जाते आणि संगणकावरील सर्व माहिती कर संकलन विभागाकडे स्वयंचलित पद्धतीने जात राहाते.

(६) व्हॅट, आयकर, आयातकर आणि स्थानिककर या शिवाय आणखी कोणते कर चीनमध्ये नाहीत. या बाबतीतील धोरणे स्पष्ट असून त्याबाबत कोणतेही वाद नसतात.

(७) सर्व सरकारी अधिकारी त्यांच्याकडे असलेल्या कामासाठी पूर्ण जबाबदार असतात. एखाद्या परवान्यासाठी अर्ज केल्यापासून ३० दिवसात परवानगी मिळाली नाही तर ती मिळाली असे गृहीत धरले जाते.

(८) औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा नावाजण्यासारखी असून चोरीचे एकही प्रकरण झाले नाही.

(९) चीनमध्ये एकही बलाढय़ कामगार युनियन नाही. पगार आणि इतर कल्याणकारी योजना कशा द्यायच्या याचे स्पष्ट निर्देश असल्याने त्याबाबत कामगारांशी चर्चा करावी लागत नाही. त्यामुळे एकून कामकाज शांतपणे चालते.

(१०) भारत-चीन सीमावादामुळे जरी दोन देशातील परराष्ट्र संबंध मधून  मधून ताणले जात असले तरी चिनी कामगार आणि भारतीय अधिकारी यांच्यातील औद्योगिक संबंध मैत्रीपूर्णच असतात. या कामगारांना त्या तणावाची माहिती असते तरीही चीनमधील कोणत्याही भारतीय संस्थेतील संबंध कधीही बिघडले नाहीत.

परदेशी धोरणात झालेल्या बदलाबद्दल चीनचे केंद्रीय सरकार लगोलग सगळ्यांना कळवते. उदाहरणार्थ, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवर १० टक्के आयातकर लादला, तेव्हा एका आठवडय़ाच्या आत चीन सरकारने व्हॅट सवलत चार टक्क्यांनी वाढवली आणि त्यांच्या चलनाचे अवमूल्यन केले. त्यामुळे अमेरिकेच्या आयातकराची भरपाई झाली, एवढेच नव्हे तर चिनी उत्पादने जगाच्या बाजारात अधिक स्पर्धात्मक झाली. आपल्या देशाचे सामर्थ्य जपण्यासाठी ताबडतोब निर्णय घेण्याची त्यांची ही नेहमीची पद्धत आहे.

चीनमध्ये कारखाना चालवत असताना ताबडतोबीने सुचले ते हे अनुभव आहेत. चीनमध्ये उद्योग चालू असताना टेबलाखाली कोणतीही किंमत द्यावी लागत नाही. चिनी उत्पादने जगाच्या स्पर्धेत का टिकतात त्याचे उत्तर येथे मिळते.

भारत सरकारने जर कारखाना सुरू करण्याच्या सुविधा आणि व्यवसाय शांतपणे करू देणे यांसाठी हे ‘चिनी मॉडेल’ अमलात आणले, तर भारत चीनला केव्हाच मागे टाकेल! कारण भारतीय उद्योजक हे चिनी उद्योजकांपेक्षा अधिक तरबेज, अनुभवी, समजदार आहेत.

मूळ लेखक ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड’ चे एक उपाध्यक्ष असून त्यांच्या या लेखाचा काही भाग इंग्रजीत यापूर्वी उद्धृत झाला आहे.

अनुवाद :  अ.पां.देशपांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:04 am

Web Title: article on to be more advanced than china abn 97
Next Stories
1 सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा का खंडित करायची?
2 आत्महत्यांचे सामाजिक संदर्भ..
3 नागरी बँकिंगला नवी, ग्रामीण संधी..
Just Now!
X